डिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर !

कंटेंट डिलीव्हरीचे बदललेले प्राधान्य आणि अत्यंत गतीमान अशा नव माध्यमाच्या आक्रमणाने मीडिया हाऊसेसचे मालक धास्तावले आहेत. यातच ''आम्ही अमुक-तमुक वर्तमानपत्र का वाचावे ?'' असा प्रश्‍न वाचक विचारत असतांना आता व्यावसायिकही ''आम्ही तुम्हाला जाहिरात का द्यावी ?'' अशी विचारणा करू लागल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. अर्थात, जाहिरातदारांची बदलत असणारी मानसिकता ही मीडियाच्या मूळावर येणार असल्याचे स्पष्ट झाले झाले आहे. 


डिजीटल युग आले म्हणून पत्रकारिता नष्ट होणार नाही. मीडिया हाऊसेसही अचानक बंद पडणार नाहीत. तथापि, सर्वांना आपले प्राधान्यक्रम बदलवावे लागणार आहेत. आजवर लोकांपर्यंत सकाळी वर्तमानपत्र पोहचवणारी यंत्रणा ही डिजीटल माध्यमातून पार पाडली जाणार असून पारंपरीक माध्यमे कुरकुरत का होईना...हा बदल स्वीकारण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र अजून एक फार मोठा बदल आपल्यासमोर घडत असून याचा सरळ फटका हा संक्रमणातून जाणार्‍या पारंपरीक प्रसारमाध्यमांना बसणार आहे. हा बदल अर्थातच जाहिरातदारांच्या बदललेल्या मानसिकतेचा होय. *राज्यातील एका ख्यातनाम वर्तमानपत्राच्या पुढील पिढीतल्या मालकाशी माझा अधून-मधून संवाद होत असतो. यात ते सातत्याने जाहिरातदार आता जाहिरातीच्या परिणामाची विचारणा करू लागली असल्याचा उल्लेख करत असतात*. हा बदल तसा आश्‍चर्यकारक नाहीच. खरं तर, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ, इव्हेंट, होर्डींग, डिजीटल डिस्प्ले आदींच्या माध्यमातून केली जाणारी जाहिरात ही नक्की किती जणांनी पाहिली याची अचूक आकडेवारी कुणालाही समजत नाही. यामुळे या जाहिरातीचा नेमका किती प्रभाव पडलाय ? हे तर जाऊ द्या...पण तिला नेमक्या किती जणांनी पाहिले हेच जाहिरातदारांना समजत नाही.

वर्तमानपत्रांच्या जाहिरातींचा विचार केला असता, आजवर खपावर जाहिरातींचे प्राधान्य आणि दर ठरत असल्याचे आपल्या सर्वांना माहित असेलच. तथापि, मी आधीच्या लेखात नमूद केलेल्या 'कंटेंट अ‍ॅनालिसीस'च्या  आयामातूनच 'कमर्शिअल अ‍ॅनालिसीस' करावयाचे म्हटल्यास जाहिरातदारांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. अर्थात, अमुक एका वर्तमानपत्राचा खप हा एक लाख असला तरी त्यात दिलेली जाहिरात ही सर्व वाचकांनी पाहिली का ? ते त्यावर किती वेळ थांबले ? त्यांनी ही जाहिरात पूर्णपणे वाचली का ? या बाबी कुणाला बाप जन्मातही समजत नाहीत. पारंपरीक मीडियाच्या सुवर्ण काळात जसा अग्रलेख हा त्या-त्या वर्तमानपत्रातील सर्वात महत्वाचा घटक मानला जात असे. 'कंटेंट अ‍ॅनालिसीस'ने हा भ्रमाचा भोपळा असल्याचे सिध्द केले. या विश्‍लेषणातून संपादकीयपेक्षा अन्य मजकूर हा अधिक वाचनीय व अर्थात लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाल्याने आज अग्रलेख हा नावापुरता प्रतिष्ठेचा राहिलेला आहे. त्याच प्रमाणे आधी वर्तमानपत्राच्या खपानुसार दिल्या जाणार्‍या जाहिराती या आता 'कमर्शिअल अ‍ॅनालिसीस' करून द्याव्यात असा मतप्रवाह व्यावसायिकांमध्ये बळावला आहे. यामुळे आधीच डिजीटल मार्गाकडे वळण्याच्या तयारीत असणार्‍या पारंपरीक मीडियाला अजून जोरदार धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जाहिरात हा प्रसारमाध्यमांचा आत्मा असल्याची बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. यामुळे वर्तमानपत्रे ही छपाईसह एकूण उत्पादन मूल्यापेक्षा किती तरी कमी किंमतीत विकावी लागतात. अर्थात, ( जाहिरातींच्याच बळावर !)  प्रॉडक्शन कॉस्टपेक्षा कमी मूल्यात उत्पादन विकून नफा कमावण्याची क्षमता असणारा मुद्रीत मीडिया हा जगातील अशा स्वरूपाचा एकमात्र व्यवसाय बनला असल्याची बाब उघड आहे. तथापि, हेच बलस्थान कमकुवत होत असेल तर करावे तरी काय ? या विचाराने प्रसारमाध्यमांचे मालक हैराण झालेले आहेत. डिजीटल मीडियाच्या सुसाट आक्रमणाने पत्रकार धास्तावले असतील तर जाहिरातदारांच्या प्रश्‍नांनी वर्तमानपत्राच्या अर्थकारणाशी संबंधीत सर्व घटक अस्वस्थ बनणे तसे स्वाभाविक आहे.

नव माध्यमाने सर्वसामान्यांना अभिव्यक्तीसाठी सुलभ आणि मोफत माध्यम प्रदान केले आहे. डिजीटल मीडियाने प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण केले आहे. तर याच माध्यमाने जाहिरातदारांनाही सक्षम पर्याय दिलेला आहे. हा पर्याय मोफत आणि फार तर अल्प मूल्याचा असून यात विलक्षण पारदर्शकता आहे. गुगल सारख्या सर्च इंजिन्स पासून ते थेट फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवरील जाहिरातींची प्रणाली ही पारंपरीक प्रसारमाध्यमांपेक्षा बर्‍याच प्रमाणात वेगळी आहे. यात जाहिरातदाराला युजर्सची अचूक एंगेजमेंट कळते. कोणतीही जाहिरात ही नेमकी किती युजर्सनी पाहिली ? यावर ते किती वेळ रेंगाळले ? आणि त्यांनी यावर क्लिक केले की नाही ? या सर्व बाबींची माहिती अगदी बिनचूकपणे मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी जाहिरात पाहणार्‍या युजर्सचा वयोगट वा भौगोलिक परिसरही निवडण्याची सुविधा यात दिलेली आहे. यामुळे डिजीटल जाहिरातींमध्ये टार्गेट ग्रुप निवडणे हे तुलनेत खूप सोपे आहे. अर्थात, जाहिरात पाहिली/क्लिक केली तरच आकारणी अशी आत्यंतीक पारदर्शक प्रणाली डिजीटल मीडियामुळे जगासमोर आली आहे. एकीकडे वर्तमानपत्र, वाहिन्या, रेडिओ, होर्डींग्ज आदींवरील जाहिरातींच्या  परिणामकारकतेचे मापन हे 'अंदाज पंचे' या प्रकारात होत असतांना डिजीटल माध्यमात मात्र अगदी काटेकोर विश्‍लेषण मिळत असल्याने साहजीकच जाहिरातदार याकडे वळू लागले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, डिजीटल माध्यमातच त्यांना एकापेक्षा जास्त पर्याय असल्याची बाब देखील आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.


सोशल मीडियाच्या आगमनानंतर आपण स्व-प्रसिध्दी अर्थात सेल्फ पब्लीशींगच्या युगात प्रवेश केला असल्याचे मी आधीच्या लेखात स्पष्ट केले आहे. याच प्रमाणे आता जाहिरातदारांनाही स्व-प्रसिध्दीचे महत्व पटू लागले आहे.  माझे प्रॉडक्ट अथवा सेवेची माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी अल्प मूल्य लागावे आणि अर्थातच यातून व्यवसाय वृध्दी व्हावी ही अपेक्षा प्रत्येक जाहिरातदाराची असते. यासाठी त्यांना आता डिजीटल क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या मीडिया हाऊसेसला जाहिराती द्याव्यात; स्वत:चाच सोशल मंच बळकट करावा अथवा दोन्ही बाबी एकत्र कराव्यात असे तीन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामुळे समजा जळगावातील एका दुकानदाराला डिजीटल पध्दतीत जाहिरात करावयाची असेल तर त्याने नवमाध्यमात स्वत:चा डिजीटल मंच तयार करणे; डिजीटल मीडियात अग्रेसर असणार्‍यांना जाहिरात देणे वा दोन्ही बाबी करणे हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. वर्तमानपत्रात फक्त शब्द अथवा प्रतिमांच्या (ग्राफीक्स) मदतीने जाहिरात करणे शक्य असले तरी डिजीटल माध्यमात शब्द, प्रतिमा, व्हिडीओ, अ‍ॅनिमेशन्स आदी विविध प्रकार उपलब्ध असल्याची बाबदेखील विसरता येणार नाही. म्हणजेच, वर्तमानपत्रांची आधीची जाहिरातींची एकाधिकारशाही आता बर्‍यापैकी मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे.

खरं तर, अलीकडच्या काळाचा विचार केला तर होर्डींग्ज, पेपरमधील पँम्प्लेटस्, एफएम रेडिओ, रिक्षाच्या मागील बॅनर्स आदी अनेकविध प्रकारांनी वर्तमानपत्रांच्या जाहिरातींचा वाटा आधीच बर्‍यापैकी काबीज केला होता. मात्र डिजीटल माध्यमामुळे वर्तमानपत्रच नव्हे तर त्यांचा वाटा खाणार्‍यांनाही जबर धक्का बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. *गत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकारण्यांनी डिजीटल माध्यमाचा अतिशय खुबीने वापर केला असून याच्या पाठोपाठ आता व्यावसायिकही याच पध्दतीत विचार करू लागल्याचे आजचे चित्र आहे*. याचा मुद्रीत माध्यमाला मोठा फटका बसेल हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची आवश्यकता नाहीच ! मात्र, याचे आव्हान पेलणेदेखील कठीण नाही. यासाठी पारंपरीक माध्यमाला आजवरचा साचेबध्द विचार सोडून द्यावा लागणार आहे. 

  शेखर पाटील, जळगाव 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या