बाबूजी जरा धीरे चलना...




या विषयावर आता लिहावेच लागेल.  वृत्तपत्रविश्वातील दिग्गज असले म्हणून काय झालं.समव्यावसायिक असले म्हणून काय झालं.नियम,शिस्त,परिस्थितीचे भान, प्रसंगावधान आणि औचित्य पाळण्याची जबाबदारी काय फक्त जनतेची आहे.सरकारची आहे.प्रशासनाची आहे .चौथ्या स्तंभाची अजिबात नाही ? आज संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडले आहे.रोज हजारोंच्या संख्येने माणसे मरत आहेत.लाखो लोक मरणकळा सोसत मृत्यूशय्येवर प्रत्येक क्षण कंठत आहेत.अब्जावधी लोक दिवाभीतासारखे आपापल्या घरात न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगावी तसे कैद्यासारखे बसलेत.सरकार,पोलीस,प्रशासन,आरोग्य सेवेतील डॉक्टर्स,नर्स,अन्य कर्मचारी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.हे सगळे काय मूर्ख आहेत ? त्यांना त्यांच्या जीविताचे भय नाही ? घर कुटुंब नाही ? कुटुंबाची चिंता नाही ? अशावेळी जर महाराष्ट्र सरकारने काही दिवस वर्तमानपत्र वितरित करू नका म्हणून विनंतीवजा सूचना केली असेल तर हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला कसा काय होऊ शकतो ? यात कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आणि पत्रकारितेची गळचेपी आहे ? नाही छापले काही दिवस पेपर तर काय फरक पडतो ? आणि छापून तरी कोणती मोठी क्रांती करणार आहेत हे तथाकथित व्हाईस ऑफ महाराष्ट्र !

    स्वतःला महाराष्ट्राचा आवाज म्हणवून घेणाऱ्या दैनिकाने सरकारचा वर्तमानपत्र वितरित न करण्याचा निर्णय भलताच मनाला लावून घेतला.पहिल्यांदा जेव्हा सरकार असा काही निर्णय घेणार असा वास आला तेव्हा लोकमतने हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा पुंडावा करून पहिला .सरकार आणीबाणीत सुद्धा वर्तमानपत्राच्या वितरणावर बंदी आणू शकत नाही.ब्रिटिशांच्या गुलामीतही वर्तमानपत्र छापायला आणि वाटायला परवानगी होती असे दाखले देण्यात आले.दुसरीकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटना,वितरक एजन्सीज आणि दारोदार जाऊन वर्तमानपत्र वितरित करणाऱ्या हॉकर्स युनियन्सना गाठून पटवून अट्टाहासाने वर्तमानपत्र छापण्याचा आणि वितरित करण्याचा घाट घालण्यात आला.पण खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात तसे झाले.अनेक एजन्सी धारकांनी,वितरकांनी आणि हॉकर्सनी आम्ही पेपर वाटणार नाही असे सांगून पेपर उचलणे बंद केले.तुमच्या धंद्यासाठी आम्ही का म्हणून जीव धोक्यात घालायचे ? असा त्यांचा मुद्दा होता.मग वर्तमानपत्रातून कोरोना व्हायरसचा प्रसार होत नाही असे सांगणारे शास्रज्ञ शोधण्यात आले.त्यांच्या अभ्यासपूर्ण मतांच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या.दिव्यांग सुरमा भोपालीने तर चक्क पेपर छापताना आम्ही त्यावर सॅनिटायझरचे फवारे मारतो असे दाखवणारे व्हिडीओ सुद्धा व्हायरल केले.थोडक्यात बाबू मोशाय असोत की सुरमा भोपाली,दोघांनाही कोरोनाच्या संकटापेक्षा,कर्मचाऱ्यांच्या आणि पेपर विक्रेत्यांच्या जिवापेक्षा धंदा महत्वाचा आहे.गंदा है पर धंदा है.अपना काम बनता भाड मे जाये जनता हा त्यांचा खाक्या.नियमित पेपर विक्रेते हात आखडता घेत असल्याचे पाहून माध्यमक्षेत्रातल्या या भांडवली वर्तमानपत्रांनी वितरणाची समांतर यंत्रणा उभी करण्याचा देखील हातखंडा आजमावून पहिला.पण कसचे काय आणि फाटक्यात पाय.सगळेच मुसळ केरात.सुरमा भोपाली आणि बाबू मोशायचे सगळेच इरादे फसले.

       चौथा स्तंभ म्हणून याची ताकद काय ? तर सुबक छपाई,भरमसाठ आणि चकचकीत पाने,आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जाहिरातीच जाहिराती.बातम्या शोधाव्या लागतात.त्यातल्या निम्याहून अधिक पेड न्यूज.काही जाहिरात पुरस्कृत,तर काही मांडवलीच्या.बाकी मग राजकीय सुपारीच्या.आता या चोथ्यात विचार ,भूमिका ,प्रबोधन ,सत्यान्वेषण,जनतेचे प्रश्न,सरकारला सवाल हे कुठे असते म्हणून नका विचारू.फक्त आमचे खपाचे आकडे ऐका. इतके लाख.तितके लाख.आम्हीच नंबर वन.कशात ? तर खपात.काय छापतो याला महत्व नाहीच.किती छापतो याला महत्व.वर्तमानपत्र म्हणून लोकांच्या माथी सकाळी सकाळी ढीगभर रद्दी मारली की महाराष्ट्राचा आवाज आणि सुरमा भोपाली कलेक्शनला मोकळे.बरे खपाचे हे आकडे खरे असतात का ? कोण जाहीर करते हे आकडे ? तर यांनीच नेमलेल्या किंवा पाळलेल्या संस्था.म्हणजे सगळा चोरीचा मामला.बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.बरे त्यावरही एकमत नाही.हा म्हणतो तो फेक,तो म्हणतो हा फेक.सगळेच लबाड आणि खोटे.वाचक तरी काय ? ९० टक्के स्कीम साठी पेपर लावणारे.पेपर बाजूलाच रगी,चादरी,बॅगा,भांडी-कुंडी,गाड्या,मोबाईल,फ्रिज,क्वचित रो हाऊस,फ्लॅट,सोने वगैरे.हा काय प्रकार आहे ? वर्तमानपत्र चालवताय की कटलरी सामानाची दुकानं ?

     मुळात आजकाल लोक  पेपरच वाचत नाहीत.वाचण्यासारखं असतंच काय त्यात ? आदल्या दिवशी टीव्हीवर ऐकून पाहून चोथा झालेल्या बातम्या पुन्हा सकाळी पेपरात काय वाचणार ? आजकाल तर व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम,युट्युब आणि ट्विटरवर,अपडेट घडामोडींचा इतका भडीमार होतो की   सकाळी पुढ्यात येणारा पेपर सकाळीच शिळा असतो.आजचा पेपर उद्याची रद्दी असे पूर्वी म्हटले जात असे .आज स्थिती अशी आहे की आजचा पेपर ही आजचीच रद्दी ठरत आहे.यात वाचकांची काहीही चूक नाही.संपादक मजकूर वाचकांना वाचायला काही मजकुरच देत नाहीत.वाचक काय वाचणार डोंबलं ?
     थोडक्यात पेपर वितरणावर नियंत्रण आणले म्हणून उद्धव ठाकरेंवर आगपाखड करणाऱ्या आणि आम्ही जनतेपर्यंत माहिती पोहचवतो म्हणून साळसूदपणाचा शहाजोग आव आणणाऱ्या बाबू मोशाय आणि सुरमा भोपालीने आपण कशासाठी पेपर वितरणाचा आग्रह करतोय याचे जरा आरशात उभे राहून एकदा आत्मपरीक्षण करावे.स्वतःला एक साधा आणि सरळ प्रश्न विचारावा.मी जर कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतःला घरात लॉक डाऊन केले आहे.माझ्या कुटुंबियांनाही त्या बाबत सुरक्षित केले आहे तर मग वर्तमानपत्र विक्रेत्यांचे जीव धोक्यात घालून पेपरचा धंदा अबाधित ठेवण्याचा मला कोणता नैतिक अधिकार आहे.तुमच्याकडे भांडवल आहे,तुम्ही पेपर छापू शकता म्हणून काही पोटार्थी गुलामांची कोरोनाचे संकट अंगावर घेऊन तुमच्या अघोरी महत्वाकांक्षा पूर्ण करायच्या का ? याला सभ्य भाषेत मुडदेफरास प्रवृत्ती म्हणतात.

      कोरोनाच्या या रौद्रभीषण संकटात घराघरात पेपर जायला हवाच कशाला ? उलट सामाजिक जबाबदारी म्हणून या बड्या भावंडानी संयम राखत काही दिवस आपल्या धंदेखोरपणाला स्वतःच प्रतिबंध घातला तर तो एक आदर्श वस्तुपाठ ठरेल.कोरोनाचे संकट संपल्यावर घाला की काय रतीब घालायचा तो.आणि प्रश्न चौथ्या स्तंभाच्या अस्तित्व अस्मिता प्रतिष्ठा सन्मान आणि अधिकार किंवा कर्तव्य अथवा जबाबदारीचाच असेल तर त्यासाठी लाखांच्या खपाच्या आकड्यांची किंवा घरोघर दारोदार जाण्याची गरज नाही.आपण काही वासुदेव,पिंगळे.रायरंद,कुडबुडे,नंदीबैलवाले,कटलरी सामानवाले, किंवा चिंध्यांच्या बदल्यात भांडी देणारे बोहरी नाही आहोत.आपण टिळक -अत्रे -आगरकर -खाडिलकर आणि बाळकृष्ण जांभेकरांचा पत्रकारितेचा आदर्श वारसा सांगतो.या सगळ्या सोन्या-चांदीच्या,हिरे-माणिक -मोत्याच्या नथी आपल्याकडे आहेत.फक्त त्या घालायला आपल्याला नाकच शिल्लक उरलेले नाही.नथी घालणार कशात?

          बाळकृष्ण जांभेकर आपले आद्य आणि आराध्य दैवत.त्यांच्या दर्पण पत्रिकेचे किती अंक छापले जात होते ? फक्त शंभर.अंक किती लोकांपर्यन्त पोहचत असेल ? दोन-तीनशे.लोकमान्य टिळकांचा केसरी किती छापला जात होता ? चार-पाचशे पेक्षा जास्त नाही.किती भारतीय केसरी वाचत ? हजार बाराशे .त्यातले नऊशे ( गवसे नव्हे बरे ) पुण्यातले.तेही भवानी,सदाशिव,शनिवार,नारायण पेठेतले.पण त्यामुळे सातासमुद्रापार असलेले लंडन हाऊस हादरत होते.आगरकरांच्या सुधारकाच्या किती प्रति निघत असतील ? पाच पन्नास सुद्धा नाही.पण त्यांच्या लेखनामुळे या महाराष्ट्रात बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञाननिष्ठ पुरोगामी सुधारणावादी परंपरा निर्माण झाली.डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेली मूकनायक आणि आणखी सहा वर्तमानपत्रे.तुटपुंजे भांडवल,मोजकेच अंक.त्यांना  पाहिजे असलेल्या वाचकाला तर वाचताही येत नव्हते.पण मूकनायकने पाच हजार वर्षांची सामाजिक गुलामगिरी मोडीत काढली.आचार्य प्र.के.अत्रे यांचा मराठा आणि प्रबोधनकार ठाकरे यांची प्रबोधन पत्रिका.किती होता खप ? प्रबोधन पत्रिका कलानगरात तर मराठा वरळीत.पण या चिरोट्या धांदोट्यानी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन घडवले.दैनिक मराठवाडा.किती होता खप ? किती होती पाने ? चार पानांचा,काळा-पांढरा,खिळा पट्टीच्या मशीनवर छापला जाणारा पेपर.पण त्याने निजामशाही नेस्तनाबूत केली.शेवटचे उदाहरण महात्मा गांधींचे सांगिलेच पाहिजे.ते तर अनेकदा हातानेच लिहून पेपर बनवीत.ज्या ठिकाणी मुक्कामाला असत तिथे जमणाऱ्या लोकांना ते हस्तलिखित पेपर वाचायला देत.त्या मुळे या देशात जगातली पहिली अहिंसक क्रांती घडली हे सांगायला हवे काय बाबू मोशाय...बाबू मोशाय,राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनच्या 'आनंद'सिनेमात राजेश खन्नाच्या तोंडी असलेल्या ऐका संवादाची आपणाला आठवण करून देतो.

जिंदगी और मौत उपरवाले के हाथ मे है जहाँपनाह
जिसे ना आप बदल सकते है ना मै
हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है
जिसकी डोर उपरवालेकी उंगलीयो में बंधी है
कौन कब कैसे उठेगा....
कोई नहीं बता सकता
बाबू मोशाय,जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए !


आपण यातल्या प्रत्येक ओळीचा शब्दशः किंवा संदर्भासह अर्थ घेऊ नका.त्यात काही अनर्थ शोधूही नका.हे सगळं मांडण्यामागचा  हेतू प्रांजळ आणि प्रेमळ आहे.शेवटी आमचेही वृत्तपत्रीय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.असो सांगायचा मुख्य मुद्दा असा की प्रसंग संकटाचा आहे.अशावेळी आता चालेल 'मेरी मर्जी' असे म्हणून चालत नसते.सरकार म्हणतेय थांबा काही दिवस तर थांबा.आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत.काय ? बाबूजी जरा धीरे चलना...

- रवींद्र तहकिक   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या