धक्कादायक : मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण !



मुंबई  : राज्यात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या मुंबईतील 53 पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्या-या फिल्डवर कार्यरत असलेल्या सुमारे 167 पत्रकारांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने पत्रकारांचे अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.कोरोनाची लागण झालेल्या मीडिया कर्मचाऱ्यांमध्ये टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, प्रिंट फोटोग्राफर यांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाच्या संकटाची चाहूल लागल्यापासून काही माध्यमातील पत्रकार आजही फिल्डवर आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. खबरदारी म्हणून मुंबईतील फिल्डवर काम करणा-या पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. विविध माध्यमात कार्यरत असणा-या एकूण 167 पत्रकारांची गेल्या गुरूवारी कोरोना चाचणी करण्यात आली. एकूण 167 पत्रकारांच्या चाचण्या मधील काही पत्रकारांचे चाचणी अहवाल आज आले असून, त्यापैकी 53 पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी काही पत्रकारांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे असल्याचे सांगण्यात येते.

यासंदर्भात एका वृत्त संस्थेने याची माहिती ट्विट करून दिली आहे. मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील पत्रकारांच्या चाचण्या राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. नगरविकासमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून  खबरदारीचा उपाय म्हणून पत्रकारांना आरोग्य विषयक किटस उपलब्ध करून दिले जात आहेत. तर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील पत्रकार, कॅमेरामन आणि फोटोग्राफरसाठी कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक  दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सर्व पत्रकारांच्या तपासणीची विनंती केली. याशिवाय पॉझिटिव्ह पत्रकारांच्या क्वारंटाईनची चांगली व्यवस्था व्हावी, अशीदेखील विनंती जगदाळे यांनी महापौरांकडे केली. यावेळी महापौरांनीदेखील योग्य व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या