न्यूज चँनल्सचा भस्मासुर -सावध होणार की पारध ?




जवळपास आज सहा वर्ष झाली, मी न्युज चँनल्स पाहत नाही. डिसेंबर २०१३ पासून न्युज चँनल्स पाहणं बंद केलं. क्वचित प्रसंगी पाहीलं असेल तेवढंच! पण वृत्तपत्रांचे वाचन नियमित करतो,ज्यामुळे ज्ञान मिळते ते ही शांततेने!

निरपेक्ष वार्तांकनापेक्षा आरडा ओरड , आकांडतांडव , आरोळी, किंकाळी, डरकाळी आणि हंबरडा यांच्या साहाय्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे एवढाच बहुसंख्य न्यूज  चॅनल्सचा आवडता कार्यक्रम आहे..त्यातून  प्रेक्षकांना विचार करण्याला प्रवृत्त करण्याऐवजी  विचार कसा करायला हवा हे वारंवार ठसवून त्यांच्या विचार प्रक्रियेवरही नियंत्रण मिळवले आहे.  हातात रिमोट कंट्रोल घेऊन न्युज चॅनल्स पाहणा-यांना माहितही नाही, आपल्या मनाचा रिमोट कंट्रोलर न्युज चँनल्सच्या अँकरच्या हातात आपण केव्हाच सोपवला आहे. दोष या अँकर्सचा वा निवेदकांचा नसून चँनल्सला बाजारू करणा-या कर्त्या धर्त्यांचा आहे.

पत्रकारीता हे समाजप्रबोधनाचं माध्यम आणि लोकशाहीचा चवथा खांब असणे अपेक्षित आहे. पत्रकारांनी कायम विरोधी पक्षाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. त्यांनी  कोणताही सत्ताधारी पक्ष बेलगाम होऊ नये म्हणून त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे असते. द्रष्टा विचारवंत जॉर्ज ऑरवेल म्हणाले होते "  Journalism is printing what someone else does not want printed. Everything else is public reactions!"  या पार्श्वभूमीवर  भारतातील  अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके  अपवाद वगळता काय परिस्थिती दिसते? बहुसंख्य खाजगी न्यूज चॅनल्स ही तद्दन विकाऊ,  बाजारू  आणि आदमखोर  जनावरे असून जाती-धर्म-भाषा-वंश यांच्यात वैमनस्य निर्माण करणारा  विद्वेषी अजेंडा रेटणारे भाट ठरलेले आहेत. त्यांना लोकांच्या जीवाशी कांही देण घेणं नाही, त्यांना त्यांचा टीआरपी नि त्यांचा अजेंडा हाच महत्वाचा असतो.

लोक आपलं कांही करू शकत नाहीत,आपण वाट्टेल ते करू शकतो असा दंभ नि माज या न्यूज चँनल्स मधे असून ते स्वत:ला सरकार, न्यायालये, लष्कर, पोलिस यंत्रणा आणि अगदी संसदेपेक्षा महान समजू लागले आहेत.

न्यूज चँनल्सच्या समाजद्रोही उपद्रवाचा घोडा चौखूर उधळलेला असून,आज त्या घोड्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाला स्वत:वर स्वार होण्याची संधी दिली म्हणून खूष झालेल्या राजकिय नेत्यांना माहित नाही की, ते घोड्यावर स्वार नसून तो चँनल्सरूपी घोडाच त्यांच्यावर स्वार झालेला आहे.

मानवानेच वाढवून मोठा केलेला हा माहीतीचा भस्मासुर आज मानवालाच भस्मसात करण्याच्या स्थितीत पोचला आहे. आज न्यूज चँनल्स द्वेषाचे पीठ दळून, धार्मिक ध्रुवीकरण करत धर्मांध राजकारण्यांचे पोषण करत आहे. आज न्यूज चँनल्सच्या जात्यात मुस्लिम आहेत म्हणून आनंदी होणारांना हे माहीत नाही सुपात कोण कोण आहेत. उद्या दलित, आदिवासी, परवा दक्षिण भारतीय, आणि कांही दिवसांनी ख्रिस्ती वा शिख वा जैन, मारवाडी, कोणताही अल्पसंख्य समाज किंवा अगदी ब्राह्मणांसह कोणीही जात्यात असू शकतात. कारण प्रत्येकाकडे एक स्वतंत्र जाते असू शकेल आणि एकदा नरभक्षणाची सवय लागली की, मग मांस महत्वाचं असतं कोणाचं आहे हे नव्हे! म्हणून हा भस्मासूर रोखायला हवा! 

आरडा ओरडा करत, किंचाळत आणि लक्ष्य आकर्षित करत आपल्या केवळ विचारांवरच नव्हेतर विचार करणा-या प्रक्रियेवर देखील नियंत्रण मिळवलेली ही न्यूज चँनल्स माहीतीच्या नावाखाली आपलं माणूस म्हणून जगणं नष्ट करत आहेत.कांही वर्षांनी हे सर्व न्युज चँनल्सचे अँकर्स मनोरूग्णालयात उपचार घेताना दिसतील एवढं त्यांनी स्वत:लाही या बाजारू शर्यतीत मानसिक आणि नैतिक पातळीवर उध्वस्त केलेलं आहे.

न्यूज चँनल्स खूप बलवान झाली आहेत. मागे एकदा मी म्हणालो होतो, शेवटी कांही होवो! कोणी जिंकेल वा वाचेल, कोणी पराभूत होईल वा मरेल पण गिधाडं कधीच अर्धपोटी राहत नाहीत,ती पोटभर जेवण करतातच !कांही न्यूज चँनल्स याच गिधाडांच्या वृत्तीची आहेत. पण गिधाडे प्राणी म्हणून तरी प्रामाणिक आहेत कारण त्यांचा हेतु केवळ अन्न मिळावे हा आहे. आणि गिधाडे पृथ्वीवरील सडकी घाण दूर करून एकप्रकारे पृथ्वीला स्वच्छ करत असतात.  पण या अमानवी न्युज चँनल्सची वृत्ती ही  मानवी प्रेतांचा खच पाहून आनंदी  होऊन त्यापासून सुटलेल्या दुर्गंधीस सुगंध म्हणून पसरवणारी आहे असे म्हणता येईल. या न्यूज चॅनल्सना' गिधाडे'  म्हणणे  म्हणजे खरे तर गिधाडांचाच अपमान आहे! अर्थात कांही निवडक न्यूज चँनल्स आणि त्यातील कांही अँकर्स वा प्रतिनिधी हे सन्माननिय अपवाद आहेत.

काळ  माणसाला सावध होण्याच्या  खूप संधी देत असतो.  पण आपण सावध होणार की न्यूज चँनल्सच्या खेळात पारध होणार हे ठरविण्याची वेळ या  महामारीच्या काळात आपल्या समोर आली आहे.

© राज कुलकर्णी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या