पत्रकारितेच्या काही विद्यार्थ्यांना आज 'झूम' मीटिंगमध्ये मी हे सांगत होतोः
सोशल मीडियाच्या काळात आपण दोन टोकांमध्ये विभागले गेलो आहोत. एखादी चूक करणा-या पत्रकाराला फासावर द्या, अशी आग एकीकडे ओकली जशी जाते, त्याचप्रमाणे त्याला समर्थन देताना त्याला 'स्वातंत्र्ययोद्धा' करून टाकले जाते.
या दोन्हीच्या मध्ये वास्तव असते. पत्रकार होत असताना हे वास्तव तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.
मुळात, संबंधित वाहिनीने दिलेली बातमी अवास्तव, अनाठायी आणि विपर्यस्त आहे, हे आधी मान्य केले पाहिजे. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे काय घडले अथवा न घडले, हा मुद्दा नंतरचा. मात्र, ती चूक आहे. गंभीर चूक आहे. हे अनैतिक आहे. बातमी देताना, तिच्या परिणामांची ज्याला जाणीव नाही, तो संपादकच काय, पत्रकारही होऊ शकत नाही.
आणि, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना, अशा प्रकारची संवेदनशील बातमी एखाद्या वाहिनीवरच काय, व्हाट्सॲपवर सुद्धा देणे गैर आहे. अशा आपत्तीच्या वेळी तुम्ही लोकांच्या जिवाशी खेळता आहात, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे कोणती वाहिनीच काय, असा मजकूर एखाद्याने फेसबुकवर पोस्ट केला असता, तरी चौकशी झालीच असती. त्यामुळे इथे व्यक्तिगत असे काही नाही. अशा बातम्यांना धार्मिक रंग देणे हा तर गुन्हा आहे.
आता ज्या वाहिनीने ही चूक केली, तिनेच यापूर्वी अशा अनेक फेक बातम्या दिल्या आहेत. त्या फेक बातम्या संवेदनशील मुद्द्यांच्या संदर्भात होत्या, हे महत्त्वाचे. मग ते मराठा मोर्चाच्या वेळी केलेले तेढ पसरवणारे वृत्तांकन असो की मोहसीन शेखचे मॉब लिंचिंग असो. २०१४ साली पुण्यात झालेल्या जातीय हिंसाचारात मोहसीन शेख या तरूण अभियंत्याची माथेफिरू जमावाने हत्या केली होती. (यातील आरोपींनाही जामीन मंजूर झाला होता.) त्या संदर्भातली बातमी प्रसारित करतांना या वाहिनीने 'मोहसीनच्या फेसबुक पोस्टमुळे हे दंगे झाले', असा भयंकर थेट उल्लेख केला होता. तो वस्तुस्थितीला धरून नव्हता. विपर्यस्त होता. प्रत्यक्षात मोहसीननं अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट सोशल मिडीयावर केल्या नव्हत्या. ही चूक साधी नव्हे. (खरे तर तेव्हा या वाहिनीवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती. पण, तो काळ आणखी वेगळा होता!) नंतर या वाहिनीने माफी मागितली, पण घडायचे ते घडून गेले.या सगळ्या बातम्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. फेसबुक पोस्टमुळे दंगे होऊ शकतात, असे वाटणा-या वाहिनीला एका बातमीमुळे काही घडू शकते, हे मात्र समजत नाही. त्यांच्या या दोन्हीही गोष्टी अर्थातच निरागस नाहीत.
दोषीऐवजी भलत्याच माजी न्यायाधीशाचा फोटो काही सेकंद दाखवला, म्हणून एका इंग्रजी वाहिनीच्या विरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला गेला होता. तो अवास्तव होता, हे सोडा. पण, चुकीच्या मजकुराला एवढ्या गंभीरपणे घेतले जाते. त्यातही *संवेदनशील काळात अशा प्रकारच्या बातम्या देणे हा गुन्हा आहेच.
त्यामुळेच गर्दी जमली अथवा नाही, हे 'एक्स्क्यूज' होऊ शकत नाही. त्याचा तपास पोलीस करतीलच.
आणि, बाय द वे, माझ्या पुण्यातल्या बिल्डिंगच्या पूर्ण फ्लोरवर मी वगळता सर्व हिंदीभाषक आहेत. आणि, मराठी न्यूज चॅनल्स बघूनच त्यांना समजते, कोणता भाग सील केला आहे आणि कुठे, कधी दुकाने उघडणार आहेत. ते असो. त्या बातमीमुळेच केवळ ही गर्दी जमली, असे तर कोणीच मानत नाही. त्याच्या खोलातही जावे लागेलच. आता मुद्दा बातमीचा आहे. तुम्ही नायजेरियातून दिल्लीच्या बातम्या देण्यात गैर काही नाही. पण, त्याची खातरजमा नायजेरियातल्या गच्चीतून नव्हे, तर दिल्लीतूनच करायला हवी. आणि, ती खातरजमा होत नसेल, तर बातमीच काय, फेसबुक पोस्टही करू नये, ही साधी गोष्ट आहे.
तुम्ही खरेच 'एक्स्क्लुझिव्ह'च्या मागे धावणारे थोर पत्रकार आहात आणि फार वेगवानही आहात, तर तुमच्यापैकी कोणालाच पहाटेच्या 'त्या' शपथविधीची साधी चाहूलही कशी लागत नाही? चितळेंचे दुकान दुपारी एक ते चार उघडे राहाणार, ही तुमची ब्रेकिंग. 'कॉंग्रेसचा हात, पाकिस्तानला साथ!' हे तुमचं नॅरेटिव्ह.
त्यामुळे, 'आय सपोर्ट' वगैरे असा उगाच स्वातंत्र्ययुद्धाचा आव आणू नये. *'मॅगसेसे' मिळाल्यावर ज्या रवीशकुमारची "धड" बातमी तुम्ही लावली नाही, मुलाखत वगैरे दूरच, त्याची आता साक्ष काढू नये.* रवीशचं नाव घ्यायला उच्च धैर्य लागतं. चूक झाली. ती मान्य करावी. याचा अर्थ असा अजिबात नाही की, कोणाला फासावर द्यावे. कोणाला बॅन करावे वा कोणाला आयुष्यातून उठवावे.
पण, *'चोर ते चोर, वर शिरजोर', असा प्रकार करू नये. कायदेशीर प्रक्रियेला तोंड द्यावे लागेलच.* *मुख्य म्हणजे, वार्ताहराने नव्हे, संपादकांनी ती जबाबदारी घ्यावी लागेल. वार्ताहराचा बळी देणं अथवा त्याला 'हुतात्मा' करणं हेही अनैतिक आहे.* पोलिसांनीही वार्ताहराला अटक करण्याची गरज नव्हती. कायदेशीर प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक असते. असो.
हे बहुतेक सगळे पत्रकार, ॲंकर, संपादक माझे व्यक्तिगत मित्र आहेत. मी स्वतः या वाहिनीवर जाऊन अनेकदा बोललो आहे. यापुढेही जाईन. या वाहिनीतील अनेकांनी, मी संपादक असलेल्या दैनिकांत कॉलम चालवले आहेत. चालवत आहेत. यापुढेही चालवतील. या सर्वांविषयी मला प्रेम, आदर आहे. तसे तर, त्यांच्याइतके नसले तरी, देवेंद्र फडणवीसही माझे मित्र आहेत. या सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
इथे मुद्दा वेगळा आहे. टोकाचे समर्थन करणारे अथवा विखारी शिव्या घालणारे यांची आपापली गणिते आहेत. त्यांचे हात दगडाखाली आहेत.
पण, पत्रकारितेत प्रवेश करताना तुम्हाला तरी हे सम्यक भान असावे. म्हणून, एवढे सारे बोललो.
- संजय आवटे
1 टिप्पण्या
सडेतोड भूमिका आहे आपली.. खऱ्याला खरं..आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक आहे आपल्यात..
उत्तर द्याहटवा