'एकीकडे उघडा डोळे म्हणायचे आणि दुसरीकडे डोळे बंद करून बातमी द्यायची' अश्या चॅनलचा तथाकथित `राष्ट्रीय` पत्रकार राहुल कुलकर्णी याला न्यायालयाकडून जामीन मिळताच त्याने लगेच वांद्रे पोलीस स्टेशनसमोर पीटूसी करत आपली `कर्मकहाणी` सांगितली. त्याला एवढी घाई का आहे? हे समजत नाही. या असल्या `घिसाडघाई`मुळेच (हा एक शब्दप्रयोग आहे.) त्याच्यावर ही वेळ आली आहे. मी किती हाडाचा पत्रकार आहे, हे त्याला यातून सांगायचे आहे. युध्दभूमी कशी लढली, असा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. या प्रकारच्या उतावीळ रिपोर्टिंगमुळेच चॅनेलची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
राहुल कुलकर्णी हा कुणीतरी मोठा व्यक्ती आहे, हे काल आम्हास `बीजेपी माझा` चॅनेलवरील बातम्यांवरून समजले. तिकडे दिल्लीत कॉंग्रेसचे राहुल गांधी पत्रकार परिषद घेत होते. कोरोनाच्या विरोधात काय करायला हवे, अशा सूचना त्यांनी केल्या. मात्र, ती राहुल गांधींची बातमी या राहुल कुलकर्णीच्या बातमीसमोर `किल` झाली. एकंदरीत काय, दिल्लीच्या राहुल गांधीपुढे `उस्मानाबादी` राहुल कुलकर्णी भारी ठरला. यातून मीडियाचे लागेबांधे कसे आहेत, हे समजले. झी-२४ तास, साम टी.व्ही., टी.व्ही.९ मराठी, जय महाराष्ट्र, News 18 लोकमत, लोकशाही, AM News या एकाही वृत्तवाहिनीने राहुल कुलकर्णीच्या अटकेचे वृत्त प्रसारित केले नाही. जी बातमी बीजेपी माझा चॅनेलवर पहिली हेडलाईन ठरते. ती बातमी कोणत्याच वाहिनीवर दिसत नाही, हे विशेष. सगळ्या चॅनेलची युती आहे. कदाचित, उद्या आपल्या चॅनेलच्या रिपोर्टरलाही फेकन्यूजमुळे अटक होईल, ही धास्ती तुम्हाला असेल. तुम्ही कितीही झाकले तरी, सत्य लपून राहणार नाही. हे लक्षात घ्या. कोंबडं आरवायचं राहिलं म्हणजे सूर्य उगवणार नाही असे तुम्हाला वाटते का? प्रेक्षकांनी काय तुमची छी...थू...केलीय, याची तुम्हाला कल्पना आहे. विशेषतः वेबबाईट व सोशल मीडियातून तुमच्या पत्रकारितेची अक्षरशः लक्तरे काढली आहेत.
राहुल कुलकर्णीला अटक केल्याची बातमी तुम्हाला एवढी जिव्हारी लागते. त्यामुळे बीजेपी माझाने तर अशरशः थयथयाट सुरू केला. अशा कित्येक `फेकाड्या` बातमीमुळे अनेकांना किती त्रास होतो, हे तुम्हाला आज कळले असेल. ऊठसुट रात्रकारणी लोकांना गुन्हेगारांसारखे पाहून त्यांच्या बातम्या करता. अजित पवार बोलताना चुकले तर तुम्हीच पुढे होता ना माफी मागा म्हणून? नाहीतर, आम्ही अजित पवार यांची कोणतीही बातमी दाखवणार नाही म्हणून. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनाही नायक की खलनायक? ठरविणारे तुम्ही न्यायाधीश... कुठे गेली तुमची ही पत्रकारिता? प्रेक्षकही BAN BJP Majha म्हणून बहिष्कार घालताहेत. इलेक्शन आले की, सर्व वृत्तवाहिन्या, प्रिंट मीडिया हे पुढाऱ्यांकडे `पॅकेज` (All in One) मागतात. हीच का तुमची पारदर्शक पत्रकारिता? लोकशाहीचा हाच का तुमचा चौथा स्तंभ? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती गंभीर आहे. हीच तुमची `धंदेवाईक` पत्रकारिता तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाणार, हे वास्तव आहे.
भारतीय संविधानात कलम १९ (अ) नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला भाषणस्वातंत्र्य,लेखनस्वातंत्र् य दिले आहे. मीडियाला काही वेगळे अधिकार दिले नाहीत, हे लक्षात घ्या. तारतम्य ठेवून बातम्या द्या. तुमच्या हातात शस्त्र (प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया) आहे, म्हणून दुसऱ्याला भीती दाखवू नका. दिवसभर # I Support Rahul Kulkarni दाखवून प्रेक्षकांची मते बदलत नाहीत. ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व राजकारणी यांचे बाईटस हे तुम्ही कसे `मॅनेज` केले, याचा डाटाही आमच्याकडे आहे. कुणाचे हात दगडाखाली आहेत, तुमच्या माध्यमातून कुणाला काय साध्य करायचे आहे? याची इत्थंभूत माहिती आमच्याकडे आहे. पण, लक्षात घ्या, काळ बदलला आहे. प्रेक्षकांनाही इतर माध्यमे व्यक्त होण्यासाठी उपलब्ध आहेत, हे लक्षात असू द्या म्हणजे झालं. `तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण` हे असे चालणार नाही.
राहुल कुलकर्णीच्या फेकन्यूजवर संपादक महाशयांनी प्रांजळपणे माफी मागितली असती तर हा विषय एवढा ताणला गेला नसता, हे उघड आहे. पण, दुसरे चुकले तर त्यांना आम्ही माफी मागायला लावणार? आम्ही चुकलो तर माफी मागणार नाही, ही उद्दामवृत्तीच तुम्हाला एक दिवस रसातळाला नेणार, हे उघड सत्य आहे.
राहुल कुलकर्णीच्या समर्थनार्थ `मॅनेज` केलेल्या फक्त `बाईटस`वर ऑनलाईन उतरलेल्या अतिशहाण्या विचारवंतां नी वांद्रे येथे काही अप्रिय घटना घडली असती तर सरकारलाच दोष दिला असता, हे वास्तव आहे. पण, राहुल कुलकर्णीच्या समर्थनार्थ कुणीही सामान्य माणूस उतरला नव्हता, हे स्पष्ट आहे. अर्थात, `कांडेकरां`नी वांद्रे पोलीस स्टेशनला भेट देऊन `कुलकर्णी`ची पाठराखण केली. (त्या ठिकाणी रिपोर्टर कांबळे, शेख असता तर अशी पाठराखण झाली असती का? हा एक प्रश्न अनुत्तरीत आहे.)
जाता-जाता :
कोरोना विषाणू महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात तब्बल एक लाखांपेक्षा जास्त जणाना कोरोना विषाणूंची लागण झालीय, अशी धादांत फेकन्यूज पुन्हा बीजेपी माझाने दिली आहे. (एक लाखांचा आकडा कुठून आणलाय, त्यांनाच विचारा बुवा!) सोबत जोडलेला स्क्रीन शॉट पाहा. आता या बीजेपी माझाला काय झालंय? हेच समजत नाही.
दुसरीकडे, कोरोनाची फेकन्यूज दिल्याप्रकरणी Times Now या वृत्तवाहिनीच्या वार्ताहर श्रीमती मेधा प्रसाद, निवेदक व टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
पाहा : एबीपी माझावरील कारवाई योग्य की अयोग्य? : निखिल वागळे
-बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या