राहुल कुलकर्णीला असाच सोडायचा का ?



एरवी कोणत्या नेत्याने कोणता साबण शाम्पू वापरला,स्प्रे कोणता मारला,कोणत्या ब्रॅण्डची अंतर्वस्रे घातलीत यावर अंदर की बात म्हणत चवीने लाईव्ह चर्चा करणारे आमचे झुंझार धुरंधर पत्रकार वांद्रे स्टेशनवर जमलेल्या गर्दीचे नेमके गौडबंगाल काय ? यावर काहीच बोलायला तयार नाहीत.राजीव खांडेकरांची बोलती बंद झालीय हे ठीक.पण बाकीच्यांनी का मूग गिळलेत ? आशिष जाधव.उमेश कुमावत,ज्ञानदा,निखिला,प्रसन्न,इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे सगळेच कसे काय गप्प ?  कोणतीच वृत्तवाहिनी किंवा कोणताच पत्रकार काहीच बोलायला किंवा दाखवायला तयार नाही.वांद्रे वर गर्दी जमलीच कशी ? गर्दी जमली की जमवली ? त्या मागचा हेतू काय ? त्या मागचा सूत्रधार कोण ? पाच पन्नास,शे पाचशे नव्हे तब्बल आठ-दहा हजार लोक वारुळातून मुंग्या बाहेर पाडाव्यात किंवा मोहळाच्या माशा जमाव्यात तसे अचानक ठरवल्या प्रमाणे बरोबर टायमिंगवर जमतातच कसे ? ते ही मुंबईत कडक लॉक डाऊन असताना.आणि पाहिजे ते घडताना दिसत नाही.हे पाहताच फुगलेली गर्दी तितक्याच शिस्तबद्ध रीतीने वीरूनही जाते.

हे जरा नव्हे बरेच शंकास्पद आहे.जमलेली गर्दी परप्रांतीय मजुरांचीच होती की की दुसरेच कोणी तिथे वेगळेच कर्तव्य बजावण्यासाठी जमले होते ? विनय दुबे हा यातला मुख्य सूत्रधार आहे की मोहरा ? त्याने फेसबुकवरून 'गाव चलो'चा नारा दिला,हे खरे पण त्या साठी वांद्रे स्टेशन निवडण्यामागे काय पॉईंट होता ? या प्रकरणी आणखी १५ जणांना अटक झाली आहे ती हा मेसेज व्हायरल केला म्हणून.पण आणखी ३० -४० अकांउंट असे आहेत ज्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून मेसेज सेंड-फॉरवर्ड आणि व्हायरल केले आहेत.कॉमेंट्स टाकल्या आहेत.त्यांची देखील चौकशी तपासणी आणि मुख्यम्हणजे आयडेंटी तपासणे आवश्यक आहे. 

  वांद्रेवर जमलेली गर्दी रिकाम्या हाताने आलेली होती.ना बॅगा, ना पिशव्या,ना सामान ना तिकीट काढण्यासाठी पैसे.बरे हे सगळे बायका मुलांना इकडेच सोडून एकटेच गावाकडे जाणार होते का ? त्या ठिकाणचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.त्यातले संवाद ऐकले की तिथे काहीतरी काळेबेरे घडणार होते किंवा घडावे असे अपेक्षित होते अशी शंका नव्हे खात्री पटते.गर्दी पाहून पोलीस विचलित व्हावे.सरकार विचलित व्हावे.पोलिसांनी लाठीचार्ज करावा.गर्दी बिथरावी.चेंगराचेंगरी व्हावी.कदाचित गोळीबार.एखाद दुसरा मृत्यू किंवा जखमी.मग त्यावरून आपोआपच राजकीय,सामाजिक वातावरण तापले असते.त्यावर सरकारच्या बदनामीचे वांगे भाजता आले असते.कोणाला तरी असे काही अघटित घडावे असे अपेक्षित तर नव्हते ना ? नागपूरमध्ये १९९४ मध्ये घडलेल्या गोवारी हत्याकांडासारखे काहीतरी.पण सुदैवाने असे काही घडले नाही.तूर्तास विनय दुबे आणि आणखी दहा पंधरा जणांना अटक झाली आहे.पण कोरोनाच्या कहरात त्यांच्याकडे पाहायला कोणालाच वेळ नाही.प्रसंग बाका आहे.त्यामुळे केसाचे उकिरडे उकरण्यात मतलब नाही,पण या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे.कारण ही सहज अचानक अनाहूत अनपेक्षित घडून गेलेली घटना नाही.

विनय दुबेने पसरवलेली अफवा हा केवळ खोडसाळपणा किंवा सवंग प्रसिद्धीचा उपद्व्याप  नसून  व्यापक षडयंत्राचा भाग आहे.घटनाक्रम आणि घटना पाहता हे एक पाताळयंत्री कटकारस्थान होते,याची खात्री पटते.ते असफल झाले हे महाराष्ट्राचे भाग्य.पण कटवाल्याना हवे ते घडले असते तर आज महाराष्ट्रात आणीबाणी घोषित झाली असती.म्हणून ही घटना किरकोळ म्हणून सहजासहजी सोडून देता येणार नाही.विनय दुबे अंदर आहे.पण एबीपी माझाचा राहुल कुलकर्णी जामिनावर सुटलाय.दुसरीकडे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी राहुल कुलकर्णीचा मस्तकाभिषेक करून त्याला पावनही करून घेतले आहे.

रेल्वे खात्याने काढलेल्या जीआरची बोटभर चिंधी राहुल कुलकर्णीचा नागडेपणा लपवू शकत नाही.त्याने दिलेली बातमी फेक बनावट तर होतीच.त्याहून गंभीर बाब म्हणजे जर हे सगळे षडयंत्र किंवा कट कारस्थान असेल तर राहुल कुलकर्णी त्या कटाचा भाग आहे.त्याने अफवेची आणि अर्धवट माहितीची आपल्या कल्पनेने शहानिशा न करता बातमी केली असेल तर तो देखील गुन्हाच आहे.केवळ अनभिज्ञता,अनावधान असे शब्द वापरून राहुल कुलकर्णीने केलेल्या शी वर पाणी ओतता येणार नाही.राहुल कुलकर्णीवर पांघरून घालण्यासाठी बरेच पत्रमहर्षी पंडित शास्त्री आपापले कमंडलू घेऊन सरसावले .त्यात वसंत मुंडे आहेत,प्रवीण बर्दापूरकर आहेत.स्वतः राजीव खांडेकर तर आहेतच.आपल्या व्रात्य कार्ट्याने शेजारच्या मुलीची छेड काढल्यावर बाप जसा पोराचे खोटे खोटे कान पिरगाळून प्रकरण अंगलट येणार नाही याची काळजी घेतो तसा प्रकार मीडियातले महामानव करताना दिसत आहेत.काय तर म्हणे समव्यावसायिकाला सांभाळून घ्यावे.आज त्याच्यावर वेळ आहे.उद्या आपल्यावर आहे.व्वा ! म्हणजे तुमच्याही बुडाखाली अंधार आहे म्हणायचा.तरीच म्हटलं सगळे चिडीचूप गप्प कसे ? मामला चोरीचा आहे तर.पण गड्यानो प्रश्न प्रसंग माणसांच्या जगण्या मरण्याचा आणि अस्तित्वाचा आहे.इतकेही धंद्यावर येऊ नका.आणि हो राहुल कुलकर्णीला असाच सोडायचा का ? आणि सोडायचा तर का म्हणून ते मला कोणीतरी समजावून सांगा बुआ.

- रवींद्र तहकिक   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या