महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापुरातून गाशा गुंडाळला

40 कर्मचाऱ्यावर  बेकारीची कुऱ्हाड 


कोल्हापूर - कोरोना विषाणूचे मीडियावर साईड इफेक्ट्स दिसू लागले आहेत, स्मार्ट मित्र म्हणणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापुरातून गाशा गुंडाळला असून, त्यामुळे जवळपास 40 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने मोठा गाजावाजा करून सन 2011 - 12 मध्ये कोल्हापूर आवृत्ती सुरू केली होती, केवळ 99 रुपयांत वर्षाभर अंक, अशी स्कीम राबवून  रद्दीच्या भावात अंक दिला होता, तरीही कोल्हापूर आवृत्तीचा म्हणावा तसा खप नव्हता.त्यात जाहिरात बिझिनेस थंडच होता, त्यामुळे आवृत्ती प्रचंड तोट्यात सुरू होती.

त्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या  लॉकडाऊनमुळे अंकाचे वितरण होत नव्हते, अगोदरच तोटा त्यात कोरोनाचा जोरदार झटका महाराष्ट्र टाइम्सला बसला . कोल्हापूर आवृत्ती बंद करण्याचे संकेत गेल्या काही दिवसापासून सुरु असताना  महाराष्ट्र टाइम्सच्या मॅनेजमेंटने कोल्हापूर आवृत्ती बंद करण्याचा निर्णय काल जाहीर केला. आज सर्वांचे हिशोब सुरु असून, तीन महिन्याचे वेतन देऊन त्यांना नारळ देण्यात येणार असल्याचे समजते. 

विजय जाधव सध्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली 10 जणांची संपादकीय टीम होती, तसेच जाहिरात, वितरण, प्रशासकीय टीम असे मिळून जवळपास 40 कर्मचारी होते.  आवृत्ती बंद झाल्यामुळे या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने केवळ नऊ वर्षात कोल्हापूरला बाय बाय म्हटले आहे. 

ताजा कलम 

महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापूर पाठोपाठ जळगाव आणि नगर आवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ पैकी तीन आवृत्या बंद करण्यात आल्या असून, आता औरंगाबाद आणि नागपूर आवृत्तीवर गंडांतर आले आहे.

  नगर आणि जळगाव आवृत्ती उद्या १३ मे पासून बंद तर कोल्हापूर आवृत्ती ३१ मे पासून बंद होणार आहे. तीन आवृत्तीचे मिळून जवळपास ८० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.   

 नगर,जळगाव आणि कोल्हापूर नंतर नेस्ट कोणती आवृत्ती, यावर महाराष्ट्र टाइम्स कर्मचाऱ्यामध्ये चर्चा सुरु आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या