राज्यातील पोलिसांपाठोपाठ बडे सनदी अधिकारी कोरोनाच्या कचाट्यात सापडल्यानंतर आता प्रसारमाध्यमांमध्येही या महाभयंकर आजाराची लागण झाली असून बुधवारी यातील पहिल्या बळीची नोंद मुंबईत झाली आहे. राज्यातील एका आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीतील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाने पोलीस खात्यातल्या कर्मचारी-अधिकारी, डॉक्टर, यांच्या पाठोपाठ बड्या सनदी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केलं आहे. बुधवारी यात माध्यमकर्मीची नोंद झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच राहायला भाग पाडून या मराठी वाहिनीने वृत्तप्रसारणाचे काम सुरु ठेवले होते. त्यातील बहुसंख्य कर्मचारी पॉझिटिव्ह होऊन वेगवेगळ्या रुग्णालयात आणि विलिनीकरण स्थळी उपचार घेत आहेत.
सदर चॅनेलच्या आयटी विभागात काम करणारा हा कर्मचारी दुसऱ्या एका लोकप्रिय खासगी वहिन्यांच्या समूहातील मराठी वाहिनीतून दोन वर्षांपूर्वीच या नव्या वाहिनीत रुजू झाला होता. ज्येष्ठ-जाणकार असलेल्या या तंत्रज्ञाचा बुधवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर प्रसार माध्यमांचं विश्व हादरुन गेले. या तंत्रज्ञाला अनेक सहकाऱ्यांना वृतनिर्मितीच्या काळात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली जात होती. त्यानुसार त्याने अनेक सहकाऱ्यांना त्यांच्या संगणकाजवळ जाऊन त्यांचं शंका निरसन करुन दिलं आहे. त्यामुळे अनेकजण त्याच्या संपर्कात आल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या वाहिनीतील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची वाढती संख्या आणि या तंत्रज्ञाचा झालेला मृत्यू यामुळे वाहिनीतील कर्मचारी कमालीचे भयभीत झाले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची तपासणी वाहिनी व्यवस्थापनाने करावी अशी मागणीही या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर करण्यात येत आहे.
आतापर्यंत मुंबईतील विविध दूरचित्रवाहिन्या आणि वर्तमानपत्र यांच्या पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. काही चॅनेलची कार्यालयं तर काही वर्तमानपत्रांची कार्यालयं मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आली आहेत. आता माध्यमांतही कोरोनाच्या मृत्यूने सर्व माध्यमकर्मींची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. मुंबईत आतापर्यंत ७५ हून अधिक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यातील ६० हून अधिक पत्रकार, कॅमेरामन आणि फोटोग्राफर यांनी कोरोनाला हरवले आहे.
साभार - आपलं महानगर
0 टिप्पण्या