मराठी पत्रकार विश्वात बेकारीचा कोरोना


आधीच आतबट्टयात असणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायावर कोरोना आणि लॉक डाऊनमुळे कुऱ्हाड कोसळली आहे.'अ' वर्ग दर्जाच्या,राज्यभर आवृत्त्या असणाऱ्या मोठ्या आणि व्यावसायिक वर्तमानपत्रांची आर्थिक स्थिती सुद्धा डबघाईला आलेली असून 'ब' आणि 'क' दर्जाच्या वर्तमानपत्रांची तर अक्षरशः वाताहत झाली आहे.बरे तोट्यात आहे म्हणून धंदा बंद करावा तर पुन्हा मग सुरु करणे शक्य होणार नाही.पाने कमी करण्याचा पर्याय दात कोरून पोट भरण्यासारखा आहे.माणसे संभाळावीत तर त्यांचा पगार देणे परवडत नाही.काढून टाकावीत तर कामे कोणी करायची ? कॉस्ट कटिंगच्या नादात अनेक बड्या वर्तमानपत्रांनी धडाधड आवृत्त्या बंद करण्याचा,कर्मचारी कपातीचा आणि आहेत त्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा अघोरी उपाय अवलंबला आहे.

एवढे करूनही खड्डा भरत नाही.फक्त सरकारी जाहिरातीवर मदार ठेऊन भागणार नाही.मार्केट मधून पहिल्यासारखा जाहिरातीचा सोर्स तूर्तास तरी सुरु होईल असे दिसत नाही.कमर्शियल सोडाच स्थानिक राजकीय किंवा अन्य जाहिराती 'लॉक' झाल्यात.छोट्या जाहिराती-जाहीर प्रगटने सुद्धा मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.कोरोना आणि लॉक डाऊन अजून किती दिवस चालणार याचा काहीच अंदाज नाही.इथे तर पेपरची
अवस्था व्हेंटीलेटरवरच्या पेशंट सारखी होऊन बसली आहे.पेशंट गेल्यात जमा आहे.वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत,होप्स ठेवा.बी-पॉजिटीव्ह.असा एकमेकांना आणि स्वतःच्या मनाला दिलासा देत आला दिवस ढकलायचा आणि एक दिवस काढला की आपण स्पर्धेत आणि रांगेत आहोत याचे समाधान मानायचे.अशी स्थिती वृत्तपत्र मालकांची आहे.

कर्मचाऱ्यांची परिस्थिती अमीर खानच्या 'थ्री इडियट'सिनेमातल्या गाण्यासारखी आहे.'मुर्गी क्या जाने,अंडे का क्या होगा...लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा' ! सिनेमा,उद्योग-धंदे,व्यवसाय,अगदी मजूर-हमाल-सलूनवाले-तृतीयपंथी अशा संघटित-असंघटित क्षेत्रातील बेकारीच्या कथा वर्तमानपत्रात छापून येत आहेत.पत्रकारीतेतलेच ' जेष्ठ अनुभवी तज्ज्ञ' त्यावर चिंतन,विश्लेषण,विचार मंथन करताहेत.या बिचाऱ्यांना आपल्या बुडाखाली काय जळतंय हे माहीतच नाही.किंवा मग कळत असून ते त्याकडे दुर्लक्ष करताहेत.गोची अशी आहे की त्यावर चर्चा करायची कुठे ? व्यथा सांगायची कोणाला ? आणि प्रश्न सोडवणार कोण ? जसे की काही वर्तमानपत्र त्यांच्या आवृत्या बंद करताहेत,कर्मचारी कमी करताहेत.पगार कापताहेत.या विरुद्ध आवाज उठवायचा कोणी आणि कुठे ? कापायला घेतलेल्या बोकडाबद्दल दावणीला बांधलेली बोकडं सहानुभूती बाळगत नाहीत तशी परिस्थिती आहे.

बरे पत्रकारांच्या हक्कासाठी किंवा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कुणावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र होण्याची,एकजुटीने लढण्याची परंपरा पत्रकार विश्वात नाही.इथे सगळे स्वतःला स्वयंभू मानतात.शिवाय पत्रकारितेतही अनेक 'खानदानी' ,'शाह्या' आणि 'कंपू' आहेत.कोणत्याही पेपर मध्ये जा,अत्यंत हीन दर्जाची,जीवघेणी,कद्रू .कृपण,विकृत आणि आसुरी स्पर्धा आहे.आतून पोखरलेली किडलेली आणि वरवर बेगडी अशीकचकड्याची बनलेली अशी ही तकलादू इंड्रस्टी आहे.आजवर ती कशीबशी तग धरून होती,आता कोरोनाच्या संकटात ती पार कोलमडण्याच्या बेतात आहे.तिला सावरायचे कसे ? बड्या वर्तमानपत्रांच्या मालकांना फार फरक पडणार नाही.

पापाचे रांजण काठोकाठ भरून ते केव्हाच वाल्याचे वाल्मिकी होऊन बसलेले आहेत.अडचण आहे ती रामाची बायको पळवणाऱ्या रावणाची लंका जाळण्याच्या नादात स्वतःची शेपूट जाळून घेऊन पुन्हा वरतून स्वतःचे तोंड काळे करून घेणाऱ्या 'बजरंगांची' ! छाती फाडून निष्ठा दाखवली तरी त्यांच्या माथी शेवटी 'शेंदूर'च आहे.मी हे सगळं पत्रकारांची हुर्रेवाडी उडवण्यासाठी लिहीत नाही आहे,सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने मी देखील या सिस्टीमचा भाग आहे.म्हणूनच जरा पोटतिडिकीने लिहितोय.मोदी म्हणतात आत्मनिर्भर बना.कसं बनायचं आत्मनिर्भर ? वृत्तपत्र उद्योगाने...आणि त्यातल्या पत्रकार -कर्मचाऱ्यांनी ? कोरोना व्हायरसची जशी अजून 'लस' सापडायची आहे तशीच या प्रश्नांचीही 'नस' अजून सापडायची आहे.मग वाचकांची 'नस'कळल्याचा कोणी कितीही दावा करोत.

-रवींद्र तहकिक
७८८८०३०४७२ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या