भारतीय पत्रकारिता ...आपला मीडिया अंत्यविधीचे सामान विकणाऱ्या दुकानासारखा आहे. कुणाच्या घरात रडारड सुरू झाली की यांची चूल पेटते. मग कुणी सेलेब्रिटी मरो, गँगस्टर मरो, जवान मरो, नेता मरो, शेतकरी मरो, विद्यार्थी मरो, कुणाचं लग्न तुटो, कुणाला दुखापत-अपघात होवो, कुणाला कोरोना होवो, कुठे तोडफोड होवो, कुठे दंगल-खून होवोत, कुणी कुणाला शिवीगाळ करो, कुठे युद्ध होवो की कुठे बलात्कार होवो!

लहानपणी लोकांची लफडी आणि त्याचं बटबटीत वर्णन आणि चित्रे पाहायला आम्हाला खास पोलीस टाइम्स विकत घेऊन वाचावा लागायचा. आजकाल तो घ्यावा लागत नाही, कारण ब्रेकींग न्यूजच्या नावाखाली आजचा मीडिया 24 तास ती बटबटीत चित्रे आणि विकृत भावना सर्वांपर्यंत त्यांच्या दिवाणखान्यात पोहोचवतो. त्यावर तडका म्हणून काही भिकारडे पक्ष-संघटनाचे प्रवक्ते, आगलावे धर्मगुरु, रिटायर पोलीस-आर्मीवाले, मूर्ख ज्योतिषी, पेज थ्री महिला आयोग, तथाकथित तज्ञ त्यात स्वतःच्या पोटाची खळगी भरायला त्या चित्राला अजून विकृत करून दाखवतात.

समाजात घडलेल्या कुठल्याही विकृत घटनेपेक्षाही ती घटना का घडते याचे कारण शोधणे महत्त्वाचे असते, आणि अशा घटना घडू नयेत म्हणून काय करायला हवे यासाठी तज्ञ लोकांनी उपाययोजना सांगाव्यात, आणि मीडियाने त्यासाठी लोकजागर करून व्यवस्थेवर दबाव आणावा लागतो. 2014 साली शिकागोच्या एअरपोर्टवर तिथले न्यूज चॅनेलवर Cyber bullying ने एका शाळकरी मुलीबाबत घडलेल्या घटनेबाबत शांतपणे होणारी चर्चा पाहताना मला आपल्या देशात खड्डयात पडलेला प्रिन्स आणि त्यावेळच्या बातम्या आठवल्या.

BBC किंवा अल जझिरा पाहताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते की ते कुठल्याही घटनेला सनसनाटी करत नाहीत. कुठलेही भयप्रद किंवा कर्कश्श संगीत (?) तिथे बातम्यांच्या मागे सुरू नसते. बातमी ही फक्त बातमी म्हणून सांगितली जाते, आणि त्या बातमीबाबत चर्चा करताना कुठलेही ट्विटर ट्रेंड, घंटी वाजवा अभियान, ओंगळवाणे ग्राफिक्स आणि सनसनाटी वाक्ये दाखवली जात नाहीत. माझ्या फोनमधल्या BBC च्या app वर महिन्यातून 2-3 वेळा ब्रेकिंग न्यूज म्हणून push notification येते, जेव्हा खरंच काही महत्त्वाचे घडले असेल तेव्हा. आमच्याकडे मिकाने राखीचा घेतलेला मुकाही 3 दिवस ब्रेकींग न्यूज म्हणून चालतो!भारतात शांतपणे न्यूज पाहायच्या असतील तर दूरदर्शन, राज्यसभा टीव्ही आणि NDTV वगैरे मोजकेच पर्याय शिल्लक आहेत. सरकारी चॅनेल नेहमीच सगळं गोड चित्र दाखवतात, पण त्याव्यतिरिक्त राज्यसभा टीव्हीवर लोकांच्या मुलाखती पाहण्याजोग्या असतात. आपण मीडिया आणि मनोरंजन यातला फरक विसरत चाललो आहोत कारण आपला मीडिया TRP मधून येणाऱ्या जाहिरातींवर जगतो. एकही न्यूज चॅनेल काळ्यासावळ्या पोरीला अँकर बनवत नाही, कारण त्या अँकरमध्ये आणि एअरहोस्टेसमध्ये काही फरक शिल्लक राहिला नाहीये. रुबिका लियाकत, श्वेता सिंग, अंजना ओम कश्यप वगैरे स्त्रिया पत्रकार आहेत याला कारण आपला बुभुक्षित समाज आहे.

आपल्याकडे अपवादाने काही पत्रकार चांगले काम करतात, पण ते चांगले पत्रकार कधीही अँकर किंवा संपादक बनू शकत नाहीत, कारण त्यांना TRP च्या धंद्याचं गणित कळत नाही. मूल्याधिष्ठित पत्रकारिता ही भारतात खूप कमी पत्रकारांकडे अस्तित्वात आहे, आणि ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी एकतर त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत किंवा त्यांच्यावर केसेस होऊन त्यांनी पत्रकारिता सोडली आहे. काही चांगले पत्रकार YouTube वर स्वतःचे चॅनेल चालवून जीवन जगत आहेत, पण त्यांना ते coverage मिळणे आजतरी अशक्य आहे जे उथळ आणि लाचार पत्रकारांना प्राईम टाइममध्ये सहज मिळते.

प्रिंट मीडियातल्या पत्रकारांची तर अवस्था अजूनच वाईट आहे. 8-10 हजारांवर त्यांना काम करावे लागते जे किमान वेतनापेक्षा कमी असते. त्या पत्रकारांनी त्यांचा उदरनिर्वाह पाकिटे घेऊन करावा ही वर्तमानपत्र मालकांची अपेक्षा असते. अशा नाडल्या गेलेल्या पत्रकारांकडून निष्पक्ष किंवा निर्भीड पत्रकारितेची अपेक्षा करणेच चूक आहे. त्यांना सत्यापेक्षा स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरणे महत्त्वाचे असते आणि त्यात त्यांची चूकही नसते. पुण्यातल्या एका नामांकित दैनिकात पत्रकारांना जाहिराती आणण्याचे टार्गेट दिले गेले होते, ज्यावर त्यांचा पगार अवलंबून होता. त्या पत्रकाराने कशी पत्रकारिता करावी?

भारतातल्या पत्रकारितेवर श्रीमंत मालकांचा, कॉर्पोरेटचा कब्जा आहे. मालकांच्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांच्या आड कुठलाही पत्रकार आला तर तो घरी पाठवला जातो. दुसऱ्या बाजूला भारतीय समाज मीडियाला शिव्या देत असला तरी त्याला मीडियाची entertainment value आणि sensational असणे आवडते. म्हणून TRP चा खेळ, पैशाची आवक आणि पत्रकारितेच मरण हे दुष्टचक्र सुरू राहते. भारतातल्या पत्रकारितेची कबर खोदण्यात प्रेक्षक, पत्रकार, मालक आणि राजकीय-धार्मिक व्यवस्था समानतेने जबाबदार आहेत. आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण स्वतः सुरुंग लावून उध्वस्त केला आहे!

- डॉ. विनय काटे

Post a Comment

0 Comments