25 हजाराची लाच घेताना 2 पत्रकार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात



सातारा :  सातारा  जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात खंडणी आणि लाच प्रकरणात पत्रकार अडकल्याचे तीन गुन्हे घडले आहेत. त्यात  वाळु तस्करीस मदत करण्यासाठी लाच स्विकारताना 2 पत्रकारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई म्हसवड येथे झाली आहे. या कारवाईमुळे संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली असून अ‍ॅन्टी करप्शनने ताब्यात घेतलेल्यांमध्ये पुण्यातील एका दैनिकाच्या पत्रकाराचा समावेश आहे.

अमोल अदिनाथ खाडे (31) आणि जयराम विठ्ठल शिंदे (32) अशी लाच घेताना ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. वाळु तस्करीस मदत करण्यासाठी दोघांनी संबंधित तक्रारदाराकडे 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. पहिला हप्ता म्हणून आज त्यांनी 25 हजार रूपये स्विकारले आहेत. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शन पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उप अधीक्षक सुषमा चव्हाण, पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चोगुले, पोलिस हवालदार संजय सपकाळ, संजय कलगुटी आणि पोलिस नाईक मकानदार यांच्या पथकाने सापळा रचुन त्यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की दोघेही पत्रकार असून त्यामधील एकजण पुण्यातील दैनिकाचा पत्रकार आहे तर दुसरा पत्रकार हा सातार्‍यातील आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र आढळले असल्याचे देखील पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले आहे. दरम्यान, ही कारवाई काही वेळापुर्वीच झाली असल्याने त्याबाबत अधिक माहिती लवकरच देण्यात येईल असे पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी  सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या