दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पुणे पोलिस आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या शोधात

पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप व एक महिला असे तिघे पुणे पोलिसांच्या ताब्यात !


पुणे :  शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अकविण्याची धमकी देत रास्ता पेठेतील जागा आणि 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन आणि शहरासह जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रवींद्र बऱ्हाटे यांच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जैन, जगताप व एक महिला अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, बऱ्हाटे व चव्हाण यांचा शोध सुरु आहे. 

कोथरूड पोलिस ठाण्यात बिल्डर सुधीर कर्नाटकी (वय 64) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, कर्नाटकी यांच्यावरही पुणे पोलिसात गुन्हा दाखल आहे. आपापसातील वादातून हा तांत्रिक गुन्हा उभा राहिल्याचा दावा केला जात आहे. देवेंद्र जैन हे सामाजिक कार्यासाठी व पोलिसांशी पंगा घेऊन सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी ओळखले जातात. पूर्वी ते पश्चिम महाराष्ट्रातील एका दैनिकाचे पुण्यातील स्पेशल क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत होते. मात्र, त्यांच्या नावावरील जाहिराती स्वत:च्या नावावर तो धंदा दाखवून त्या दैनिकातील एका वरिष्ठ व्यवस्थापकाने, संस्थेतील एका "ताप"दायक व आजिबात "सुहास्य" चेहऱ्यावर नसलेल्या वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्याच्या मदतीने जैन यांचा "गेम" केला होता. या "धंदाचोर" जाहिरात मॅनेजरविरुद्ध जैन यांनी संस्थेच्या व्हॉटस् अप ग्रुपात जाहीरपणे आरोप केले होते. जैन हे संस्थेला व मालकांना अनेक कामात "आऊट ऑफ वे" जाऊन मदत करीत होते, असेही सांगितले जाते. जैन यांनी आपल्या करिअरमध्ये पूर्वी काम केलेल्या एका संस्थेतील मालक व संचालक मंडळींशी  संबंधित फिर्यादीचे संबंध असून काही भागीदारी प्रकल्प असल्याचीही चर्चा आहे. जैन यांनी मालकांशी संबंधित या बिल्डरला एका चांदणी चौकापलीकडे गोळीबारच्या गुन्ह्यात मदत केली होती, असेही सांगितले जाते. 

दरम्यान, आताच्या ताज्या नोंद गुन्ह्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची आणि यातील आरोपी महिलेची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यावेळी ओळखीतून त्यांनी महिलेला बावधन परिसरात एक फ्लॅट भाडे तत्त्वावर घेऊन दिला. त्यानंतर हा फ्लॅट दोघांच्या नावावर केला. मात्र यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. तिने फिर्यादी यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवू शकते, असे म्हणत पैश्यांची मागणी सुरू केली. तसेच तिच्या पाठीमागे रवींद्र बऱ्हाटे, शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन अश्या व्यक्ती असल्याचे सांगत धमकावत होती. त्यानंतर तिने 6 लाख रुपये मागत बावधन येथील फ्लॅट नावावर करण्याचा तगादा लावला. तसेच बऱ्हाटे हा मोठा माणूस असून, त्याचे मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहेत. शैलेश जगताप याचे पोलिस दलात ओळखी आहेत. जैन हा पत्रकार असून, तो बातमी देऊन सर्वत्र बदनामी करेल, असे सांगत धमकावले. फ्लॅट व पैसे देण्याचे लिहून घेतले. त्यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेतला. त्यानंतर फिर्यादी खरेदीसाठी बाहेर गेले असता आरोपी महिला व चव्हाण या दोघांनी त्यांना अडविले. फ्लॅट व 6 लाख यासोबतच 2 कोटी रूपये देण्याची मागणी सुरू केली तसेच 2 कोटी व रास्ता पेठेतील जागा द्यावी लागेल, यासाठी तुम्ही पुढचे बोलणे देवेंद्र जैन आणि शैलेश जगताप यांच्याशी बोला, असे देखील सांगत त्यांना धमकावले तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर पत्रकार जैन याने फिर्यादी यांना फोन करून त्यांना भेटायला बोलावले. त्यावेळी फिर्यादी हे जैन यांच्या व फिर्यादी याच्या कॉमन मित्रामार्फत जैन यांना भेटण्यास गेले. त्यावेळी जैन यांनी पैसे; तसेच रास्ता पेठेतील जागा द्या अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. बातमी दिल्यानंतर बदनामी होईल, असे सांगितले. यात शैलेश जगताप, बराटे आणि चव्हाण अशी लोक आहेत. हे काय तुम्हाला सोडणार नाहीत. तुमचा मुडदा पडतील, असे सांगत त्यांना धमकावले. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना रस्त्यावरून जात असताना महिलेचे प्रकरण मिटवा अन्यथा महागात पडेल, अशी धमकी दिली होती. त्याने हेल्मेट घेतले असल्याने फिर्यादी यांना ते ओळखू आले नाही. त्याबाबत त्यांनी त्यावेळी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, फिर्यादी हे आरोपींच्या धमक्यांना घाबरले नाही. त्यांनी पैसे आणि फ्लॅट नावावर करून न देता रास्ता पेठेतील जागा देखील दिली नाही. याचा बदला म्हणून फिर्यादी यांच्यावर यातील आरोपी महिलेने इतर आरोपींच्या मदतीने कट रचून हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला, असा फिर्यादीने दावा केला आहे. फिर्यादी यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या गुन्ह्यानंतर पोलिस दलासोबतच सामाजिक, राजकीय आणि व्यापारी क्षेत्रात उलट सुलट चर्चेला उत आला आहे. पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, पोलिस दलातून बडतर्फ केलेला शैलेश जगताप आणि महिला आरोपी यांना ताब्यात घेतले आहे. तर आरटीआय कार्यकर्ते बराटे व सतीश चव्हाण यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले.
------------
याप्रकरणात शैलेश जगताप, देवेंद्र जैन आणि आरोपी महिला अश्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.
- पौर्णिमा गायकवाड,
पोलिस उपायुक्त, परिमंडळ 3, पुणे शहर

Post a Comment

0 Comments