आवारे पाटलांचे 'अजिंक्य भारत ' येतोय...



अकोला  - बरीच दैनिके फिरून आल्यामुळे पत्रकारितेचा बर्‍यापैकी गाठीशी आलेला अनुभव घेऊन पुरुषोत्तम आवारे-पाटील व त्यांची टीम अकोल्यातून ‘अजिंक्य भारत’ हे नवे दैनिक सुरु करत आहेत. एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे सुरु झालेला लॉकडाऊन व ठप्प पडलेली अर्थव्यवस्था पाहता, जाहिरात व्यवसाय घसरल्याने राज्यातील मोठी दैनिके खर्च व कर्मचारी कपात करत असताना, दुसरीकडे आवारे-पाटील व त्यांच्या टीमने नवे दैनिक काढण्याचा घाट घातला आहे. 



अकोला, वाशिम आणि बुलडाणा हे वर्‍हाडातील तीन प्रमुख जिल्हे व अकोल्यातून पुढे अमरावतीकडे सरकत अमरावती जिल्ह्यातही एकाच दमात पाय ठेवण्याचे नियोजन या टीमने केलेले दिसते. इतर मोठ्या दैनिकांनी कर्मचारी कपातीत काढून टाकलेली संपादकीय, जाहिरात व वितरण विभागातील माणसे एकत्र करून आवारे-पाटील हा मेळ जमवित आहेत. त्यासाठी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातून त्यांनी वार्षिक, सहामाही वर्गणीदारही केले आहेत व या पैशातून दैनिकाचा आर्थिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, अकोला जिल्ह्यातील देशोन्नतीचे प्रकाश पोहरे यांच्यावर नाराज असलेल्या मराठा-कुणबी-पाटील समाजातील अनेक मातब्बरांनी आवारेंना या दैनिकासाठी मोठे आर्थिक सहाय्य चालवले आहे. देशोन्नतीची या तीनही जिल्ह्यातील आरेरावी मोडित काढण्यासाठी हा सपोर्ट दिला जात असल्याचे सांगण्यात आले. खास करून धोत्रे-पोहरे विरोधक हे यानिमित्ताने एकत्र आलेले आहेत. 


सद्या ग्रामीण भागात देशोन्नतीचा खप कमालीचा घसरला असून, त्याचा दैनिक लोकमतने अचूक फायदा उचलला दिसतो. मध्यंतरी आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी आर्थिक रसद पुरवलेल्या मातृभूमी या दैनिकात आवारे-पाटील व सुधाकर खुमकर या जोडगोळीने प्राण ओतण्याचा प्रयत्न केला होता. हे दैनिकही ग्रामीण भागात देशोन्नतीच्याच मुळावर उठले. परिणामी, खप कमी झाल्याने देशोन्नतीचा लोकल बिझनेस कमी झाला. या दैनिकाचे व्यवस्थापन पाहणारे छोटे मालक यांच्या स्वभावदोषामुळे देशोन्नतीत कुणी चांगला संपादकही जाण्यास तयार नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात या दैनिकाचा संपादकीय दर्जाही कमालीचा घसरला आहे. 


वर्‍हाडात राजकीय वर्चस्व असलेल्या धोत्रे-पोहरे या दिग्गज मराठ्यांच्या राजकारणाला विरोध करणारे मराठा-कुणबी-पाटील एकत्र येऊन ‘अजिंक्य भारत’ या दैनिकाला आर्थिक व खपाच्या दृष्टीने हातभार लावत आहेत. खास करून सहकारक्षेत्रातील मंडळी त्यांच्या मदतीला धावली आहे. आधीच अकोला-वाशिम या जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यांत मोठे जातीय ध्रुवीकरण झालेले आहे. त्याचा फटका देशोन्नतीच्या बिझनेस व खपाला बसला होता. आता या ध्रुवीकरणाचा फायदा आवारे-पाटील घेणार आहेत. 


श्रमिकांच्या शब्दांचा क्रांतिदूत म्हणून हे दैनिक विदर्भातील वर्‍हाड प्रांतातून सुरु होत असले तरी, या दैनिकामागे मराठा-कुणबी व पाटील समाजातील दोन मातब्बर गटांचे जिरवाजिरवीचे राजकारणही कारणीभूत आहे. एक मात्र खरे की, मोठ्या दैनिकांनी काढून टाकल्यामुळे रस्त्यावर आलेल्या पत्रकार, आणि संपादकीय विभागातील मंडळींना या दैनिकाचा मोठाच आधार लाभला. 1 सप्टेंबरपासून सुरु होणारे हे दैनिक अकोल्यातून प्रकाशित होणार असून, वाशिम, बुलडाणा, खामगाव येथेही या दैनिकाने कार्यालये थाटली आहेत. मातृभूमी, भास्कर व सकाळ या दैनिकाशी छपाईबाबत सद्या चर्चा सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या