चोरावर मोर असतात ना,तसेच ईरावर पीर देखील असतात.फार दूर नाही,आपल्या मराठवाड्यातच.नांदेड जिल्ह्यातल्या किनवट-माहूर या तालुक्याच्या गावी एक दोन नाही तब्बल ६ ईरावर पीर सापडलेत.सापडलेत म्हणजे पोलिसांनी सापळा रचून पकडलेत.काय आहे हा प्रकार ? कोण आहेत हे ईरावर पीर ? यातले तिघे चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणजे पत्रकार आहेत.तर उर्वरित तिघे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आहेत.
माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचेकडून खंडणी स्वीकारताना या महाभागांना रंगेहात पकडले गेले आहे.वजिराबाद पोलिसठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेय.त्यामुळे त्यांची ओळख लपवण्याची आवश्यकता नाही.यापैकी गजानन कुलकर्णी आणि कामारकर हे दोघे अकोल्याच्या 'सायरन' या दैनिकाचे किनवट आणि माहूर प्रतिनिधी आहेत.दुर्गादास राठोड हा 'दैनिक गाववाला'चा प्रतिनिधी आहे.तर नितीन मोहरे,अंकुश भालेराव आणि राजकुमार स्वामी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते-प्रतिनिधी आहेत.
पैनगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीची या प्रकरणाला पार्श्वभूमी आहे.आता इतके सगळे रामायण सांगितल्यावर पुन्हा 'रामाची सीता कोण ?' आणि 'ती लंकेत कशी काय पोहचली ?' किंवा 'हनुमानाचा यात काय संबंध ?' हे प्रश्न विचारायचे नाहीत.रामायण लिहिणारा वाल्मिकीच मुळात डाकू होता.पापाचे सात रांजण काठोकाठ भरून झाल्यावर त्याने रामायण लिहायला घेतलं,आणि वाल्याचा वाल्मिकी होऊन मिरवायला लागला.त्यामुळे इथे उडदामाजी काळे गोरे शोधणे कठीण आहे.धुतला तांदूळ तर कोणीच नाही.थोडक्यात काय तर सापडला तो चोर,बाकी सगळे थोर.अख्खा नांदेड जिल्हा अशी 'थोरांची भूमी'आहे.आम्ही या पूर्वी दैनिक लोकपत्र मधून नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद,कंधार इत्यादी ठिकाणच्या काही 'थोरांची ओळख' वाचकांना यापूर्वी करून दिलेली आहे.याच मालिकेतले हे काही थोर महाभाग आहेत,जे आज 'अंदर' आहेत.
आधीच सांगितल्या प्रमाणे हे सापडले म्हणून चोर ठरले आहेत.पण संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तालुक्या-तालुक्यात,गावा-गावात जी गौणखनिज,रेती आणि वाळूची तस्करी-माफियेगिरी चालते त्याचे काय ? खडी,रेती,मुरूम,डब्बर आणि वाळूच्या धंद्यात महिन्याला कोट्यवधींची उलाढाल होते.गावपातळीवरील ग्रामपंचायती पासून तलाठी,पोलीस,स्थानिक आणि तालुका जिल्हा पातळीवरील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते-पदाधिकारी,तहसीलदार,वनखात्याचे अधिकारी,ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या माफियेगिरीचे कनेक्शन असल्याचे आणि सर्वांचे हात ओले होत असल्याचे उघडपणे बोलले जाते.यात छोटे-मोठे पत्रकारही सामील असल्याचे आणि तेही चिरीमिरी कमावत असल्याचे बोलले जाते.त्यात तथ्य असल्याचे माहूरच्या या घटनेने सिद्ध झाले आहे.
माहूरचे तहसीलदार वरणगावकर यांच्या विरोधात या खंडणीखोरांनी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयापुढे आमरण उपोषणही करण्याचा प्रयत्न करून पहिला होता.असे कळते.कोरोना प्रकोपामुळे उपोषणाचा घाट बारगळला .दरम्यान ही चांडाळ चौकडी तहसीलदार वरणगावकर यांचा पिच्छा पुरवत होतीच.हे काही नव्याने आणि प्रथमच घडत होते किंवा असेल असेही नाही.नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसीलदारा मागे अशा प्रकारच्या चोरावर मोर खंडणीबहाद्दरांचा ससेमिरा कायम चालूच असतो.तसाच तो वरणगावकर यांच्याही मागे असणार.त्यांनी तो अनेकदा त्यांच्या परीने मिटवलाही असणार.हा 'भात' वरणगावकर देखील सांगत नाहीत.पण चला,अती तेथे माती म्हणतात त्या प्रमाणे वाळू तस्करांना नाही तरी निदान खंडणीखोरांना तरी या निमित्ताने धडा मिळाला हे ही काही कमी नाही.
काही दिवसांपूर्वी किनवट मधल्या सुनील ईरावार या मनसे कार्यकर्त्याने उपजीविकेसाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्त्या केल्याचे प्रकरण ताजे असताना त्याच परिसरात त्याच पक्षाचे खंडणीबहाद्दर निघावेत हा प्रकार 'ईरावर पीर' असाच म्हणावा लागेल.या दोन्ही घटनांचे आपसात कनेक्शन आहे असेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.तसे असेल तर मग सुनील ईरावारची आत्महत्त्या आणि खंडणीबहाद्दर ईरावर पीर यांची सीबीआय मार्फतच चौकशी व्हायला हवी.
-रवींद्र तहकिक
7888030472
1 टिप्पण्या
नांदेड जिल्ह्याला लागलेला माहरोग आहे. तो कोनत्या औषधाने बरा होईल ते औषध शोधने शासनाचे ,प्रशासनाचे काम नसुन ते काम आता सतसत विवेक बुद्धीने मतदार बंधुनी पार पाडायला हवे.
उत्तर द्याहटवा