पुणे : पुढारीने हकालपट्टी केलेल्या पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह दोघांविरुद्ध पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जमीन खरेदीच्या व्यवहारावर आक्षेप घेत खोट्या बातम्या प्रसिद्ध करुन बदनामी करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह दोघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पत्रकार देवेंद्र जैन याच्यावर यापूर्वी खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत, हा पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मोहन राजू बहिरट (वय 26, रा. कामठे मळा, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.सुदाम ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर या प्रकरणामध्ये देवेंद्र जैन अगोदरच्या प्रकरणात जेलची हवा खात आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन बहिरट यांचे आजोबा सदाशिव कामठे यांनी शेवाळवाडी येथील त्यांच्या मालकीची जमीन नोव्हेंबर 2015 मध्ये विक्रीसाठी काढली होती. त्यादृष्टीने त्यांचा संजय हरपाळे यांच्याबरोबर जमीनीचा व्यवहार झाला. त्यावेळी संबंधीत व्यवहाराशी कुठलाही संबंध नसताना फिर्यादीचा जवळचा नातेवाईक असलेला सुदाम कामठे तेथे आला. त्याने फिर्यादीस "जमीनीचा व्यवहार हा माझ्यामार्फतच करायचा, नाही तर मी व्यवहार होऊ देणार नाही' अशी धमकी दिली. तेव्हा हरपळे यांनी घाबरुन सुदाम कामठे यास पावणे तीन लाख रुपये दिले. त्यानंतरही त्यांनी संबंधीत व्यवहाराची नोंद वर होऊ नये, म्हणून हरकतीचा अर्ज करुन फिर्यादीचे आजोबा व हरपळे यांच्याकडे तब्बल 25 लाखांची मागणी केली. त्यातील पाच लाख रुपयांचा धनादेश घेतला. त्यानंतर त्याने हरकतीचा अर्ज मागे घेण्यासाठी फिर्यादी व हरपळे यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. मुळात जमीन व्यवहारशी संबंध नसतानाही त्यांनी 15 लाख रुपये घेतले.
0 टिप्पण्या