श्रमजीवींचा पत्रकार : मुरलीधर अनंता शिंगोटे



वृत्तपत्र वाचन ही बुद्धिजीवींची संपदा असल्याचा अहंभाव मोडीत काढून श्रमजीवींची नवी वाचक परंपरा निर्माण करणारा कर्मयोगी म्हणून वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात मुरलीधर अनंता शिंगोटे हे नाव अजरामर राहील.फक्त एवढेच नव्हे,जेमतेम चौथीपर्यंतचेच कसेबसे शिक्षण घेऊ शकलेल्या आणि रिकाम्या खिशाने मुंबईनगरीत आलेल्या या 'बाबा'ने बघता बघता महाराष्ट्रातील वृत्तपत्रसृष्टीत केवळ बस्तानच बसवले असे नाही तर भल्याभल्यांचे खपाचे आकडे मोडीत काढीत स्वतंत्र स्वयंभू उद्योग विश्व निर्माण केले.पत्रकारितेत असूनही बाबांची आणि माझी कधी वैयक्तीक भेट झाली नाही.परिचय असण्याचा प्रश्नच नव्हता.


बाबांचा संघर्ष आणि उमेदीचा काळ होता तेंव्हा मी पत्रकारितेत नव्हतो.मी इकडे आलो तेंव्हा वयोवृद्ध झालेल्या बाबांनी आपल्या कर्मण्याची धुरा 'पुढिलांवर' सोडून श्रमसाफल्य स्वीकारले होते.पण मी बाबांबद्दल ऐकून होतो.त्यांचा जीवनसंघर्ष,ईर्षा आणि महत्वाकांक्षा.त्यांचे कष्ट आणि साधेपणा.निगर्वीपणा.मराठी माणसात अभावाने आढळणारी व्यावसायिकता आणि व्यावहारिकता.एखादा माणूस शून्यातून मोठा झाला की त्याच्या बद्दल अनेक किस्से कहाण्या तयार होतात.अनेकदा त्या अतिरंजित किंवा बनावटही असतात.


बाबांच्या बाबतीत मात्र त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या पुढील पिढीने सुद्धा कधी असे ग्लोरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला नाही.हा सरळ साधा चोखपणाच बाबांची खऱ्या अर्थाने मर्मबंधातली ठेव आहे,पुढील पिढीसाठीचे संचित आहे असे मला वाटते. बाबा कायम सफारी पेहनत.अलीकडच्या काळात ती त्यांची खास ओळखच बनली होती.पण तरी त्यात कधीच पोषाखीपण शिरलेले दिसले जाणवले नाही.यश,पैसा,प्रसिद्धी,संपत्ती,समृद्धी सगळे काही आले.किंबहुना त्यांनी लाथ मारील तेथे पाणी काढील या वृत्तीने कमावले.परंतु अशा तऱ्हेने कर्तृत्वाचे शिखर गाठणाऱ्या माणसात स्वाभाविकपणे संचारणारा अहंभाव,ऐट,आढ्यतेखोरपणा या अवलक्षणांचा लवलेशही त्यांच्यात कधी आला नाही.त्यांच्यातला पेपर विकणारा पोऱ्या अखेरपर्यंत संजीवन राहिला.ते कायम जमिनीवर राहिले.कदाचित म्हणूनच त्यांना जमिनीवरच्या माणसांची नस नाडी चांगली माहिती होती.त्यांचे नशीब बलवत्तर होते,आणि त्यांच्या आयुष्यात अवचितपणे काही चमत्कारही घडत गेले.


मी त्याला दैवी म्हणणार नाही,पण योग नक्कीच म्हणेन.योगायोगाने बऱ्याच गोष्टी घडल्या.संधी निर्माण झाल्या.बाबांनी त्या संधी आणि योगायोगांचे परिश्रमाने सोने केले.ही किमया त्यांची स्वतःची आहे.अगदी त्यांच्यावर मेहरबान असलेल्या देवाला देखील मी त्यांच्या यशश्रीत वाटेदार करणार नाही.भायखळ्यातला भाजीविक्या,पेपर टाकणारा पोऱ्या,न्यूज पेपर्सची एजन्सी चालवणारा व्यावसायिक ते स्वतःची सात आठ दैनिके चालवणारा संपादक-उद्योजक.योगेश्वर भगवान श्रीकृष्णा इतकीच ही एकमेकांशी अभिन्न अशी कायाकल्प अनंतरुपे.त्यांच्या दैनिकांचा पसारा,त्यात मिळवलेले व्यावसायिक यश,वाचकसंख्या इत्यादी बाबत त्यांच्या दैनिकातून आणि अन्यत्रही लिहिले जाईल.त्यांना मिळालेले पुरस्कार,त्यांची कार्यशैली,स्वभाव ,प्रभाव,मार्गदर्शन,शिकवण,सहवासाचा सुगंध वगैरे.मला व्यक्तिशः बाबांना अनुभवता न आल्याने या बाबतीत माझे शब्द तोकडे आहेत.तरी एका शब्दात मी त्यांचे वर्णन श्रमजीवींचा पत्रकार असे करीन. बुद्धिजीवींची मक्तेदारी समजला जाणारा,आणि दिवाणखान्यात सजणारा न्यूज पेपर त्यांनी सर्वसामान्य श्रमजीवींच्या हातात दिला.वर्तमानपत्राच्या इतिहासात जे काम कोणत्याच संपादकाला जमले नाही ते काम मुरलीधर अनंता शिंगोटे या अवलियाने केले.


वर्तमानपत्रे जर लोकशाही शिक्षणाच्या शाळा असतील तर या शाळा त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवल्या.शेतकऱ्यांच्या,शेतमजुरांच्या हातात पेपर दिसू लागला.शहरातल्या लब्धप्रतिषितांनी सुरुवातीला त्यांच्या पेपरला नाके मुरडली.शब्दकोडयांचा पेपर म्हणून हिणवले.पण आचार्य अत्रेंचा मराठा आणि नीलकंठ खाडिलकरांच्या नवाकाळ प्रमाणेच बाबा शिंगोटे यांच्या मुंबई चौफेर,यशोभुमी,आपला वार्ताहर,कर्नाटक मल्ला,पुण्य नगरी या दैनिकांना मुंबईतल्या लोकलमधील चाकरमान्यांनी,फेरीवाल्यांची,रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी,छोट्या-मोठ्या दुकानदार आणि व्यावसायिकांनी डोक्यावर घेतले.दैनिक पुण्यनगरीची ओळख आजही श्रमजीवींचा पेपर अशीच आहे.बाबांच्या विचारांचा वारसा म्हणून ती तशीच राहो ही सदिच्छा. 


-रवींद्र तहकिक

7888030472


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या