सीबीआय-न्यायालय हवेच कशाला ?
बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसात वाद निर्माण होऊ नयेत हा उदात्त हेतू समोर ठेवून सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन तो सीबीआय संस्थेकडे सोपवला..सुशांतसिंह राजपूत सारख्या फिल्मी कलाकाराच्या आत्महत्त्येला एखादी राष्ट्रीय आपत्ती असल्या प्रमाणे इतके काय म्हणून महत्व दिले जात आहे ? असाही प्रश्न काही मंडळींनी उपस्थित केला.
कोरोना संकटात हा विषय का गाजवला जातोय ? देशात या काळात किती हत्त्या- आत्महत्त्या झाल्या ? महाराष्ट्रात किती हत्त्या- आत्महत्त्या झाल्या ? या सगळ्या हत्त्या-आणि आत्महत्त्या महत्वाच्या नाहीत का ? सुशांतसिंह राजपूतच्याच आत्महत्त्येत असे कोणते रहस्य दडलेले आहे,ज्याचा तपास सीबीआय मार्फत व्हावा असे माननीय न्यायालयाला वाटले ? विक्रमादित्याला वेताळाने विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे न्यायालय देणार नाही.कोणी विचारले तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल.असो.
पण आम्हाला अजूनही असे वाटते की सुशांतसिंह आत्महत्त्येचा तपास करायला सीबीआयच कशाला पाहिजे ? ही आत्महत्त्या नसून खुनाचाच प्रकार आहे हेच सिद्ध करायचे असेल आणि सुशांतसिंह राजपूतला निरागस महात्मा ठरवून त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीला खुनी पिपासू हडळच ठरवायचे असेल तर हे काम आमचे न्यूज चॅनल्स स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षाही दक्षतेने करू शकतात.गेल्या काही दिवसांपासून देशातल्या हिंदी मराठीतल्या झाडून सगळ्या न्यूज चॅनल्सनी ज्या पद्धतीने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचे इन्व्हिस्टिगेशन सुरु केले ते पाहता या वृत्त वाहिन्या आहेत की इंटीलिजन्स ब्युरो असा प्रश्न आमच्या छोट्याशा मेंदूला पडला आहे.
म्हणजे अजून कशातच काही नाही.तरच वृत्तवाहिन्यांचे समालोचट आणि समालोचटिका ही आत्महत्या नसून नियोजनबद्धरित्या केलेला खूनच आहे हे गृहीत धरून वार्तांकने करीत आहेत.परवा रायगड मध्ये एक इमारत कोसळून १६ जणांचे बळी गेले.पण वृत्तवाहिन्यांना त्याचे काय ? त्या बिचाऱ्यांना टीआरपी कुठे आहे ? त्यांच्या बातम्या चालवण्यासाठी कोण 'बूस्टर डोस' देणार ?
सुशांतच्या बातम्या चालवल्या की टीआरपी वाढतो.'वरतून' पैसाही मिळतो.आम तो आम गुठलीयोंके भी दाम.चलाव गोली.या पद्धतीने सगळा नंगानाच चालला आहे.तपास करणाऱ्या सीबीआयने अजून एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.चौकशीसाठी अनेकांना बोलावले पण अजून कोणालाही अटक केलेली नाही.ही आत्महत्त्या की हत्त्या या बाबतही सीबीआयने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
असे असताना वृत्तवाहिन्यावर जो सूर लावला जातोय त्यातून रिया चक्रवर्तीने सुशांतच्या भोवताली असणाऱ्या काही जणांना हाताशी धरून त्याची आर्थिक लूट केली.त्याला दारू आणि ड्रग्जचे व्यसन लावले आणि अखेर त्याची हत्त्या करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचला अशीच स्टोरी समोर येतेय.ही स्टोरी ऐकताच बनावट आणि फिल्मी वाटते.किंबहुना सगळे अंदाज राम भरोसे आहेत.असे असताना सीबीआय वृत्तवाहिन्यांवरून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांना रोखत का नाही ? की सीबीआयला हाच तमाशा हवा आहे.त्याच कामासाठी ते मुंबईत पाठवले गेलेत.सीबीआय गेल्या तीन दिवसांपासून तपासाच्या नावाखाली काय करीत आहे ? याला बोलव,त्याला बोलव,याची चौकशी त्याची चौकशी,स्पॉट व्हिजिट,हे सगळं काय आहे ?
वृत्तवाहिन्यांनी ज्या बातम्या चालवलाआहेत त्या सीबीआय आणि न्यायालयाच्या चार पावले हे पुढे आहेत.मग न्यायालय आणि सीबीआय हवेच कशाला ? न्यूज चॅनल्सनांच करुद्या सुशांत आत्महत्येचा तपास.बात खतम.
-रवींद्र तहकिक
7888030472
0 टिप्पण्या