रिपोर्टर वर्क फ्रॉम फिल्ड..धरपडतोय, मरतोय..



पुण्यातले टीवी 9 प्रतिनिधीच्या कोरोनाने दुर्दैवी मृत्युनंतर फिल्डवर काम करणा-या पत्रकारांच्या सुरक्षेची चर्चा सुरु झाली, पांडुरंगला ज्या स्थितीमधून जावे लागले ते सगळ्यांच्या समोर आले. सगळ्या चॅनल्सनी आवाज उठवला, पण त्यांनी आणि पांडूरंगच्या चॅनलने तरी फील्डवरच्या पत्रकारांना सुरक्षित वातवरण दिले आहे का..? 


तशी व्यवस्था, व्यवस्थापन केले आहे का..? फक्त फार गरज असेल तिथेच प्रत्यक्ष रिपोर्टिंगला जा अन्यथा फोनवरुन बाईट आणि इतर माहिती मिळवा, अशा सुचना केल्या का..? उंटावरुन शेळ्या हाकणारे आणि फील्डवरच्या रिपोर्टरवर वाट्टेल त्या भाषेत दादागिरी करणारे फुल पगारी अधिकारी आपला अप्प्रोच बदलणार आहेत का..? त्यांच्यात रिपोर्टरशी वागण्यात काही बदल झाला आहे का..? अशा अनेक घटना असतात डेस्क किवा त्यावरील तथाकथित इनपूट हेड, बाकी हे ते संपादक आणि प्रत्यक्ष संपादक सगळेच रिपोर्टरवर अनावश्यक दबाव टाकतात, अक्षरशः छळ करतात. यात सर्वाधिक भरडला जातो तो जिल्हा रिपोर्टर, ज्याला इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या भाषेत स्ट्रींजर म्हणतात.


 चॅनलमधले वरिष्ठ आणि काही ब्युरो चीफ जिल्हा रिपोर्टरला हाॅटेलमधल्या कप बशा धुणा-यापेक्षाही वाईट  वागणुक देतात. राज्यभरातील सगळ्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी बातमी कवर करण्यासाठी जी मेहनत घेतात ती कुठल्याहीही सोयी शिवाय, कॅमरामॅन सोबत नसतांना केलेली त्यांची मेहनत असते, पण विचारतो कोण..सतत काढून टाकले जाईल या भीतीखाली तो पळत असतो. अनेक असे गडगंज झाले आहेत, पण प्रामाणिक काम करणारे अधिक आहेत, त्यांच्याकडेही पाहा. गडगंज आहेत त्यांच्याकडे पाहून सब घोडे 12 टक्के ठरवू नका.



    ब्युरो चीफ किवा इनपूट हेड  नावाचा जो सर्व सोयी घेणारा प्राणी चॅनल मध्ये असतो, त्या तुलनेत कितीतरी अधिक मेहनत जिल्हा प्रतिनिधी घेतो. स्ट्रींजर या प्रकारात त्याला डेस्ककडुन वेठबिगार मजुरासारखी वागणुक मिळते..चॅनलकडुन बातम्यांच्या आकडयावर मिळणारा पगार फार कमी आणि नियमीत कधीच नसतो. पण असाईनमेंटकडुन स्ट्रींजरला  मिळणारी वागणुक मात्र दररोज अत्यंत अपमानास्पद असते. शासकिय अधिकारी लहान कर्मचा-यासोबत ज्या पध्दतीने वागतात तसाच क्रुर पध्दतीने वागवण्याचा प्रकार इथेही आहे, शासनात त्यांना संरक्षण मिळते इथे काहीही शाश्वती नाही.


 माणुसकीने प्रेमाचा शब्द रिपोर्टरशी बोलणारा ऑफ़िसमधील एखादाच.. एखादी बातमी दुसरीकडे ब्रेक होणे किवा सुटली तर अख्खा डेस्क त्यावर तुटून पडतो, मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्यावर डेस्कच्या सरदारांचा सतत प्रयत्न असतो, ते आपली निराशा स्ट्रिंजरवर काढतात. कोरोनाचा जीवघेणा काळ सुरु आहे, मुबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकणात आणि आता विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रात  गंभीर परिस्थिती तयार झाली आहे. या अशा काळात सगळीकडे वर्कफ्राम होम ही संकल्पना असतांना सर्व जिल्हयाच्या रिपोर्टरला माञ डेस्ककडुन कडक समज दिली गेली आहे.. तुमचा जीव गेला तरी आम्हाला फरक पडत नाही, तुम्ही माञ फिल्डवर किंवा संबधीत लोकेशनवर दिसलेच पाहीजे हा आग्रह कायम आहे. 



कोरोनाच्या काळात जितक शक्य होईल तितकं नेमकं काम करुन घेऊन रिपोर्टरला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, माञ सगळयाच वाहीन्यामधुन जिल्हा पातळीवरच्या रिपोर्टरसह मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नागपुरमधल्या सगळया प्रतिनिधींच्या जीवाची कुठलीही काळजी न घेता त्याला हाॅटेलमधल्या वेटरसारखे आर्डर सोडणे सुरु आहे. फिल्डवर जाण्याच्या आग्रहानेच पुण्याच्या टीवी 9 प्रतिनिधीवर ही परिस्थिती ओढवली, त्याचा कोरोनाचा आजार कसा वाढला,त्याला सुट्टी मिळाली की नाही ताप असतानाही त्याला फिल्डवर फिरले पाहीजे असा दबाव होता का याची चौकशी आवश्यक होती. 


नागपुरातले तीन पञकार कोरोनामुळे गेले आहेत,कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत अजुनही जिल्हाधिकारी किंवा मंञालयाच्या मुख्य सचिवासारखे अधिकार मिळाल्याच्या थाटात वावरणा-या डेस्कच्या वरिष्ठांना रिपोर्टर किंवा त्याच्या परिवाराबाबत असलेली असंवेदना कधी थांबेल का हा खरा प्रश्न आहे..निदान त्याचा कोरोना काळात किती लाखाचा विमा काढावा यावर तरी वरिष्ठांनी भर दिला आहे का कधी..? माञ त्याला बाहेर फिल्डवर फिरा अन्यथा मेमो किवा हकालपट्टीची धमकी देणे ही सवय झालीय डेस्क आणि असाईनमेंटला.. 


दुस-यावर झालेल्या अन्यायाच्या बातम्या दाखवणारा स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही हेच लोकाशाहीच्या चौथ्या स्तंभाचे पाया असलेल्या रिपोर्टरची अवस्था आहे..न्याय कुणाकडे मागावा..? 


- एक असाच फिरणारा, कधीही मरेल अशा स्थितीतील स्ट्रिंजर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या