पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू आणि काही मूलभूत प्रश्न !

 
1. राज्यातील सर्व फील्ड पत्रकारांनी व त्यांच्या डेस्क सहकाऱ्यांनी तातडीने आपली व कुटुंबातील सदस्यांची चाचणी करून घ्यावी व आवश्यकता भासल्यास तातडीने हॉस्पिटलायझेशन व उपचार करवून घ्यावेत.


2. राज्यभरातील सर्व जिल्हा पत्रकार संघ सक्षम करावेत आणि भिन्न संघटना ठेवण्याऐवजी एकच सामायिक संघटना राज्यभर असावी. या संघटनेचा राजकारणी व प्रशासनावर वचक व दबदबा असावा. त्यासाठी संघटना पदाधिकारी यांच्या आवाजाला नैतिक अधिष्ठान असावे. भ्रष्ट, हफ्तेखोर व पाकिटमार सदस्यांना ढुंगणावर लाथ मारून बाहेर हाकलायला हवे.


रायकर प्रकरणात एक अत्यंत वाईट गोष्ट घडली. एक चांगला माणूस हकनाक भ्रष्ट आणि प्रशासनात वजन नसलेल्या खुज्या (पण तथाकथित प्रस्थापित) पत्रकारांमुळे जीव गमावून बसला.


3. पुण्यातील सर्व दिग्गज पत्रकार व संघटना मिळून राजकारणी व प्रशासनाकडून एका पत्रकारावर योग्य ते इलाज वेळेत करवून घेऊ शकत नाहीत, त्याला एक रुग्णवाहिका एव्हढ्या मोठ्या शहरात उपलब्ध करून देऊ शकत नाहीत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. असे का घडले, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. पुण्यातील पत्रकारांच्या शब्दाला किंमत का उरली नाही? एक पत्रकार मृत्यू शय्येवर असताना पुण्यातील पत्रकार प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था का करवून घेऊ शकले नाहीत? अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने पुण्यातील पत्रकारांना फाट्यावर का मारले? हे सर्व प्रश्न व्यथित करणारे आहेत.


4. दुर्दैवाने रायकर यांच्या निधनाच्या बातम्यांखालील प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेबसाइट्सवर वाचल्या की पुण्यातील पत्रकारांची किंमत जनमानसात किती खालावली आहे, त्याची कल्पना येते. हे भीषण वास्तव आहे. पत्रकारांच्या संघटना, विविध बीटमधील टोळकी एकमेकांवर हफ्तेखोरीचे आरोप करत असण्याचे चित्र फार काही भूषणावह नाही. 


5. पुण्यातील पत्रकार काही वर्षांपूर्वी हफ्तेखोरीत बुलेट घेण्याच्या प्रकरणाने चर्चेत आले होते. काहींनी बुलेट न घेता तेव्हढी रोख रक्कम वसूल केली होती. असे पत्रकार जर आसपास, संघटनात असतील आणि आपल्या एखाद्या निष्पाप सहकाऱ्यासाठी भविष्यात यांनी अधिकारी, राजकारणी यांना कॉल केले, तर यांची लायकी आणि अंडी-पिल्ली माहिती असलेले अधिकारी, नेते कसे सहकार्य करतील? त्यात हकनाक निरपराध सहकारी जीव गमावून बसेल. भ्रष्ट आणि पाकीटमार पत्रकार हे नेते व अधिकाऱ्यांना कामाला लावूच शकत नाही. तो वकूब व अधिकार ते आधीच गमावून बसलेले असतात. उलट अशी मंडळी मध्ये आल्याने सहकार्याचे गणित बिघडण्याची शक्यता असते, संवेदनशील व तातडीच्या प्रकरणातील गांभीर्य कमी होण्याचा धोका उद्भवू शकतो.


6. आता सर्व जण याच्या त्याच्याकडे बोट दाखवतील; दोषारोपांचा खेळ होईल, पण माणूस तर बिचारा हकनाक जीव गमावून बसला. पुण्यातील अनेक पत्रकार ज्या नेत्याच्या दावणीला बांधले गेले आहेत, त्या या पत्रकारांच्या "पालक" असलेल्या आंबटशौकीन नेत्याने स्वतः फोन करूनही प्रशासन हलले नाही, रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही (पत्रकारच तसे बाईट देताना दिसले!) मग असला बिनकामाचा नेता काय कामाचा? इतक्या वर्षात जर त्याला आपल्या शहरात सूत्रे हलवता येत नसतील तातडीने तर पत्रकारांनी कुणाला आंगळावे आणि कुणाची लाल करत राहावी, याचे भान राखायला हवे. हा नेता, प्रस्थापित पत्रकार, पत्रकारांच्या संघटना या जर एका चांगल्या पत्रकाराचा जीव वाचवू शकत नसतील, तर त्यांची त्यांना लाज वाटायला हवी, अशी स्थिती नक्कीच आहे. 


7. अगदी शेवटचा पर्याय, नाही होत ना सरकारी व्यवस्थेत योग्य उपचार... सर्व पत्रकार आणि श्रीमंत संघटना मिळून त्याला तातडीने एखाद्या चांगल्या रुग्णालयात नाही शिफ्ट करू शकत? एखादा नेता, त्याचा पक्ष, त्याची संस्था किंवा पत्रकार मिळून, विभागून किंवा त्यांची संघटना हे पाच-पन्नास हजार, लाखभरांचा निधी नाही खर्च करू शकत? नसतील तर उपयोग काय? गावाकडे सुद्धा पत्रकार आपल्या सहकाऱ्याला असा हकनाक उपचार व पैशापायी जीव गमावू देत नाही. मग पुण्यातील सर्व प्रस्थापित पंडित कुठे व का कमी पडले? त्यांचा आंका, ते यांना किंमत का नाही उरली, हे सवाल राहून-राहून मन अस्वस्थ करून जातात.


8.  एक माहिती अशी आहे, की 2 दिवसांपासून रायकर यांना शिर्डीतील आत्मा मलिक रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. केवळ 40 हजार रुपयांसाठी ते घोडे अडून राहिले. पुण्यातील पत्रकार व संघटना ही व्यवस्थाही नाही करू शकले? ज्या नगर जिल्ह्याचे रायकर हे भूमिपुत्र होते, त्या नगर जिल्ह्यातील सेवाभावी म्हणविले जाणारे रुग्णालय असे किरकोळ रकमेसाठी अडून राहिले? किती हे सारे दुर्दैव आहे. स्वतःच्या गृह जिल्ह्याने रायकरांना वेळेला मदत केली नाही आणि ते ज्या प्रस्थापित पुण्यातील पत्रकारात वावरले, त्यांच्या शब्दाला किंमत न उरल्याने किंवा मिळून खासगी उपचाराचा खर्च जमा करण्याची दानत न दाखविली गेल्याने रायकरांसार ख्या चांगल्या पत्रकाराला हकनाक बळी जावे लागले.


9. जे नेते कामाला आले नाहीत, त्यांची गचांडी धरून जाब विचारायला हवा. जे अधिकारी, प्रशासन जुमानले नाही, त्यांना "दणका" द्यावा लागेल. आहे पुण्यातील पत्रकार आणि त्यांच्या श्रीमंत संघटनांत हा दम? नसेल तर तो आणावा लागेल, भविष्यात पुन्हा एखादा दुर्दैवी रायकर होऊ नये! 


10. वसंत भोकरे व किरण जोशी यांच्या महाराष्ट्र पत्रकार संघाने पुण्यात RSS च्या सहकार्याने सुसज्ज विलगीकरण रुग्णालय उभारले. पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी राज्यातील हा असा पहिलाच अभिनव प्रयोग. नाहीतर, बाधित अहवालानंतर पत्रकारांची किती फरफट होत होती. हे काम सर्व पत्रकारांना मिळून आता "नेक्स्ट लेव्हल"वर न्यावे लागेल. पत्रकारांना तातडीने, कॅशलेस उपचार मिळावेत, अशी व्यवस्था चांगल्या हॉस्पिटल्स सोबत करावी लागेल. मुळात पत्रकारांमध्ये ही विमा जागृती फारशी नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी सर्वप्रथम आपल्या सदस्यांचे किमान 5 लाखांचे फॅमिली फ्लोटर प्लस उत्पन्नानुसार टॉप अप करवून घ्यायला हवेत आणि किमान 50 लाख व कमाल उत्पन्नाच्या प्रमाणात  क्रिटिकल इलनेस, अपघात या रायडर्ससह टर्म इन्शुरन्स करवून घ्यायला हवेत. ही अगदी सर्वोच्च प्राधान्याची मस्ट, मस्ट बाब आहे. संस्थांकडून, कंपन्यांकडून अपेक्षा धरता येण्याची स्थिती नाही. मालक तर सरळ हात वर करून मोकळे होताहेत, त्यांना जाब विचारायला पत्रकार संघटनांची दाढ उठत नाहीये. या कुचकामी आणि बाहुल्या पत्रकार संघटनांनी किमान आपापल्या पातळीवर तरी काही सदस्यांची सोय करावी. या संघटना राजकीय व इतर डोनेशन मिळवतात. त्या काही बॅंका नाहीत स्वतःच्या ठेवींवर पैसे कमवत बसायला. हा पैसा आपले सदस्य पत्रकार यांच्या हितासाठी वेळीच वापरला गेला तरच त्याला अर्थ आहे. समजा संघटना हे करत नसतील तर प्रत्येक पत्रकाराने हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स किमान स्वतः तरी पुरेशा रकमेचे काढून घ्यायला हवेत. 


11. पत्रकार संघटना म्हणजे राजकारणाचे अड्डे आणि काही भ्रष्ट, टवाळ टोळक्यांची सोय लावण्याची ठिकाणे, हे चित्र उभे राहता कामा नये. ही कंपूबाजी आणि भ्रष्ट वर्तन आणि अशी माणसे मग रायकरांसारख्या चांगल्या माणसांचे बळी घेऊन जातात. पुण्यातील "बुलेट गॅंग", "स्थायी"तील "पाकीट गॅंग" व इतर बीट (म्हणजेच अड्डेच!) वरील आणखी काही लाचार गॅंग हे वेळीच ठेचले गेले असते तर दुर्दैवाने आजची वेळ आली नसती. ही मंडळी मोजकी आहे, इतर बहुतांश प्रामाणिक व स्वच्छ आहेत; पण हे "सडके आंबे" काढून फेकले नाहीत तर सारे क्षेत्रच हळूहळू घाण होईल. मालकांनीही लाचार, बिनकण्याची, हांजी हांजी करणारी कुचकामी "छुमंतर पथक" पाळण्याऐवजी कुंडली व कार्यक्षमता पाहून माणसे जोडायला हवीत. नाहीतर, उद्याचे जग काही पाकीट गोळा करण्याचे नसेल, ते कंटेंटच्या गुणवत्तेचे असेल, त्यात ही छु मंतर पथके त्या संस्थेला विसर्जित करतील. गणेश विसर्जन आणि भाद्रपद काळातील हा मोलाचा धडा आहे. 


12. आता काळया फिता, चौकशा, आरोप - प्रत्यारोप असे खेळ होतील. हा भेकडांचा भाकड उद्योग ठरेल आता. चांगला माणूस हकनाक जीव गमावून बसलाय. पुण्यातील "तीस मारखा" पत्रकार आणि त्यांच्या संघटना यांचा वकूब जगाला कळलाय. अशा स्थिती नवी मुंबई पत्रकार संघाचे मन:पूर्वक अभिनंदन करावेसे वाटतेय. त्यांनी नवी मुंबईतील रुग्णालयात 40 बेडस पत्रकारांसाठी राखीव ठेवण्याचा ठराव करून घेतलाय. संजय भोकरे आणि किरण जोशी यांच्या मराठी पत्रकार संघटनेच्या पत्रकार हॉस्पिटलचा विषय वर आधीच नमूद केला आहे. जळगावसारख्या छोट्या शहरात "जैन समूह" हा तातडीने पत्रकारांना आवश्यकतेला कार्डियाक AC रुग्णवाहिका देतो. स्वतः अशोकभाऊ जैन अशावेळी परिस्थितीवर लक्ष ठेवून सूचना देतात. वेळप्रसंगी गरजूंना आर्थिक मदत दिली जाते. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी रुग्णालयात श्रमिकच काय, मानधनावर असलेल्या गावच्या वार्ताहरावर थेट उपचार केले जातात. पैशाचा काय असेल तो व्यवहार नंतर, त्यासाठी उपचार अडत नाही. आणखी काही सोय करायची असेल पुढे तर गिरीश महाजन तर हक्काचेच!! जळगाव सोडा, पाचोरासारख्या जिल्ह्यातील छोट्या गावात विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या डॉ. भूषण मगर यांनी कोरोना काळात पुण्यनगरी व दिव्य मराठी दैनिकाच्या वार्ताहरांचे प्राण वाचविले. पैशासाठी ना डॉकटर मंडळीनी अडवणूक केली, ना उपचार अडले. सर्वपक्षीय राजकारणीही धावून आले. पुण्यात हे का घडू शकले नाही? कोण कमी पडले? पुण्यातील पत्रकार की त्यांच्या संघटना की पुण्यातील प्रशासनावर वचक, पकड नसलेले "पत्रकारमित्र" पुढारी? रायकर यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. असे व्हायला नको होते. ते जळगावात असते किंबहुना राज्यातील एखाद्या दुसऱ्या छोट्या जिल्ह्यातही असते तर ते आज आपल्यात असते. सर्वांनी मिळून त्यांना वाचविले असते. आता याच्या-त्याच्याकडे बोट दाखविण्यात अर्थ नाही.  पुण्यातील मंडळीनी योग्य वेळी योग्य काम, योग्य कृती केली नाही. याचा "पुणेरी" बाण्याने प्रतिवाद होईल, लाखोली वाहिली जाईल; पण पुणेकर कमी पडले, हे वास्तव आहे. ज्या मंगेशकर, रुबी, पूना, नोबेल वैगेरे हॉस्पिटलांची पुणेकर पत्रकार सातत्याने "लालम लाल" करत असतात, त्यापैकी कुठेतरी एका ठिकाणी "वेळीच" हलवून त्यांना रायकर यांचे प्राण वाचविता आले असते. पण ही "वेळीच" कृती केली गेली नाही. पुण्यातील "बहुतांश" पत्रकार मंडळी ही पुणे ताब्यात असलेल्या पक्षाच्या आणि त्याच्या ज्येष्ठ नेत्याच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. त्यांनीही काहीच ठोस केले नाही. तिकडे शिर्डीतील आत्मा मलिक हॉस्पिटलचा आत्माही या मृत्यूने हळहळत असेल. फक्त काही हजारांसाठी, अटी घालून तुम्ही तुमच्याच जिल्ह्यातील एखाद्या प्रामाणिक पत्रकारावरील उपचार कसे नाकारू शकतात? "मला चांगल्या ठिकाणी हलवा, इथे माझे काही खरे नाही," हा रायकरांचा आर्त आवाज दोन दिवस पुण्यात कुणाला ऐकूच कसा गेला नाही? त्यांची भांबावलेली, असहाय्य आणि आगतिक सहचारिणी मदतीच्या अपेक्षेने आस लावून होती. पण दुर्दैव!! शेवटच्या क्षणी हालचाली झाल्या, तोवर वेळ निघून गेलेली होती.... आता आम्ही आमच्या "ठेवी" काय चाटत बसणार आहोत? आमच्यातील एक सहकारी आम्ही वाचवू शकलो नाही. आम्ही सारे भेकड आणि नेभळट आहोत. आमच्या शब्दाला किंमत उरलेली नाही. आमच्याच काय ज्येष्ठ नेत्याच्या शब्दालाही पुण्यात किंमत उरलेली नाही. अशी वेळ का यावी? आम्ही सर्वांनी मिळून; अधिकारी व प्रशासनाला वैताग, चीड आणणाऱ्या आमच्यातील काही "पाकीटबाज" सडक्या आंब्यांनी तर रायकर यांचा बळी नाही ना घेतला?


आता प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी किमान आपल्या मालकीची एक सुसज्ज रुग्णवाहिका तरी खरेदी करावी. निधी कमी पडणार नाही, तो कुठून आणि कसा जमवायचा यात आमची मंडळी हुशार असतात. नाहीच तसे जमले तर सदस्यांकडून गोळा होऊ शकतोच, सरकारच्या पत्रकार कल्याण निधीतून करवून घेता येऊ शकतो. शिवाय, नवी मुंबई व जळगावच्या धर्तीवर पत्रकारांना व्यवहार बाजूला ठेवून तातडीने उपचार करण्याची व्यवस्था उभी करायला हवी. तीच रायकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल!!


विक्रांत पाटील 

- vikrant@journalist.com

-91 8007006862


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या