रिपब्लिकच्या बर्गर मस्तीला मराठी वडापावचा ठसका...



पत्रकारिता आणि सभ्यतेचे  सर्व संकेत आणि मुल्य पायदळी तुडवणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील प्रदीप भंडारी नावाच्या एका पत्रकाराने मुंबईतल्या मराठी पत्रकारांना 'वडापाववाले पत्रकार'म्हणून हिणवल्यामुळे मराठी पत्रकारांनी त्याचे तिथल्या तिथे भर रस्त्यात मुस्काड फोडले ते बरेच केले.


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातून पुढे आलेल्या बॉलिवूड मधील ड्रग्ज रॅकेट संबधी सध्या गरमागरम वार्ता मिळत असल्याने सध्या मुंबईतल्या नार्कोटिक्स ब्युरो ऑफिसच्या बाहेर सगळ्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या पत्रकारांची रिपोर्टिंगसाठी झुंबड उडत आहे. गुरूवारी सकाळी देखील मासळीबाजारातल्या सारखी पत्रकारांची ही कलकल तिथे चालू होती.


एकमेकांच्या पुढे राहण्याच्या प्रयत्नात सुरु असलेली रेटारेटी आणि गोंगाटात वाद झाला,धक्काबुक्की झाली आणि सध्या जरा जास्तच मस्ती चढलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या प्रदीप भंडारी नावाच्या पत्रकाराने मुंबईतल्या मराठी माध्यमांच्या पत्रकारांना वडापाववाले पत्रकार म्हणून हिणवले.झाले बारुदावर ठिणगी पडली .रिपब्लिक चॅनलच्या अर्णव मस्तीमुळे आधीच ठसठसणाऱ्या मराठी पत्रकारांच्या संतापाचा उद्रेक झाला.चिडलेल्या मराठी पत्रकारांनी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला तिथल्या तिथे चांगलाच चोप दिला.रिपब्लिक चॅनलच्या त्या आगाऊ पिझ्झा-बर्गर पत्रकारांची मुंबईतल्या 'वडापाव'वाल्या मराठी पत्रकारांनी जबरदस्त धुलाई करत त्याची अर्णव मस्ती चांगलीच जिरवली.



रिपब्लिक चॅनलच्या प्रदीप भंडारी नावाच्या पत्रकाराने हा अगोचरपणा केला होता.त्याची किंमत त्याला चुकवावी लागली.कोण हा भंडारी ? मुंबईत राहून,मुंबईचेच अन्नपाणी खाऊन हा मुंबईतल्याच मराठी माणसांवर भुंकतो.मराठी माणसांना तुच्छ लेखतो.वडापाववाले म्हणून हिणवतो.हा माज,ही मस्ती येते कोठून ? मुळात  रिपब्लिक चॅनल हे प्रसार माध्यम आहे की एखादी दहशतवादी संघटना ? की एखादी अंडरवर्ल्ड टोळी.अर्णव गोस्वामी हा संपादक आहे की या टोळीचा म्होरक्या ? त्याचा एकंदर अविर्भाव,हातवारे,भाषा,आक्रस्ताळेपणा पहिला की तो एकतर पागलखान्यातून चॅनलच्या स्टुडिओत आणून बसवलेला मनोविकृत तरी वाटतो किंवा मग एखाद्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या किंवा अंडरवर्ल्ड टोळीचा डॉन तरी.जो अँकर न्युज चॅनलच्या स्टुडिओतून एखाद्या रस्त्यावरच्या फुल टंग झालेल्या फटीचर भाडोत्री गुंडाप्रमाणे मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला आरे तुरेची भाषा करतो.


हिम्मत है तो सामने आ.आंखो में आख में डालकर मेरे साथ बात कर.असे चॅलेंज करतो.त्याला म्हणायचे तरी काय ? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्कीच नाही.ही सरळसरळ गुंडगिरी आहे,आणि तिला कोणाचा तरी पाठिंबा प्रोत्साहन आणि फूस आहे.कोणाची तेही उघड आहे.ज्यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कंगणा राणावत नावाची हडळ उभी केली तेच हा उपटसूंभ वेताळ नाचवत आहेत हे उघड आहे.राजकारणाची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पातळी किती खाली घसरली आहे याचा हा ढळढळीत पुरावाच आहे.


भाजपसारखा स्वतःला सुसंकृत सभ्य आणि केडरबेस म्हणवणारा पक्ष हे सगळे घडवून आणतोय हे आणखी उद्वेगजनक आहे.कंगणा आणि अर्णब गोस्वामीच कशाला,मध्यंतरी उद्धव ठाकरेंचे एक आक्षेपार्ह कार्टून सोशल मीडियावर व्हायरल केले म्हणून शिव सैनिकांनी घरात घुसून बुकलून काढलेला माजी नौदल अधिकारी काय किंवा मराठी कलावंताची खिल्ली उडवणारा भाजपचा प्रवक्ता अवधूत वाघ काय.हे सगळे एकाच थैलीचे चट्टेपट्टे आहेत.राज्यपालांसारख्या पदावरील व्यक्ती जेव्हा प्रोटोकॉल गुंडाळून त्यांना राजभवनावर बोलावून त्यांचे सांत्वन करतात तेव्हा हे प्रकरण कोणत्या थराला पोहचले आहे हे लक्षात येते.


बाकी मग कंगणा,अर्णब गोस्वामी,अवधूत वाघ,तो माजी नौदल अधिकारी यांच्या समर्थनार्थ बोंबलायला राम कदम,प्रवीण दरेकर,किरीट सोमय्या सारखे मुश्तन्ड आहेतच.रिपब्लिक चॅनलचा अर्णब काय किंवा त्याचा मुंबईतला पंटर प्रदीप भंडारी काय त्यांना ही जी काही माज मस्ती चढली आहे ती याच पोलिटिकल सपोर्टमुळे.हा सपोर्ट फक्त पैशांचा नाही,सत्तेचा आणि यंत्रणेचा सुद्धा आहे.यांना नीतिमत्ता आणि नैतिकता,जनाची अथवा मनाची,सोडाच कायद्याची,पोलिसांची,सरकारची सुद्धा भीती किंवा धाक वाटत नाही.म्हणूनच यांची मस्ती सातव्या अस्मानावर पोहचली आहे.पण त्यांना महाराष्ट्राची,मराठी माणसांची रीतभात इतिहास कदाचित माहित नाही.मराठी माणूस एकदा पेटला की मग तो भल्याभल्यांची मस्ती जिरवतो.जशी त्या रिपब्लिक चॅनलच्या पत्रकाराची जिरली.बर्गर खाणाऱ्या भंडारीला वडापावचा ठसका लागला.आता तरी या घोडयांना इथले पाणी लागावे.


ता.क (फुंकून प्या ) - 


रिपब्लिक आणि मराठी पत्रकारांच्या वादावादीनंतर मराठीतल्या लोकशाही नावाच्या नव्यानेच बाजारात उतरलेल्या  चॅनलने हिंदी चॅनल विरुद्ध मराठी टीव्ही चॅनल असा वेगळाच सूर पकडून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. हाही पेटलेल्या भट्टीवर वांगे भाजण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.रिपब्लिक आणि लोकशाही ही नावे एकमेकांची ट्रान्सलेट वाटतात.अर्थात नामसाधर्म्य आहे म्हणून मराठी लोकशाहीने इंग्रजी रिपब्लिकशी थेट ठोकशाहीची भाषा करावी हे आवश्यक नाही.पुन्हा हा संबंधित अँकरला अविर्भाव बराच ओढून ताणून ( सरळच सांगायचे तर कण्हत कुंथत ) करावा लागला.त्याची खरे तर आवश्यकता नव्हती.रिपब्लिक चॅनलचे पत्रकार जे करतात तेच आपणही केले तर मग राहिलेच काय ? याचे भान मराठी पत्रकारांनी ठेवलेच पाहिजे.नाहीतर मग हमाम में सब नंगे म्हणतात तो शिक्का पत्रकारांवर बसायचा.


-रवींद्र तहकिक

७८८८०३०४७२ 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मराठी पत्रकारांचा उल्लेख वडा पाव पत्रकार असा नव्हे तर चाय बिस्कुट पत्रकार असा केला गेला होता आणि त्याबद्दल भंडारीला चोपले गेले होते !

    उत्तर द्याहटवा