फेक टीआरपीची सापाची गोळी,धुसफूस धुसफूस फुसफुसफूस...


मुंबई पोलिसांनी काही न्यूज चॅनल्स आणि त्यांचा फेक टीआरपी वाढवून देणाऱ्या बोगस सर्वेक्षण कंपन्यांचा पर्दाफाश,भंडाफोड की काय म्हणतात तो केला आहे म्हणे.कोणातरी फक्त मराठी,बॉक्स सिनेमा नावांच्या फुटकळ चॅनलच्या संपादकांना या प्रकरणात अटकही झालीय म्हणतात.


हंसा नावाची कोणी एक एजन्सी सेट टॉप बॉक्सला पेरॉमीटर बसवून,लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल्सची टीआरपी वाढवतात म्हणून पकडले आहेत.पण हे अगदीच किरकोळ आणि भुरटे चोर आहेत हो.म्हणजे काही डॉन डाकू तुमच्या समोरून राजरोस विमाने पळवून नेतात,आणि तुम्ही त्यांना सोडून गल्लीतल्या चिंधीचोर खिसेकापू सायकल चोरांना पकडताय.पकडायला पाहिजेत हरकत नाही.पण बड्या धेंडांचे काय ? 


आता जी धरपकड झालीय त्यात मुंबई पोलिसांचा रोख अर्थात अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक चॅनलवर आहे.रोख म्हणण्यापेक्षा राग.त्रागा आहे.हेच तर त्यांच्या अवघड जागेचे दुखणे आहे.कारण याच अर्णब गोस्वामीने त्याच्या रिपब्लिक चॅनलवरून सुशांत सुसाईड,त्यातून रंगलेला 'कांगणोत्सव' आणि त्यातून उद्भवलेले बॉलिवूड ड्रॅग कनेक्शन या सगळ्या तमाशात मुंबई पोलिसांना आणि आघाडी सरकारला बदनाम केले.


सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या हातातून काढून घेऊन ती सीबीआयला सोपवली वगैरे.त्यातून निष्पन्न काय झाले ? तर दिवाळीतल्या फटाक्यात 'सापाची गोळी' हा एक प्रकार असतो.गुलाच्या काडीने ती गोळी पेटवली की बिळातून एखादा नाग फुसफुसत बाहेर निघावा त्याप्रमाणे काहीतरी बाहेर निघतं आणि शेवटी विझून विरून जिरून जातं,दशा दशा होऊन वाऱ्यावर उडून जातं.काही ठोस नसतंच त्यात.नुसता कचरा.सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या,त्यातून रंगलेला कंगणोत्सव, बॉलिवूड ड्रॅग रॅकेट आणि त्यावरून महाराष्ट्रात झालेले राजकीय घमासान,अर्णव गोस्वामींचे अकांड तांडव या सगळ्याची परिणीती काय ? तर सापाची गोळी.चेतलं,चेकाळलं, उकळलं उतूगेलं,फसफसलं आणि नासलं.त्यांचे राजकीय डावपेच काय असतील ते असोत.टीआरपीची गणितं काय असतील ते असोत.


पण जनता म्हणजे प्रेक्षक या सगळ्या बकवाझ फालतूपणाला अक्षरशः विटली आहे.एकतर या काळात बहुतेक आणि बहुसंख्य जनता कोरोना लॉकडाऊनमुळे घरात बसून होती.खाण्यात,झोपण्यात,एकमेकांशी किंवा फोनवरून मित्र नातेवाईकांशी बोलण्यात  किती वेळ घालवणार ? मग मन मारून टीव्ही पहायचा.त्यातही सगळ्या मालिका झालेले एपिसोड पुन्हा पुन्हा दाखवत होत्या.सिनेमेही तेच ते पाहून झालेले.आयपीएल तेव्हा सुरु झालेलं नव्हतं.रामायण-महाभारत सुरु होऊन संपलं होतं.असा सगळा बाका प्रसंग.त्यात सुशांत सिंहने आत्महत्या केली आणि सगळ्यांनीच 'मोका' साधला.अर्णब गोस्वामी,त्याचे रिपब्लिक चॅनल,इतरही सगळे हिँदी मराठी इंग्रजी चॅनल्स,सोशल मीडियावरील आर्य-अनार्य,आस्तिक-नास्तिक,देव-दानव,मरीआई-म्हसोबा,अशी सगळी येड्याची जत्रा आपण पहिली.त्यात सगळ्याच राजकीय मंडळींनी फक्त हातच धुवून घेतले असे नाही तर नागडे होऊन एकमेकांच्या आणि तत्व मूल्य सिद्धांत, किमान औचित्य सभ्यतेच्या नावाने आंघोळी करून घेतल्या.त्याआधी अर्थात एकमेकांवर येथेच्छ चिखलफेक आणि धुळवड साजरी करून.स्वतःची खुंटीवर टांगली,दुसऱ्यांची वेशीवर टांगली.यात सगळेच सामील झाले.


राज्यपाल आणि माजी सैनिकी अधिकारी सुद्धा.मुंबईत गेल्या शंभर सव्वाशे वर्षांपासून बॉलिवूड नांदतंय.भानगडी काय कमी झाल्या.पण आजवर कोणा राज्यपालाने एखाद्या नटीला राजभवनावर बोलावून तिची वास्तपुस्त केली नव्हती.कोशारीबाबांनी तेही केलं.( आणखी काय काय केलं ते आपल्याला माहिती आहेच)असो.   आमच्या मुंबईच्या महापौर पेडणेकर बाईंनी तर  'नणंदेचे कार्टे' पिरपिर करते म्हणून त्याच्या पाठीत धपाटा घालावा तसे कंगणा येणार म्हणून तिचे घर पाडून ठेवले.या सगळ्याचा सारांश काय निघाला ?आधीच सांगितलं त्याप्रमाणे सापाच्या गोळीची राख.यात सामील असलेल्या प्रत्येकाचे इरादे वेगवेगळे पण एकमेकाला पूरकच होते.यात मूर्ख बनली ती जनता.अमुक अमुक चॅनल्सचा टीआरपी फेक बनावट खोटा आहे,म्हणजे बाकीचे सगळे साधू संत महात्मे आहेत असे नाही.गंदा है पर धंदा है असे म्हणत सगळेच शेण खातात.


खोटा टीआरपी दाखवून राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून जाहिराती आणि पॅकेज मिळवतात. फक्त इलेक्टॉनिकच कशाला प्रिंट मीडियात सुद्धा आम्हीच नंबर वन.म्हणून फेक कंपन्यांकडून फेक सर्व्हेक्षण करून घेऊन फेक सर्क्युलेशनची आकडेमोड केलीच जाते की.तिकडे कोणी 'हंसा' आहेत तर इकडे ही 'कावळे' आहेतच.एकूण काय तर मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी होते ती उगाच नाही.ते एखाद्या संन्याशाला विकी डोनर ठरवून सुळावर चढवू शकतात आणि एखाद्या विकी डोनरला साधू संत महात्मा म्हणू शकतात.माकडाकडून वाघ असल्याचे लेखी लिहून घेण्याचे कसब आपल्याकडे आहे.याचा अर्थ पकडलेले बोगस टीआरपी प्रकरण भंकस आहे असे नाही.पण इथे कोणीच साळसूद आणि शहाजोग नाही असे आमचे म्हणणे आहे.


हमाम में सब नंगेच आहेत.सापडला तो चोर इतकेच.मुंबई पोलिसांनी परवाच राज्यात गेल्या पाच-सहा महिन्यात ८० हजाराहून अधिक फेक फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम असे सोशल मीडियावरील अकाउंट्स चालवले गेल्याचा भंडाफोड केला.भाजपच्या मीडिया सेलकडून हे रॅकेट चालवले गेले असा पोलिसांचा आरोप आहे.त्यात आता हा बोगस टीआरपीचा मामला.हा सगळा एकमेकांचे कपडे फाडण्याचा प्रकार आहे.यातून निष्पन्न मात्र काहीच नाही.इतकं सगळं होऊन अखेर सुशांतने आत्महत्याच केल्याचं सिद्ध झालं.बॉलिवूड ड्रॅग कनेक्शनचीही नशा उतरली.रिया जामिनावर सुटली.बाकीचेही सुटतील.त्यांची कुठे बातमीही येणार नाही.तेव्हा या टीआरपी घोटाळ्याचे काय घेऊन बसलात.सापाची गोळी, धुसफूस धुसफूस फुसफुसफूस..


-रवींद्र तहकिक

7888030472 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या