'सकाळ'चे संचालक भाऊसाहेब पाटील यांचे निधनपुणे : सकाळ माध्यम समुहाचे संचालक (ऑपरेशन्स) भाऊसाहेब पाटील (वय 55) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. भाऊसाहेब पाटील यांचे मुळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील बामणी (ता. कागल). अंत्यसंस्कार बामणी येथे पहाटे होणार आहेत. 


पाटील यांनी सकाळमध्ये 34 वर्षे सेवा केली. ते 1986 मध्ये कोल्हापूर सकाळमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनियर म्हणून रुजू झाले. छपाईच्या पारंपरिक पद्धतीकडून संस्थेन नवीन तंत्रज्ञान रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोल्हापूरनंतर ते पुण्यात आले. त्यानंतरही सातत्याने सकाळच्या विविध विभागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणले. सकाळ समुहातील प्रॉडक्‍शन विभागात सुधारणा आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.


संगणकाचा वापर वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विविध आवृत्त्यांसाठी प्रिटिंग प्रेस स्थापित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. यामुळे छपाईचे काम वेगाने आणि दर्जेदार होऊन सकाळच्या वितरण प्रणालीत सुधारणा झाली. गोवा, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे प्रिटिंग प्रेस सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. "सकाळ'च्या डिजिटल आणि विविध विभागातील तंत्रज्ञानाचा वापर यांसह वृत्तपत्रातील दर्जात्मक वृद्धीसाठी त्यांना वॅन इफ्राद्वारे सन्मानितही करण्यात आले होते.भाऊसाहेब पाटील यांच्या अकाली निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रगट  केला आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या