केतकर जेंव्हा वागळेंचा बांध रेटतात...



 केतकर जेंव्हा वागळेंचा बांध रेटतात...हा फारच अतर्क्य समास वाटतोय का ? म्हणजे केतकर,वागळे, बांध,रेटणे वगैरे.केतकरांचा आणि वागळेंचा रेटण्याशी बराच जवळकीचा संबंध असला तरी बांधाशी काय संबंध.त्यामुळे हेडिंग वाचून तुमच्या डोळ्यात उगवलेले शंकेचे कुसळ मला स्पष्ट दिसतेय.पण तुम्हाला माझ्या नजरेतले मुसळ बहुदा दिसत नसावे.असो,तरी तुमची शंका रास्त आहे.म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे केतकर किंवा वागळे या दोघांनाही या पृथ्वीतलावर कुठेही शेतीसाठी म्हणून राखलेली, स्वतःच्या मालकीची, गुंठाभर,सोडा अडीच हात सुद्धा शेतजमीन (तूर्तास तरी) नाही.दोघे एकमेकांचे कधी शेजारी 'पाजा'री नव्हते,नाहीत,पुढेही कधी असणार नाहीत.


 असे असताना केतकरांनी वागळेंचा बांध कसा काय रेटला बुवा ? अशी आपल्या डोक्यात निर्माण झालेली शंका रास्त आहे.ती जरा दाबून ठेवा,कारण पुढची बात ऐकाल तर तुम्ही उडालच.केतकरांनी आपला बांध रेटल्याचं कळताच वागळेंनीही केतकरांच्या कुरणात आपली ढोरे घुसवली,आणि बेफाम चारवली.हे सगळं पेट्रो-'मॅक्स'च्या उजेडात ऑनलाईन 'महाराष्ट्रात' घडलं,म्हणजे पहा.आहे की नाही 'घेणं अन देणं,कंदील लावून येणं'.तुम्ही म्हणाल,सांगा की राव पटकन काय झालंय काय.उगाच आपलं नमनाला घडाभर तेल जाळताय.कसला बांध,कसली रेटारेटी,कुठलं कुरण,कसली ढोरं ? 


सांगतो सगळं इस्कटून इस्कटून सांगतो.झालं काय की आपले कुमारभाऊ केतकर आहेत ना,त्यांनी इंदिरा गांधींच्या स्मृती दिनानिमित्त (निखिल दादा वागळे शीत निद्रेत असताना) त्यांचा बांध रेटला.म्हंजे मॅक्स-महाराष्ट्र नामक ऑनलाईन ब्लॉग वजा वेब चॅनलवर दिवाबत्ती केली.केतकर काँग्रेसचे खासदार आहेत,आणि स्वतःला नेहरू-इंदिरावादी म्हणवतात.त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी आणि त्या अनुषंगाने नेहरू-गांधी परिवाराचे पोवाडे गायले.इथपर्यंत ठीक होते.पण त्यांनी ओघाओघात बांध ओलांडला.नव्हे रेटला.त्यांनी चक्क इंदिरा गांधींच्या आणिबाणीचे समर्थन केले.


झाले वागळेंची सटकली.त्यांनी दंडुका घेतला.आपली नेहमीची ढोरे काढली आणि सरळ केतकरांच्या कुरणात  घुसवली.कंटेन महत्वाचा नाही.म्हणजे तो आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे.नसेल तर पेट्रो 'मॅक्स' पेटवा,आणि पहा.वाचा.ऐका.म्हणजे तुम्हाला या लबाड शेतकऱ्यांचा 'वावर' कळेल.आम्ही फक्त हिंट देतो.तुम्ही समजून घ्या.सध्या हे दोघेही भूमिहीन शेतकरी आहेत.का म्हणून विचारा.अहो यांनी देवाला फसवले.म्हणजे देव म्हणाला तुला दुप्पट पीक देतो पण वरचा अर्धा हिस्सा माझा.तर यांनी भुईमूग लावला.दुसऱ्या वर्षी देवाने खालचा हिस्सा मागितला तर यांनी जोंधळा पिकवला.तिसऱ्यावेळी देवाने खालचा आणि वरचा हिस्सा मागितला तर यांनी मका काढला.याला चतुराई म्हणायचे की लबाडी ? ते तुम्हीच ठरवा.मग देवाची सटकली.त्याने पाऊसच बंद केला.म्हणजे पडायचा तर अवकाळी.वेळेला केळ.त्यातून काही उगवले तर गारपीट.त्यातून वाचले तर टोळधाड.कसला हमीभाव आणि कसला विमा.


दोन कवड्यांचा सन्मान.तो ही मागच्या दाराने.केतकरांचं भाग्य निदान तेवढं तरी फळफळलय (पण तेवढ्या साठी किती फळाफळा ! ) वागळेंच काय ? त्यांना तर लोकांच्या ऊसात अफू-गांजा उगवावा लागतोय.खरा-खुरा नव्हे हो.म्हणजे उगाच आपलं उदाहरण म्हणून घ्या.च्यायला,या 'घ्या'चा ही अर्थ इथे निराळाच निघतो काय ? यालाच बुद्धिभेद म्हणतात.जो वागळे आणि केतकर यांनी केला.सांगितले ना दोघेही लबाड शेतकरी आहेत.वावरायला शेत नसले म्हणून काय झाले ,काहीही झाले तरी मूठ थोडीच वाया जाते.हे तर तिळाची चाड असणारे हुन्नरी पेर्ते आहेत.पेट्रो 'मॅक्स'वर रेटारेटी करून त्यांनी दिवाबत्तीची सोय केली आहे.कळलं का काही.पेटली का बत्ती ? पडला का डोस्क्यात उजेड ?


-रवींद्र तहकिक

7888030472

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या