पत्रकार बाळ ज. बोठे यांचाही कटात सहभाग ?
नगर - नगर जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या रेखा जरे - पाटील खून प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून, या कटात पत्रकार बाळ ज बोठे यांचे नाव आल्याने मीडियात खळबळ उडाली आहे.
रेखा जरे - पाटील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या त्या पदाधिकारी होत्या. तथापि, अलिकडेच त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्त्या म्हणून त्या राष्ट्रवादीत सक्रीय होत्या. मराठा क्रांती मोर्चा आयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता.
रेखा जरे या सोमवारी त्यांचे चारचाकी वाहन घेऊन पुणे येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या आई, मुलगा व महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने होत्या. पुणे येथून परत येत असताना जातेगाव घाटामध्ये यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपीना अटक केली असून, या कटात पत्रकार बाळ ज. बोठे यांचाही कटात सहभाग असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. बोठे सध्या फरार आहेत.
बोठे यांचा या खून प्रकरणात सहभाग होता की नगरमधील हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आणल्यामुळे आरोपींने त्यांचे नाव मुद्दाम घेऊन या प्रकरणात गुंतवले याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान , बोठे यांचे नाव येताच अनेकांना धक्का बसला असून, मीडियात खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या