बँकांतील निष्क्रिय खात्यांचा २१६ कोटी १९ लाखांचा महाघोटाळा उघडकीस आलाय.राजेश शांतीलाल शर्मा नावाचा औरंगाबादचा एक अवघा ४२ वर्षाचा तरुण पत्रकार त्यात मुख्य गुन्हेगार म्हणून पकडला गेलाय.गुन्हेगार आणखीही पकडले गेलेत.आणखी पकडले जातील.हा काही देशातला पहिला वाहिला आर्थिक गुन्हा नाही,किंवा त्यात पकडले गेलेले हे पहिले वहिले आरोपीही नव्हे.पण माझ्या माहिती प्रमाणे एवढ्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यात अडकलेला आणि पकडलेला राजेश शर्मा पत्रकारितेच्या इतिहासातील पहिला पत्रकार आहे.(किंवा होता म्हणा हवे तर) .
अहमदनगरच्या हनी ट्रॅपवर लेखमाला लिहून गिऱ्हाईके शोधणाऱ्या आणि मांडवल्या करून कमाई करणाऱ्या.त्यातूनच एका महिलेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या बाळ बोठेच्या धक्क्यातून महाराष्ट्राची पत्रकारिता सावरत नाही तोच हा राजेश शर्माच्या 'लक्ष्मी'गिरीचा 'बॉल' पत्रकारितेच्या नैतिकतेचा त्रिफळा उडवून गेला आहे.तशीही आमची पत्रकारिता आता नैतिकतेच्या बाबतीत २०-२०च,झाली आहे.पुस्तकी फटके आजकाल कोण खेळतो ? सगळ्यांना पुढच्या सिजनमध्ये भाव वाढवण्याची पडलेली.त्यासाठी मग दे दणादण चालू असते सर्वत्र.म्हणजे गाव पातळीच्या वार्ताहर-प्रतिनिधी पासून वरपर्यंत वाळू,दारू,गुटखा,मटका,जुगार अड्डे,या पासून कंत्राटदार,ठेकेदार,सरकारी आधिकारी कर्मचारी,पोलीस यांच्याकडून भेटी 'गाठी' आणि राजकीय मंडळींकडून,व्यापारी-उद्योजकांकडून 'पाकिटे'-'पार्सले' स्वीकारण्याचा ( किंवा गोळा करण्याचा) उद्योग करणारे कमी नाहीत.या वर कमाईची खुशीत गाजरे खाणाऱ्या ( सन्माननीय अपवाद वगळता) पत्रकारांसाठी राजेश शर्माने मारलेला हा 'लक्ष्मी' षटकार ख्रिस गेलच्या बापालाही लाजवणारा म्हणावा लागेल.
राजेश शर्माला मी ओळखतो.चांगलाच ओळखतो.म्हणजे ओळखून आहे.२००० ते २००७ तब्ब्ल ७ वर्ष त्याने माझ्या हाताखाली उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे.त्यातली पहिली तीन वर्ष तर तो बामू मध्ये जर्नालिझम शिकतच होता.पुढची चार वर्ष नुकताच जर्नालिझम झालेला पत्रकार म्हणून.कोचिंग क्लासेस सम्राट मछिंद्र चाटे यांनी सुरु केलेला 'लोकसंकेत'हा पेपर.तो सुरु होऊन बंद पडेपर्यंत मी तिथे मुख्य संपादक होतो तर राजेश शर्मा उपसंपादक.थोडक्यात बंदा अपना चेला है. हे सांगायला मला काल परवा पर्यंत अभिमान वाटायचा.(आज लाज)तर दैनिक लोकसंकेत.पगार दोन हजार.(त्याला) काम दहा-बारा तास.( हे मात्र दोघांना ) औरंगाबादच्या ठाकरे नगरात ८०० रुपये भाड्याची सिंगल रूम.(त्याची) ६०० रुपयांची एक घरगुती मेस.(ही पण त्याचीच)उरलेल्या सहाशे रुपयात तो महिना ढकलायचा.( त्यासाठी मी ही विना परतीच्या खात्रीने थोडाफार हातभार लावायचो) .
तो हा राजेश.लोकसंकेत बंद पडल्यावर तो लोकमत मध्ये गेला.स्पोर्ट बिट करू लागला.त्यातच एकदा भारतीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची गुप्त औरंगाबाद भेट आणि नंतर धोनीची पत्नी झालेल्या 'साक्षी'च्या लव्हस्टोरीची स्टिंग न्यूज लावल्यामुळे राजेश शर्मा दिवसातून हिरो झाला.मालकाच्या गळ्यातला ताईत बनला.जवळपास पाच वर्षे त्याने लोकमतमध्ये स्पोर्ट केलं.(हा त्याच्या आयुष्यातला 'रामायण' काळ होता) नंतर दिव्य मराठी लाटेत तो दिव्य मराठीत गेला.( आणि त्याचा 'महाभारत 'काळ सुरु झाला.)
माझ्या माहिती प्रमाणे मागच्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत राजेश 'दिव्य'त्वाची प्रचिती घेत असावा.नंतर त्याला अवदसा आठवली,आणि तो एन-न्युज चॅनल मध्ये गेला.तिथे डायरेक्टर की काय झाला होता म्हणतात.तो जसजसा घसरत गेला तसतसा मला विसरत गेला.मला त्या बद्दल खंत-खेद बाळगण्याचं कारण नव्हतं.पण तो इतका घसरलाय हे आधी कळलं असतं तर मी 'पुराना गुरु' म्हणून त्याचे कान पकडून त्याला ताळ्यावर आणण्याचा एक (कदाचित असफल) प्रयत्न नक्कीच करून बघितला असता.'लोकसंकेत'मध्ये तंगीत पत्रकारिता करताना एका क्लासमेन्टच्या प्रेमात पडलेला राजेश शर्मा सेटल नसल्याने तिच्याशी लग्न करू शकत नव्हता,त्यामुळे निराश होता.एकदा त्याने थेट आत्महत्येची भाषा केली.त्यावेळी मीच रात्री १.३० वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत औरंगाबादच्या सिडको बसस्थानकावरच्या प्रवासी बेंचवर बसून त्याचं काउन्सिलिंग केलं होतं.दुसऱ्या दिवशी त्या मुलीलाही समजावलं होतं,आणि त्यांचं सॉफ्ट ब्रेक अप केलं होतं.
असच त्याचं लोकमत मध्ये असताना जुळलेलं परमजीतसिंग संधू बरोबरचं अव्यवहारिक ब्रेक अप मला तोडता आलं असतं तर किती बरं झालं असतं.पण बंदा काय करतोय,कुठे पोहचलाय ते 'गुरु'ला माहीतच नव्हतं.असे म्हणतात की एएन-न्युज मध्ये आलेला तोटा भरून काढण्यासाठी संधू आणि राजेश शर्माने वारुळात हात घात घातला अशी आता कबुली दिलीय म्हणे.पण बिचाऱ्याला माहित नव्हतं.गुरु वचन विसरला असावा.( मी लोकसंकेत मध्ये असताना एकदा सांगितलं होतं) 'झाटे उपटल्याने मुर्दा हलका होत नसतो.हे ही सांगितलं होतं की जेवढा मुडदा तेवढाच गड्डा खोदावा.म्हणजे माती सरतही नाही आणि उरतही नाही.असो झक मारली..गाढवा पुढे गीता वाचली.ही पहा..मीच माझ्या थोबाडीत मारून घेतली.
-रवींद्र तहकिक
7888030472
0 टिप्पण्या