बेरक्या ब्लॉगला दहा वर्षे पूर्ण !





बेरक्या उर्फ नारद ब्लॉग सुरु होवून आज बरोबर दहा वर्षे पूर्ण झाली.मराठी माध्यम क्षेत्रातील ताज्या घटना - घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे - नागडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आला होता, गेल्या दहा वर्षांपासून हे काम अखंडितपणे सुरु आहे. मागील दहा वर्षाकडे वळून पाहिले असता, अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले


आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून अनेक मित्र जोडले. मराठी मीडियात घडणाऱ्या बातम्या तात्काळ दिल्या. अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. तसेच  चांगल्या पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो.  जिथे -जिथे अन्याय झाला तिथे पेटून उठलो, मुखवटा पांघरून काळे धंदे करणाऱ्याला त्याचे खरे रूप दाखवून दिले. अनेक गरीब पत्रकाराना आर्थिक मदत  मिळवून दिली.


आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.केवळ पत्रकारांच्या हितासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.  


अनेकांना प्रश्न पडला आहे की , बेरक्या म्हणजे काय ? . आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुशार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो.


 बेरक्याचे खरे नाव काय ? तो कुठे राहतो, काय करतो याचे अनेकांना औत्सुक्य आहे. आम्ही एवढेच सांगू इच्छतो की, सकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ? मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता ? आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा आहे.  सत्याला साथ,अन्यायाला लाथ देणारा आहे.


गेल्या दहा वर्षात आम्ही कुणाचाही मुलाहिजा न ठेवता अनेकांचा भांडाफोड केला. मुखवटा पांघरून काळे धंदे करणाऱ्यांना उघडे - नागडे केले. अश्या बदमाश लोकांनी आम्हाला अडचणीत आणण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण  बेरक्या कुणापुढेही झुकला नाही की वाकला नाही. बेरक्या ब्लॉग बंद पाडण्यासाठी अनेकांनी  प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला .


हल्ली बेरक्यावर कधी तरीच अपडेट असते,बेरक्या पुर्वीप्रमाणे आक्रमक नाही,बेरक्या थंड झाला,अशी चर्चा काहीजण करत आहेत.चर्चा करणा-यांच्या तोंडावर आम्ही हात धरू शकत नाही.ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.परंतु आम्ही सांगू इच्छितो की,बेरक्याला माहिती मिळताच,त्याची एकदा नव्हे चारदा खात्री केली जाते,क्रॉस चेक झाल्यानंतर बातमी खरी असेल तर बेरक्यावर प्रकाशित केली जाते.त्यामुळे बेरक्यावर कमी प्रमाणात पण शंभर टक्के ख-या असणा-या बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत.


बेरक्यावर आलेली बातमी शंभर टक्के खरी असते,असा पत्रकारांचा आणि लोकांचा  विश्वास आहे,बेरक्या ब्लॉग फक्त पत्रकारच वाचत नाही तर सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर महाराष्ट्रात तमाम जनता वाचते.मराठी मीडियात बेरक्याने इतिहास घडवला आहे.सर्वाधिक वाचणारा आणि लाखो हिटस् मिळवणारा बेरक्या हा ऐकमेव ब्लॉग आहे.त्यामुळे कोणाच्याही  विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही.बेरक्याची लोकप्रियता अफाट आहे.त्याने मराठी मीडियाचे एव्हरेस्ट सर केले आहे.त्यामुळे या लोकप्रियतेला गालबोट लागू नये,याची काळजी घेतली जात आहे.यश मिळवणे जेवढे अवघड आहे,तेवढे यश पचवणे अवघड आहे.


यश मिळाले म्हणून कश्याही बातम्या देणे आणि त्या खपवणे हे बेरक्याच्या रक्तात नाही.भले एक बातमी देता आली नाही तरी चालेल परंतु चुकीच्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ती बातमी टाळणे योग्य आहे.बेरक्या कोणाच्याही विरूध्द ऊठसुठ बातम्या देत नाही.ज्या बातम्या ख-या असतील किंवा माहिती खरी असेल तरच बातम्या प्रकाशित केल्या जातात.


बेरक्या म्हणजे मराठी मीडियातील पीटीआय किंवा गॅझेट झाला आहे.त्यामुळे बेरक्यावर येणा-या बातम्या या तंतोतंत ख-या असतील.कोणाची दुश्मनी काढण्यासाठी बेरक्या ब्लॉगचा आता वापर होणार नाही.त्यामुळे कोणाला काय चर्चा करायची ती करू द्या,परंतु बेरक्यावर येणारी बातमी सत्यच असेल.

बेरक्याला माहिती देण्यासाठी सोबत पुरावे जोडावे.कोणाच्याही विरूध्द खोट्या बातम्या पाठवू नये,इतकेच यानिमित्त सांगणे. (आम्ही सोर्सचे नाव कुणालाही सांगत नाही.)


हा ब्लॉग चालवण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले, त्यांचे आभार. आपण भरभरून प्रेम केले म्हणून बेरक्याला दहा वर्षाचा टप्पा गाठता आला. आपले प्रेम, स्नेह आणि सहकार्य कायम राहो, ही अपेक्षा. 


- बेरक्या उर्फ नारद

पत्रकरांच्या बातम्या देणारा पत्रकार 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या