दैनिक लोकमतची आंबटशौकीन पत्रकारिता !पत्रकारिता म्हणजे काही सामाजिक क्रांतीचा मार्ग नव्हे.सामाजिक प्रबोधन,परिवर्तन,लोकशाहीचे रक्षण,जनतेचे प्रश्न ही काही वर्तमानपत्रांची जबाबदारी नव्हे.हा एक व्यवसाय आहे;आणि व्यवसायाचे सगळे नियम वृत्तपत्र व्यवसायाला देखील लागू होतात.मागणी तसा पुरवठा आणि नफा हा बाजाराचा नियम आहे.तो आम्हाला पाळावा लागेल.आम्ही फारफार तर काय घडले हे सांगू.काय घडावे हे नाही सांगणार.जे सांगू ते ही आमच्या सोयीचे,म्हणजे फायद्याचे असेल तरच .गैरसोयीचे आणि तोट्याचे आम्ही सोडून देऊ. मला जर योग्य किंमत मिळाली तर मी माझ्या वर्तमानपत्रात संपादकीय पानावर अग्रलेखाच्या जागी देखील जाहिरात छापील.हे बोल आहेत व्हाईस ऑफ महाराष्ट्र ; दैनिक लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांचे.


जे घडलेच नाही,त्याची रंजक-चटकदार बातमी द्यायची.त्यात ती महिलाविषयक असेल आणि लैंगिक संबंधाने असेल तर मग त्यात आणखी ठेवणीतला खमंग माल-मसाला टाकायचा.तडका द्यायचा ,म्हणजे आंबटशौकीन वाचक अशा बातम्या मिटक्या मारत वाचतो.मागणी तसा पुरवठा हे धंद्याचे गणित आहे,त्यामुळे धंदेवाईक पत्रकारिता करणारे माध्यम सम्राट आता कशाचाही विधिनिषेध बाळगताना दिसत नाहीत.इथिक्स वगैरे सोडाच किमान औचित्य देखील पाळताना दिसत नाहीत.जळगाव मधील आशादीप वसतिगृहात न घडलेल्या 'नग्न नृत्याची' दैनिक लोकमत या महाराष्ट्रातील एका अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राने छापलेली बातमी हे त्याचेच द्योतक आहे.वास्तवात तेथे असे काही घडलेच नाही.


विविध गुन्हे तसेच वादग्रस्त प्रकरणातील महिलांना त्यांच्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी किंवा वाद निकाली लागेपर्यंत सुधारगृहात ठेवण्यात येते.जळगाव मध्ये आशादीप नावाचे असे एक सुधारगृह आहे.या सुधारगृहातील महिला कुटुंबापासून समाजापासून तुटलेल्या,गुन्हेगारी वृत्तीच्या,अत्याचारित,पीडित किंवा किंवा मनोरुग्ण देखील असू शकतात.त्यांच्यात आपसात भांडणे होणे,आदळआपट ही नित्याची बाब असते.त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिला निरीक्षक,अधीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी असतात.


या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नसतो.पण दैनिक लोकमतच्या जळगाव मधील एका पत्रकाराला अंतरचक्षुने तिथे नग्ननृत्य चालू असलेले दिसले.इतकेच नाही तर वसतिगृह अधीक्षक,निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संगमताने काही पोलीस कर्मचारी हे नग्ननृत्य पाहत होते.असे करण्यासाठी वसतिगृहातील महिलांना सक्ती करण्यात येत होती,मारहाण करण्यात येत होती.त्या महिला त्यावेळी मोठमोठ्याने आक्रोश करत मदतीची याचना करत होत्या वगैरे.बातमी धक्कादायक होती.सुशांत राजपूतची आत्महत्या,कंगना राणावत आणि बॉलिवूड ड्रग्ज,धनंजय मुंडे ,पूजा चव्हाण या नंतर महाराष्ट्रातील आंबटशौकीन वाचकांना आणि राजकारण्यांना असा काहीतरी खमंग विषय हवाच होता.तो लोकमतने दिला.पत्रकाराने बातमी दिली आणि संपादकांनी डोळे झाकून शहानिशा न करता पहिल्या पानावर छापून टाकली.


धनंजय मुंडेची प्रितपात्र कबुली  आणि संजय राठोडच्या राजीनाम्यामुळे विधानसभा गाजवायची  कशी असा प्रश्न पडलेल्या विरोधीपक्षांना ऐन विधानसभा अधिवेशन काळात सरकारला बदनाम करण्यासाठी  सणसणीत ब्लॉकब्लास्टर विषय मिळाला.पण जेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तेव्हा आशादीप वसतिगृहात असे काही घडलेच नाही हे सत्य समोर आले.स्वतः राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या सभागृहात या संबंधात निवेदन देत दैनिक लोकमत मध्ये प्रकाशित झालेली बातमी खोटी,निराधार आणि चूक असल्याचे सांगितले.इतकेच नाही तर अशा प्रकारची महिलाविषयक विकृत आणि बदनामीकारक बातमी प्रकाशित केल्याबद्दल संबंधित पत्रकार आणि वर्तमानपत्रावर कारवाई करण्यात येईल असेही देशमुख म्हणाले.


अनिल देशमुखांनी खरेच बोलल्या प्रमाणे करावे.हे प्रकरण केवळ दीड इंचाच्या दिलगिरीच्या चौकटीवर निभावून जाऊ नये.राजकीय लाभ-दुर्लाभ,सवंग प्रसिद्धी,आंबटशौकीन वाचकांचा टीआरपी यासाठी अशा प्रकारच्या बातम्या देणे ही एक विकृती आहे.त्यातही हा प्रकार महिलांच्या संबंधात होत असेल तर ते मढ्याच्या टाळूवरचे फक्त लोणीच नाही तर अख्खे मढेच खाण्यासारखे आहे.स्वतःला व्हाईस ऑफ महाराष्ट्र म्हणवणाऱ्या दैनिक लोकमत सारख्या वर्तमानपत्राकडून अशा प्रकारच्या अनैतिक पत्रकारितेची अपेक्षा नाही.


-रवींद्र तहकिक

7888030472

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या