पत्रकार संजय भोकरे यांना 'मोक्का'

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यात खळबळ 




पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संस्थापक, दैनिक जनप्रवासचे मालक, संपादक संजय भोकरे यांच्याविरुद्ध पुण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी आता मोक्का सुद्धा लावला आहे.  पाषाण येथील ६८ वर्षांच्या महिलेच्या सहकारनगरमधील ४ एकर ९ आर मिळकतीचा व्यवहार करून परस्पर ऋषिकेश बारटक्के यांच्याकडून ७० लाख रुपये घेऊन फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी पत्रकार संजय भोकरे याच्यासह ८ जणांवर ‘मोक्का’ कारवाई केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून संजय भोकरे हे फरार आहेत.


रवींद्र लक्ष्मण बर्‍हाटे, शैलेश जगताप (रा. सोमवार पेठ, पोलीस लाइन), परवेझ जमादार (रा. सोमवार पेठ, पोलीस लाइन), देवेंद्र जैन (रा. सिंहगड रोड), प्रकाश फाले (रा. कोथरूड), प्रशांत जोशी (रा. कोथरूड), विशाल तोत्रे (रा. पोलीस वसाहत, शिवाजीनगर), पत्रकार संजय भोकरे (रा. सिद्धीविनायक रेसिडेन्सी, कोथरूड) व इतर आरोपी यांच्याविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी दिले आहेत.


शैलेश जगताप व इतरांनी ऋषिकेश बारटक्के यांच्याशी बोलून व्यवहार करा, असे फिर्यादीला सांगितले होते. त्याप्रमाणे फिर्यादी व बारटक्के यांच्यात ५ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला, तर महसूल दफ्तरी सर्व कामां (जसे रजिस्ट्रेशन, मोजणी, वारस नोंद व इतर कामे) साठी ५ कोटी शैलेश जगताप व प्रशांत जोशी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मित्र संजय भोकरे यांना या कामासाठी द्यावे लागतील, असे फिर्यादीसमोर ठरले. त्याप्रमाणे दोन वेगवेगळे करारनामे करण्यात आले. त्यानंतर ऋषिकेश बारटक्के यांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपये तर मुलीच्या खात्यात ५ लाख जमा केले. 


त्यानंतर फिर्यादीच्या नावाने परस्पर ऋषिकेश बारटक्केकडून शैलेश जगताप, जयेश जगताप, परवेझ जमादार व प्रशांत जोशी यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये ऋषिकेश बारटक्केला धमकावून २० लाख रुपये घेतले. पैसे दिले नाही तर हा व्यवहार पूर्ण होऊ देणार नाही, अशी धमकी देऊ लागले. संजय भोकरे व इतर वारस नोंद व मोजणी करण्यासाठी काहीही करत नसल्याने बारटक्के याने महसूल दफ्तरी पाठपुरावा करून जानेवारी २०१८ मध्ये नाव लावून घेतले. हे समजल्यावर आरोपी खोट्या केसमध्ये अडकविण्याची व मारण्याची धमकी देऊन ४० लाख रुपये आरटीजीएसद्वारे व १० लाख रुपये रोख स्वरूपात भोकरेच्या नावे भोकरेच्या कर्वे रोडवरील कार्यालयात बोलावून घेतली. तसेच बारटक्के यांना सांगितले की, जयेश जगतापने निलमणी देसाई, बारटक्के यांच्याविरुद्ध फिर्यादसुद्धा तयार करून ठेवलेली आहे. शैलेश जगताप यांचे पोलीस खात्यात चांगले संबंध असल्यामुळे पूर्ण आयुष्य जेलमध्ये सडवू व त्यामुळे बारटक्केला नाईलाजास्तव पैसे द्यावे लागले, असे फिर्यादीत निलमणी देसाई यांनी म्हटले आहे.


फिर्यादीची ही मिळकत बळकाविण्याच्या उद्देशाने महसूल दफ्तर हरकती घेऊन जमिनीच्या व्यवहारात तडजोडीसाठी ३ कोटी रुपयांची मागणी करून वेळोवेळी धमक्या दिल्या होत्या. फिर्यादीने ऋषिकेश बारटक्के याच्याबरोबर व्यवहार केल्याने त्याची बदनामी केली होती.

पोलिसांनी या सर्व टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली असून, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या