निष्क्रिय बँक खात्यांतील कोट्यवधींच्या डेटाविक्रीचा डाव उधळला

औरंगाबादच्या AM  न्यूज चॅनलचे दोन संचालक घोटाळ्यातील आरोपी 


पुणे - महाराष्ट्रासह देशातील  वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली विविध बँकेतील खाती (डोरमंट अकाउंट) आणि काही सद्य स्थितीतील ग्राहकांच्या खात्याची इत्यंभूत माहिती चोरून 216 कोटी 29 लाखांचा डेटा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील बंद पडलेल्या AM  न्यूज चॅनलचे दोन संचालक आणि चार आयटी इंजिनिअरसह महिलांचा समावेश आहे. या कारवाईने बँकिंग क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.


रविंद्र महादेव माशाळकर (वय 34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई), मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय 37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (वय 37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, औरंगाबाद ), परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद ) व अनघा अनिल मोडक (वय 40, वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश मुन्नालाल शर्मा  आणि परमजित सिंग संधू  हे औरंगाबादमधील बंद पडलेल्या AM  न्यूज चॅनलचे  संचालक आहेत. 


आरोपींनी संगनमत करून काही नामांकित बँकातील डोरमंट अकाउंट (निष्क्रिय खाते) आणि काही अॅक्टिव्ह बँक खात्याची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. सर्व बँक खात्यात जवळपास 216 कोटी 29 लाख रुपये होते. ही पूर्ण माहिती चोरल्यानंतर आरोपी ते एकाला विक्री करणार होते, पण त्याची माहिती सायबर सेलला मिळाली. त्यानंतर सायबर पोलीस आठ दिवसापासून टोळीच्या मागावर होते. त्यानुसार पथकाने त्यांना काल सिंहगड रोड परिसरात ताब्यात घेतले. या आरोपींपैकी रोहन मंकणी हा ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा आहे.


त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, दोन मोटारी, दुचाकी असा 43 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या पथकाने केली आहे.


हायप्रोफाइल घोटाळा टळला


पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांमुळे हायप्रोफाईल घोटाळा टळला आहे. आरोपीना आयटी क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव असून ते वेगवेगळ्या प्रसिद्ध कंपनीत कामे करतात. त्यांनी वेगवेगळ्या बँकांचे डोरमंट अकाउंट आणि काही सुरू असलेले खात्याची माहिती चोरली होती. त्यामध्ये पासर्वडसह इतर माहिती होती.


आरोपी निष्क्रिय खात्यावरून पैसे इतर खात्यावर वळवून फसवणूक करणार होते. त्यानुसार 25 लाख रुपयांचा व्यवहार देखील एका व्यक्तीसोबत झाला होता. पण पोलिसांनी फसवणूक प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.

Post a Comment

0 Comments