दैनिक 'लोकमत'चा जावई शोध... काय तर म्हणे द्राक्ष खाऊन माणूस मेला !

 एक'चक्रा'नगरीत बातमीची बकासुरी !!
मराठीतले कोणतेच वर्तमानपत्र कदाचित ही बातमी छापणार नाही,किंवा चौथ्या स्तंभातील कोणताच 'माईचा मइंद' ( 'माष्टर माइंड'ला पर्यायी मराठी शब्द ) यावर अग्रलेख,स्तंभलेख,ब्लॉग वगैरे खरडणार नाही.'दरडा'वून काढल्या जाणाऱ्या व्हाईस ऑफ महाराष्ट्रासमोर कोण माईचा लाल आवाज काढणार ? अर्थात त्याला व्यासायिक सहचर्य किंवा सौजन्य असे गोंडस नाव देऊन सत्य दडवले आणि डावलले जाईल.कदाचित लोकमतकडून आज उद्या त्यावर दिलगिरीची माती सुद्धा टाकण्यात येईल.पण तरी घाण ती घाणच. प्रसारमाध्यमांना इतरांच्या चुका आणि अपराधांवर बोट ठेवण्याचा,त्यावर भाष्य करण्याचा,मत मांडण्याचा,टीका-टिप्पणी करण्याचा अधिकार आहे.दुसऱ्याच्या खाजगी जीवनात डोकावण्याचा-नाक खुपसण्याचा अधिकार आहे.इतकेच नाही तर चित्रगुप्त किंवा रामशास्त्री प्रभुणेंची वस्रे पांघरून एखाद्याचा  'निकाल'लावण्याचाही अधिकार आहे.कारण आम्ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे धारकरी.परंतु आमच्याच बुडाखाली अंधार असेल तर तो कोणी उजेडात आणायचा ?


     गोष्ट महाभारत काळातील आहे.पांडव जेव्हा वनवासाला (आताचा कोरोना लॉकडाऊन समजा) दंडकारण्यात आले तेव्हा काहीकाळ एक'चक्रा'नगरीत ( आताचे जळगाव जिल्ह्यातले एरंडोल ) राहिले.ती एक 'पुण्यनगरी'च होती .त्या काळातले 'आदर्श गावकरी' तिकडे राहायचे.तर म्हणे बकासुर नावाचा एक राक्षस संपूर्ण गावाला 'दरडावून' रोज गाडाभर अन्न,रांजणभर पाणी,एक रेडा आणि माणूस एवढे खाद्य वसूल करीत असे.यात थोडासाही बदल झाला की बकासुराशी 'सामना'व्हायचा .मग गावाची पायली 'भरली'च समजा.विरोध कोणी करायचा.मुख्य म्हणजे 'पुढारी'कोणी व्हायचे,यावर गावात कधीच 'एकमत'होत नसायचे.त्यामुळे बकासुराची चलती होती.पण एक 'सकाळ'अशी उगवली की अखेर 'भीमा'ने म्हणे बकासुराची गठडी आवळून त्याच्या दहशतीतून गावकऱ्यांची सुटका केली.


आता ही गोष्ट का सांगितली म्हणून विचारा.तर मित्रहो,असे एक ताजे उदाहरण घडले आहे.ते शिळे होण्याआधी गरमागरम खा.मराठीतील एका बड्या,प्रथितयश आणि स्वतःला व्हाईस ऑफ महाराष्ट्र म्हणवणाऱ्या दैनिक लोकमतच्या दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सोलापूर ग्रामीण आवृतीच्या अंकात पहिल्या पानावर 'अति द्राक्ष खाल्ल्याने युवकाचा मृत्यू' या मथळ्याखाली वैराग डेटलाईनच्या नावे द्राक्ष फळाविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणारी बातमी प्रसिध्द झाली आहे. या बातमीमुळे सध्या लोकांमध्ये द्राक्षांविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बातमी देताना संबधित बातमीदाराने वैद्यकीय अहवालाचा आधार न घेता केवळ वैद्यकीय सुत्रांच्या अंदाजावर बातमी ठोकून दिली आहे.सदर घटनेत वैद्यकीय अहवाल प्राप्त होण्यापुर्वीच लोकमत दैनिकाने स्वतःच पोस्टमार्टेम करत ठामपणे अति द्राक्ष खाल्ल्यामुळेच मंदार भाऊराव मोरे (वय-२२ रा.वैराग, ता. बार्शी, जि.सोलापूर ) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर करुन टाकले आहे.


आधीच एकीकडे कोराना आणि लॉकडॉऊनच्या भितीमुळे राज्यातील द्राक्षउत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना व्यापाऱ्यांकडून कमी भावाने द्राक्षाचे सौदे सुरु असताना लोकमत दैनिकातून अशा प्रकारची चुकीची बातमी प्रसिध्द करुन राज्यातील लाखो द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले आहे. या बातमी विरोधात लोकमत दैनिकास नोटीस पाठवून योग्य खुलासा व राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांची माफी मागण्याची मागणी केली आहे.द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने दुष्काळ,अवकाळी पाऊस, गारपीट या सारख्या नैसर्गिक संकटाशी तोंड देत उत्तम दर्जाची द्राक्षे पिकवत असतो. गेल्या शेकडो वर्षांपासून जगभरातील लोकं द्राक्षफळ पिकवत आणि खात आली आहेत. पण आज वरच्या इतिहासात कधीही द्राक्षे खाऊन माणूस वा इतर कोणता प्राणी दाखवण्याची नोंद नाही. परंतु अख्ख्या विश्वात फक्त लोकमत दैनिकाने द्राक्षे खाऊन माणूस मेल्याचा शोध लावला आहे.


    अशा प्रकारच्या चुकीच्या बातमीमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन बाजारपेठांमधील द्राक्षाची मागणी घटणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहेत. त्यामुळे द्राक्ष ग्राहकांच्या मनातील गैरसमज वेळीच दूर होणे गरजेचे आहे. तरी याबाबत लोकमत दैनिकाकडून सदर चुकीच्या बातमी बद्दल तत्काळ माफी मागून योग्य खुलासा होणे गरजेचे आहे. अन्यथा सदर  दैनिकाच्या संपादकीय तसेच व्यवस्थापना विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे द्राक्षभूमी प्रतिष्ठान संस्थापक अभिजित झांबरे यांनी सांगितले.आता विचारा या बातमीचा आणि एक'चक्र'नगरी,बकासुर,गाडाभर अन्न आणि भीम याचा काय संबंध आहे.नाही-नाही..विचारा. विचारा हो ! मी मराठवाड्याचाच साथी आहे. तुमची मान कापायला घेणार नाही.


-रवींद्र तहकिक

7888030472

Post a Comment

0 Comments