राहुरीच्या पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या



नगर - राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहुरी शहरातून मंगळवारी  दुपारी रोहिदास दातीर आपल्या मोटारसायकल वरुन घरी जात असताना अज्ञातांनी त्यांचे अपहरण करून चार चाकी गाडीत टाकुन पळवून  नेले होते. आज पहाटे त्यांचा मृतदेह राहूरी कॉलेज रोडला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


कायम बहुचर्चित असलेले राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लाॅट, नगर मनमाड रोड वरील एका हाॅटेल इमारत बाबत त्यांनी आपल्या वृत्त पत्राच्या माध्यमातून रोखठोक लिखाण करून प्रशासनाला जागे केले होते. काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणातूनच त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. 


रोहिदास दातीर हे त्यांची सफेद रंगाच्या  ॲसेस कंपनीच्या एम एच १२ जे एच ४०६३ नंबरच्या दुचाकीवरून दि. ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या घरी दातीर वस्ती येथे जात होते. ते सातपीर बाबा दर्गा ते पाटाच्या दरम्यान असतानाच स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मल्हारवाडीच्या दिशेने पळवून नेले. यावेळी त्यांची दुचाकी व पायातील चप्पल घटनास्थळी आढळून आले. होते. 


घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. घटनेनंतर त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दरम्यान रात्री राहूरी कॉलेज रोड परिसरात रोहिदास दातीर यांचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात  आल्याचे  प्रथमदर्शनी दिसून आले असून हत्या कोणी व कशामुळे केली ? याचा शोध राहूरी पोलीस घेत आहेत. 


 मृत दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला होता. आता पत्रकार दातीर यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस कशाप्रकारे तपास करताय हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.यापूर्वी  रोहिदास दातीर  यांच्यावर अनेक वेळा  हल्ला झाला होता, त्यदुर्ष्टीने तपास होणे आवश्यक आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या