करा बातमी,जा विसरून...


काही जण कदाचित सोलापूरच्या प्रकाश जाधवची बातमी करतील.काहीजण कदाचित (बडे पेपर) करणारही नाहीत.जे करतील ते फार फार तर सिंगल कॉलम.लोकल पेपरला डबल कॉलम.सोशल मीडियावर श्रद्धांजली,सहानभूती.स्थानिक पातळीवर शोकसभा.पत्रकारांच्या संघटनांकडून निवेदन.मदत मिळवून देण्याची भाषा.बाकी इलेक्ट्रॉनिक मीडियात ताटाला वटकण म्हणून प्रकाश जाधवची बातमी ब्रेकिंग म्हणून सांगितली जाईल .स्पाईस आहे ना.करा करा.बातमी करा.वाचा,आणि विसरून जा.


प्रकाश जाधव सध्या नोकरीवर होता की कॉस्ट कटिंग मध्ये घरीच होता,याची कोण दाद-दखल घेणार ? ३५ वर्षाचा हा तरुण पत्रकार.त्याच्या सहित त्याचं अवघं कुटुंब कोरोनाग्रस्त झालं होतं.तो,त्याचा भाऊ,आई आणि वडील.प्रकाश गृहविलगीकरणात होता म्हणून सांगितलं जातंय.मला नाही खरं वाटत.गृहविलगीकरणासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा त्याच्या घरी नसाव्यात बहुतेक.अख्ख कुटुंब कोरोनाग्रस्त.चारजण.कोण कोण विलगीकरणात असणार ? आणि कसं ? यापैकी कोणीही दवाखान्यात अडमिट झालं नाही ? का म्हणून ! कारण नक्कीच आर्थिक असणार.


सरकारी रुग्णालयात बेड शिल्लक नसणार आणि खाजगी रुग्णालयाची फीस भरण्यासाठी पैशांची तरतूद नसणार,हा नुसता अंदाज नाही.पैश्यांचा दगड भिरकावला की मसणात सुद्धा रेमडेसिवीर मिळतं.तुटवडा वगैरे काही नाही.चढ्या भावाने काळ्याबाजारात विकण्यासाठी गायब आहेत रेमडेसिवीर.सरकारी यंत्रणेने खाजगीत विकलीत आणि खाजगीवाले साठेबाजी करताहेत.प्रकाश जाधव कडे जगणं विकत घ्यायला पुरेसे पैसे नसावेत बहुतेक.म्हणून त्याला रेमडेसिवीर मिळालं नाही वेळेला.अशा वेळी मालक,व्यवस्थापक,मित्र,नातेवाईक कोणीही कामाला येत नाही.


पत्रकाराची कमाई असून असून असते काय ? त्यात प्रकाश सोलापूरचा.म्हणजे गाव जिल्ह्याचं असलं तरी जवळपास ग्रामीणच.शिवाय आता गावागावात खंडो गिनती पत्रकार मिळतात.त्याचा फायदा मालकांच्या वतीने मॅनेजमेंटवाले घेतात.कॉस्ट कटिंग केलं म्हणून क्रेडिटसाठी,त्यांचीही मजबुरीच असते,पण मग मरण येतं प्रकाश सारख्यांचं.तो पिळवटलेलाच होता.वर्ष दीड वर्षांपासून करवादला असावा.पाखरासारखी अस्थिर नोकरी,माळढोकासारखं या बारडावरून त्या बरडावर.तेच दगड आणि तीच डबर माती.त्यात शोधून सापडून काय मिळणार.खुरडत खुरडत कुरतडायचं.आला दिवस पार झाला की सुस्कारा सोडायचा.


आजकाल आहे ना,संध्याकाळी ऑफिस सुटायचे वेळी सगळ्या पत्रकारांना धाक पडतो.एचआर मधून बोलावणं येण्याचा.प्रकाश त्याच समूहातील एक कळसूत्री बाहुला.आपल्याला खेळवलं नाचवलं जातंय ही खरी विमनस्कता.त्यात कोरोना निमित्त झालं.आपण वडिलांना वाचवू शकलो नाहीत.आई आणि भावाला वाचवू शकत नाहीत.बिरबलाच्या गोष्टीतील माकडीण निदान पिलाला पायाखाली घेऊन का होईना जीव वाचवू शकली होती,आपणाला तेही शक्य नाही.यातून आलेले टोकाचे नैराश्य.मग हाताची नस कापून घेणं.अर्थात हे असं पराभूत होऊन स्वतःला संपवणं समर्थनीय नाहीच.वृद्ध आई आणि लहान भावाने आता कोणाकडे पाहायचं.आधाराने जबाबदारीने वागायला पाहिजे.


प्रकाश जाधवला श्रद्धांजली अर्पण करायलाच हवी,परंतु काळ वेळ प्रसंग परिस्थिती काहीही असो,आत्महत्या हा पर्याय नसतो,त्यातून समस्या सुटण्या ऐवजी वाढतात.लढण्याची तयारी पाहिजेच.शेवटपर्यंत.लक्षात ठेवा एक चेंडू आपलाही असतो.तो टिपायला जगले पाहिजे.मॅच संपण्याआधी मैदान सोडणे,याला रडीचा डाव म्हणतात.


-रवींद्र तहकिक

7888030472


Post a Comment

0 Comments