सोलापूर - गृह विलगीकरणात असलेल्या सोलापूरमधील प्रकाश जाधव (वय 35) या तरुण पत्रकारानं हाताची नस कापून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नैराश्यातून त्यानं हे पाऊल उचललं असावं, असा अंदाज आहे.
हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. प्रकाश हा सोलापूर शहरातील सुशीलनगरमध्ये राहत होता. पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने सकाळ, सोलापूर तरुण भारत आणि सुराज्य दैनिकात काम केले होते. सध्या तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी वडील करोनाचे बळी ठरले. पोलीस असलेला भाऊ करोना पॉझिटिव्ह आला. आई करोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रकाशने अनेक फेऱ्या मारल्या. मात्र, हे इंजेक्शन त्याला मिळाले नव्हते.
प्रकाश सध्या होम क्वारंटाइन होता. क्वारंटाइन असताना घरीच त्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
संगमेश्वर महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात तो प्रथम आलेला होता. शहरातील अनेक वृत्तपत्रांत पत्रकार म्हणून त्याने काम केले होते.
0 टिप्पण्या