तर मी स्वतःच माझ्या भाषिक मुजोरीचा निषेध करीन...मग तर झालं !



मला पत्रकारितेतल्या जेष्ठ-कनिष्ठ कोणीही,किंवा पत्रकारितेत नसलेल्या सुद्धा जेष्ठ-कनिष्ठ कोणीही हे जाणीवपूर्वक आणि तर्कशुद्धपणे लक्षात आणून द्यावे की माझी पत्रकारीय भाषा आणि भूमिका  तत्वभ्रष्ट,शीलभ्रष्ट,स्खलनशील किंवा पतित आहे.माझी भाषा तथाकथित संस्कारी निकषात (हे सोयीचे निकष कोणी ठरवले हे आधी सांगा)बसत नसेल.ग्रामीण किंवा ग्राम्य असेल.अडाणी (अडाणचोट नाही) वळणाची असेल.पण आहे मराठीच ना.तुम्ही प्रमाण भाषा वापरता,मी लोकभाषा वापरतो.सत्याची वास्तवता भाषेच्या स्तरावरून ठरते काय ? समाजातली चातुर्वर्ण्य व्यवस्था आपण आता मानत नाही (हे हि किती भोंगळ वाक्य आहे नाही ) मग भाषिक चातुर्वर्ण्य आणि स्पृश्यास्पृश्यता का बरे बाळगतो आहोत.तथाकथित शुद्ध प्रमाण आणि शुचिर्भूत भाषेत एखादा कोणी असत्य सांगत असेल.सत्य दडपून ठेवत असेल तर अशा चंदनी बचनागापेक्षा आमचा बाभळीचा उंबरा बरा नव्हे काय ? जो निदान घरात येणारं किडा-किरडू रोखेल.सत्य कटू असते,म्हणून त्याची घुटी शर्करावगुंठितच द्यायला हवी असा काही नियम कायदा आहे का पत्रकारितेत ? असेल तर तो कोणी बनवला ?

 मला सांगा तुम्ही संत तुकारामांना प्रबोधनकार मानता की नाही ? त्यांची भाषा वाचा जरा.मी टीका नाही करत आहे. तुकारामांच्या भाषेत कितीदा श्लील अश्लीलतेची मर्यादा ओलांडलेली आहे याची किती उद्धरणे देऊ ? त्याला तुम्ही सात्विक संताप म्हणता आणि माझ्या भाषेला मुजोरी ? तुम्ही म्हणाल कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची तट्टाणी.कुठे तुकारामांच्या पंगतीला जाऊन बसायला लागला.असे म्हणणे किती सोपे आहे नाही का ? कारण मग मी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या बदल्यात तुमचे उत्तरदायित्वाच संपते.मंबाजी आणि रामेश्वर भट्टानी यापेक्षा वेगळे काय केले होते.तुझ्या लिखाणातले तत्वज्ञान आमच्या तर्कबुद्धीच्या पलीकडचे आहे,साद्यंत युगाशी अप्रस्तुत आणि विसंगत (हे त्यांनीच ठरवले ) आहे,म्हणून ते विसर्जित करीत आहोत.ही तुझ्या विचारांची जलपरीक्षा समज असा तो खासा न्याय होता.(पण सत्य बुडवले तरी तरून वर आलेच ) तसाच न्याय मला लावला जाणार असेल आणि माझे लिखाण असंस्कृत अर्थात असंवैधानिक ठरवले जाणार असेल,त्यावर भाषिक मुजोरी असा शिक्का मारला जाणार असेल तर असो बापडा मी भाषिक मुजोर.पण मग प्रबोधनकार ठाकरेंना तुम्ही काय म्हणणार ? महात्मा ज्योतिबा फुलेंना काय म्हणणार ? आचार्य अत्र्यांना,नीलकंठ खाडिलकरांना काय म्हणणार ? त्यांचे त्या काळातील लेख-अग्रलेख जरा काढून बघा.त्यातली भाषा बघा.(तुमच्या नाकातले फक्त केस नाही मिशाही जळतील ) ते असो,टिळक-सावरकर-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एखाद्या प्रश्नावर विषयावर पोटतिडिकीने लिहीत तेव्हा त्यांची भाषा कशी असे.ज्वल जहाल सडेतोड,तिखट नाही काय ? आणि बाळासाहेब ठाकरेंची ठाकरी भाषा ? त्याबाबतीत काय म्हणाल तुम्ही ?

विषय विस्तारास्तव उदाहरणे देत नाही,पण प्रबोधनकारांनी देव,देवळे,पोथ्या,पुराणे,धार्मिक कर्मकांडातील थोतांडे,अंधश्रद्धा आणि पुरोहितांच्या लुटीच्या कारस्थानावर ज्या भाषेत लिहिले आहे ते वाचा एकदा.त्यांच्या वणव्यापुढे माझी भाषा तुम्हाला शेकोटी वाटेल.आचार्य अत्र्यांनी नेहरू-मोरारजी,इतकेच काय यशवंतराव चव्हाणांबद्दलही काय काय लिहलंय.जरा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातले मराठा चे अग्रलेख आणि मथळे वाचा .त्यांच्या घोड्या पुढे आमची धाव म्हणजे शिंगराचीच ठरेल.बाळासाहेब तर बाळासाहेब होते,आणि खाडिलकर ते खाडिलकर.पुन्हा तेच.तुमचे पालुपद तुम्ही सोडणार नाहीत.स्वतःला त्यांच्या पंगतीला नेऊन बसवतो का ? तू कुठे..ते कुठे ! अरे बाबांनो वाघ सुद्धा कधीकाळी लहान असतो ना ! की एकदम वाघ होतो.डरकाळी फोडायला शिकण्याआधी गुरगुर करून घसा साफ करायला लागतो की नाही.नाही म्हणजे कदाचित माझी उडी चुकली असेल,नाही असे नाही.मागे एकदा मास्तरांच्या अनुषंगानेही याच प्रकारे मूळ मुद्दा हेतू उद्देश बाजूला सारून (किंबहुना दडवण्यासाठी) भाषिक मुजोरीची चर्चा झाली.तुकारामांच्या वैकुंठ गमन लेखाबाबतही तेच.सत्य बाजूला आणि भाषिक मुजोरीची चर्चा.खरे लिहिले पण भाषा जरा संयत हवी होती.खरे आहे,नाही माझी भाषा शुद्ध तुपातली .त्यात करडईच्या तेलाचा ठसका आहे.काय होतं सांगतो.एकदा का संबळ वाजला की होणाऱ्या गोंधळात पेटलेला पोत कसा फिरेल काही सांगता येत नाही.पण राजेहो तुम्ही अधिक काय ते बघाना .उणे काय शोधताय.

प्रास्ताविक लांबलं.पण विषय कळला ना.गेल्या आठवड्यात नारायण राणेंच्या स्वाभिमानी संघटनेच्या औरंगाबाद मधल्या चार पाच कार्यकर्त्यांनी माझ्यावर (रवींद्र तहकिक,कार्यकारी संपादक. दैनिक लोकपत्र) कार्यालयात येऊन हल्ला केला.धक्काबुक्की केली.काळे फासण्याचा प्रयत्न केला वगैरे.त्याबद्दल संबंधित कार्यकर्त्यावर पोलीस केस झाली.एफआयआर मध्ये अन्य पाच सहा कलामांसोबत पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम आहे.खटला प्रकर्षाने लढण्याचे ठरवल्यामुळे संबंधितांना शिक्षा होणार,धडा मिळणार यात शंका नाही.खास बात म्हणजे ज्या नारायण राणेंच्या साठी संबंधित तरुणांनी हे कृत्य केले त्या राणेंनी एका शब्दानेही त्या टोळक्याचे समर्थन केले नाही.पोलीस चौकशीत राणेंनी सरळ सरळ सांगितले की या घटनेशी आणि त्या पोरांशी माझा काही संबंध नाही.म्हणजे ते टोळके ना भाडोत्री होते.ते ना राणेंचे निष्ठावंत कार्यकर्ते होते,ना भाषासुधारक.त्यांना इव्हेन्ट करायचा होता.जमल्यास राणेंची शाबासकी किंवा बक्षिसी.पण यापैकी काहीही झाले नाही.आता या टोळक्याच्या मागे खटला,वकिलांची फी आणि कोर्टाच्या तारखांचा ससेमिरा लागेल.

असो विषय तो नाही.पण या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रातले आणखी एक दळभद्री सत्य समोर आले.पत्रकारितेतही चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे.मोठे पेपर ,मध्यम पेपर,सामान्य पेपर आणि गरीब पेपर.आत मध्ये काम करणारे आम्ही पत्रकार आज इथे तर उद्या कुठेही असू शकतो.( मी सोडून.कारण मी एकतर लोकपत्र मध्ये असेल किंवा मग पत्रकारितेत नसेल)एक सत्य आणखी ऐका,वर्तमानपत्रांचे मालक नाही पण तिथे काम करणारे आतले पत्रकारच एकमेकांची अस्पृश्यता पाळतात,याचा अत्यंत दुःखदायक अनुभव या निमित्ताने आला.आमचा पेपर मध्यम.मग आमच्यावर किंवा माझ्यावर हल्ला झाला त्याचा निषेध सर्व मध्यम आणि सामान्य तसेच गरीब वर्तमानपत्रांच्या पत्रकार तसेच मालकांनीही केला,त्यांच्या बातम्या छापून आल्या.त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.परंतु काही बडी वर्तमानपत्रे तटस्थ राहिली,ना बातम्या ना निषेध ना पाठिंबा ना साधी विचारपूस.आम्हाला सहानुभूती किंवा मदत नाही तर सगळ्यांची सोबत हवी होती.पण ती देण्याचे औदार्य कोत्या कद्रू मनोवृत्तीच्या तथाकथित जेष्ठ आणि बड्या पत्रकारिता वर्तुळातील स्वयंघोषित पत्रमहर्षीना दाखवता आलं नाही.

त्यांना माहीतच नाही की ते आज ज्या हस्तिदंती मनोऱ्यात वारा खात आहेत तिथे बाजूला दुर्लक्षाची काळकोठडी सुद्धा आहे.आज तुम्ही वाघ्या असाल तर उद्या तुमचा पाग्या सुद्धा होऊ शकतो.मिजास आहे कसली.आहो अखेर एक रुपयावर काम करण्याची तयारी दाखवूनही बाहेरची वाट दाखवली जाते ना.तेव्हा काय उरतं ? मला कोणा एका बद्दल बोलायचं नाही,परंतु घटनेचा निषेध करणं टाळण्यासाठी अनेकांनी माझ्या भाषिक मुजोरीचा आधार घेतला . काय करणार त्या पोरांचे चुकले पण सरांची भाषाही बरोबर नव्हती.वा रे वा,भाषिक शिरजोर.सरळ बोला ना संत तुकाराम,महात्मा फुले,टिळक,सावरकर,डॉ.आंबेडकर,प्रबोधनकार,आचार्य अत्रे,निळकंठ खाडिलकर,बाळासाहेब ठाकरे लिहीत होते खरे पण भाषिक मुजोर होते.म्हणा.मग मी स्वतःच माझ्या भाषिक मुजोरीचा निषेध करीन.मग तर झालं !

-रवींद्र तहकिक 

7888030472

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या