'भाऊ'च गर्दीत हरवला तर सैन्याचे पानिपत व्हायचे राहील काय ?आपल्या मराठी प्रिंट आणि इलेट्रॉनिक मीडियात अदलाबदली,अल्टीपल्टी,बदल,खांदेपालट,उंचउड्या,लांबउड्या, फुटबॉल हा खेळ कायम चालूच असतो.त्यात अनेकांचे हितसंबंध,लागेबांधे असतात.कुरघोडी आणि मतलबाचे राजकारण असते.दिले-घेतलेले धडे असतात.एकमेकांचे काढलेले जुने पुराणे उट्टे आणि रट्टे-घट्टे असतात.पुरानी दुश्मनी,नवी-जुनी दुखणी, सूड-बदले,किंमत मोजणे असं बरच काही असतं.


कोरोनाच्या पडझडीत तर अनेकांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांनी डोक्यावरची लेकरं देखील पायाखाली घेतली.हे असो.म्हणजे कोरोना काळात अक्षरशः निखाऱ्यावर पावली खेळलेल्या तुम्हा आम्हा सर्वानाच याची पूर्णतः जाणीव आहे.कदाचित आता वातावरण निवळत आहे.पण त्यासोबत ढवळतही आहे.वृत्तपत्र आणि चॅनल मालक किंवा व्यवस्थापनांनी पुन्हा पत्ते पिसायला घेतलेत.त्यांच्या साठी फक्त आणि फक्त व्यावसायिक लाभ महत्वाचे असतात.बाकी काहीही नाही.म्हणजे तुमची गुणवत्ता,अनुभव,योगदान इत्यादी वगैरे.याचा काय एकाने अनुभव घेतलाय म्हणून त्याचे नाव सांगावे.अनेक आहेत.ज्यांना युज अँड थ्रू पद्धतीने वापरले आणि फेकले.


अनेकजण अद्याप घाण्याच्या बैलागत निमूट गुमान तोंडाला मुंगसे बांधून पराण्या देताहेत.जात्यातले आणि सुपातले एवढाच हा फरक आहे.एवढं जरी कळलं ना तर इथे कोणीही कोणत्याही पदावर असला तरी मागच्या-पुढच्याला किंवा आजुबाजुच्याला संपवणार नाही.पण अनेकांचा कैफ आदळल्या शिवाय उतरत नाही.उतरतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते.महाराष्ट्रातील एका बड्या वर्तमानपत्राने नुकतेच त्यांच्या संपादकीय विभागात काही महत्वाचे बदल केले.हे अर्थात अपरिहार्यही असते.नव्यांना संधी मिळायला हवी या साठी जेष्ठांनी जागा रिकामी करून बाजूला व्हायचं असतं.ती योग्य वेळ सन्मानपूर्वक साधता आली पाहिजे.तुम्हाला हटवण्याची वेळ व्यवस्थापनावर येऊ नये हे तर पाहायलाच हवं.त्यात स्वतःचा आणि पदाचाही मान आहे.'मी पुन्हा येईन', 'मीच पुन्हा राहीन' चा कशासाठी हा हट्ट आणि दुराग्रह.काय त्यात हशील.असं कोणतं खेटर अडलेलं की नाममात्र म्हणजे अगदी एक रुपया महिना पगारावर काम करण्याची काकुळती करावी लागते.ती ही निवृत्तीचे वय उलटून गेल्यावर.काय करायचे,काय मिळवायचे बाकी राहिले आहे.


कशात मन अडकले आहे.पाय का निघत नाही.हे असले वर्तन इतरांचे मनोबल खचवणारे नाही का ? अशा कथा ऐकल्या तर कशाला नव्या पिढीतले तरुण करिअर करायला इकडे येतील.आहेत ते कशाला इकडे आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालवतील.अख्खे आयुष्य पत्रकारितेत घालवलेल्या व्यक्तीने कीर्तनाचे निरूपण करताना आनंद वारी करायला हवी.अन्यांना उत्साहित प्रोत्साहित आणि प्रेरित करायला हवे.करण्यासारखे खूप काही असते.पत्रकारितेच्या अनुभवावर पुस्तके लिहा,व्याखाने द्या.अनेक विषय आहेत त्यावर लेखन करा.मुक्त पत्रकारिता करा.ब्लॉग लिहा.हे सगळं करा ना.त्यातून चांगले पैसेही मिळतील.


कोणापुढे एक रुपयात काम करतो म्हणण्याची वेळ कशाला यायला हवी.'हाथी मरा तो सवा लाख का' अशी धमक पाहिजे.किमान जेष्ठांनी तरी .म्हणजे मागचे निर्भय होतील.सरावलेल्या वाटेवर अंधारातही न चाचपडता चालता आलं.मागुत्यांना वाट दाखवता आली तर तुमच्या अनुभवाचे चीज.पण तुम्हीच अंधार पाहून भेदरून पांढरे फटक पडलात.लटपटायला लागलात,तुमचीच बोबडी वळली.आणि तुम्हीच हातपाय गाळून गयावया करत मटकन गुडघे टेकले तर कसे व्हायचे.विश्वास उडाला आणि 'भाऊ'च गर्दीत हरवला तर सैन्याचे पानिपत व्हायचे राहील काय ? नाही म्हणजे यात काही झाकली मूठ नाहीये ना ? आपणच आपले मूल्य कमी करण्याची ही अधीरता किंवा पराभूत पराधिनता कशासाठी?   


-रवींद्र तहकिक

7888030472


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या