अनिल थत्तेंचा गौप्यस्फोट ...

विद्याधर गोखलेंवर एका बॅनर न्यूजच्या बदल्यात १२ कोटींचा 'लोकसट्टा' लावल्याचा आरोप  अनिल थत्ते नावाचे रंगी बेरंगी (छंदी,फंदी,विविध ढंगी) पत्रकार (?) आपणाला माहिती आहेत.ते स्वतःला कलंदर वगैरे म्हणवतात.महेश मांजरेकरांनी या पात्राला (मित्र म्हणून) स्वतः अँकर असलेल्या मराठी बिग बॉस मध्येही घुसवले होते.तिथे त्याच्या किस्से कहाण्या फारश्या रंगल्या नाहीत.पण सध्या हा रंगीला रतन युट्युबवर भलताच रंग उधळतोय.कधीकाळी हे महाशय पत्रकार होते म्हणे.म्हणजे त्याच्या मते ते अजूनही पत्रकार आहेत.आणि मरेपर्यंत पत्रकारच राहणार आहेत.ज्योतिष्य शास्रावरही त्यांचा मोठा व्यासंग असल्याचे तेच सांगतात.त्यांनी एकदा त्याच्या मृत्यूची तारीखही डिक्लीयर केली होती.१७ जानेवारी २०२१.ही तारीख आता उलटून गेलीय.पण थत्ते अजून दस्तुरखुद्द याची देही याची डोळा सदेह जिवंत आहेत.ते आणखी जगावेत (आणि इथले सगळे कर्म धर्म संयोग) त्यांनी इथेच फेडून जावेत अशा आमच्या आमच्या त्यांना सदिच्छा.तर अनिल थत्ते हे ध्यान म्हणजे अफलातूनच आहे.म्हणजे त्यांचे कपडे,त्याचे भडक रंग,काकाकुव्या सारखे रंगी बेरंगी केस.कपाळावरचे नटवे गंध.हे सगळं गंमतीदारच आहे.कधीकाळी त्यांनी स्वतःचे 'गगनभेदी' नावाचे पाक्षिक,मासिक,दैनिक,साप्ताहिक की नियतकालिक-अनियत्कालिक असे काहीतरी काढले होते म्हणे.म्हणजे हा इतिहासही तेच सांगतात.बाकी पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द किती इनोदी राहिली असेल ते त्याच्या एकंदर ध्यान आणि धारणेवरून दिसतेच.त्यांनी म्हणे एक पुस्तकही लिहिले आहे.मराठी माणसांना नीट शिव्या देता येत नाहीत म्हणून त्यांनी ' झणझणीत मराठी शिव्यांचे अस्सल नमुने' असे एक पुस्तकच संपादित केले आहे.लवकरच ते सत्तरीत पोहचत आहेत.या निमित्ताने त्यांच्याच लेखन कामाठीचे जाहीर वाचन त्याच्या साक्षात का करू नये ? अशी एक कल्पना बऱ्याच दिवसापासून आमच्या मनाला वारंवार चाटून जाते आहे.असो तर अनिल थत्तेंच्या वागण्या बोलण्यातील विदुषकीपणाचे अनेक किस्से आहेत.पण त्याच्या गप्पा हा वेगळाच लफडा आहे.म्हणजे त्यातलं खरं काय खोटं काय माहित नाही.पण गेल्या पन्नास वर्षातले महाराष्ट्रातले (आणि देशपातळीवरचेही) अनेक नेते त्यांचे रोजच्या बैठकीतले यार दोस्त असल्याप्रमाणे ते त्यांच्याशी जवळीक असल्याचे बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे ठोकून देतात.त्यांचे किस्सेही अफलातून असतात.कपाळावरच्या गंधाप्रमाणेच ते हे किस्से उगाळून सांगत असतात.म्हणजे पूर्वीच्या काळी यात्रेत बायोस्कोप दाखवणारा असायचा ना.मुंबईची रंडी बघा..भारी मज्जा बघा' असं गाणं म्हणत,बायोस्कोप मधली मधुबाला,ताज महाल,इंडिया गेट,म्हातारीचा बूट,अशी चित्र दाखवणारा.तसलाच हा प्रकार आहे.हे कमी म्हणून की काय या थत्ते बाबाने परवा त्याच्या युट्युब चॅनलवर गौप्यस्फोट या नावाखाली लोकसत्तेचे दिवंगत पत्रकार विद्याधर गोखलेंचा एक गौप्यस्फोट वजा किस्सा सांगितला.


असा तसा नाही डंके की चोटपर ठासून सांगितला.काय तर म्हणे विद्याधर गोखलेंनी १९८२ साली तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्याकडून लोकसत्ताच्या एका दिवसाच्या बॅनर न्यूज साठी तब्बल १२ कोटींचा प्लॉट लाच म्हणून घेतला होता.बाबासाहेब भोसले यांच्यावर त्याच्या सुनेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.त्याच्या बातम्या त्यावेळी प्रसार माध्यमात छापून आल्या होत्या.त्यावरून त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले होते.मग त्यांनी अनिल थत्तेना बोलावून घेतले,आणि थत्ते त्यांचे संकटमोचक झाले.थत्तेंनी बाबासाहेब भोसलेंच्या सुनेची  समजूत काढली.त्यातून तिचे लग्न आधीचे प्रेम प्रकरण असल्याचे,व ती प्रियकराबरोबर पळून गेल्याचे पुढे आले.पण या प्रकरणात बाबासाहेब भोसलेंच्या मुलाने ताठर भूमिका घेतल्याने सुनेने सासऱ्यावर खोटे आरोप केले.हे थत्तेंनी सिद्ध केले.आता या खुलाशाची बातमी लोकसत्तेत पहिल्या पानावर छापून आली पाहिजे असे मुख्यमंत्री भोसले म्हणाले.हेही काम या थत्ते नावाच्या पठ्ठ्यानेच फत्ते केले म्हणे.


थत्तेंनी लोकसत्ताचे तत्कालीन संपादक विद्याधर गोखलेंशी बोलणी केली.पण गोखलेंनी त्यासाठी बिदागी मागितली.ती मांडवलीही आपणच केली असे थत्ते म्हणतात. मुंबईतील बांद्रा वेस्टला लीलावती रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या रंग शारदाच्या प्लॉटची लाच त्यावेळी दिली गेली, त्या बदल्यात दुसऱ्या दिवशीच्या लोकसत्तात पहिल्या पानावर बाबासाहेब भोसलेंच्या सुनेच्या खुलाशाची बातमी छापून आली.बाबासाहेब भोसलेंचे मुख्यमंत्री वाचले.पुढे तो कलावंत,साहित्यिक,पत्रकारांच्या कोट्यातील प्लॉट विद्याधर गोखलेंनी खाजगी व्यक्तीला १२ कोटींना विकला.


या व्यवहाराची नोंद मुंबईचे तत्कालीन मनपा आयुक्त उत्तम खोब्रागडेंच्या आत्मचरित्रातही असल्याचे थत्ते सांगतात.आता अडचण अशी आहे की थत्तेंनी केलेल्या गौप्यस्फोटाचा खुलासा करायला विद्याधर गोखले हयात नाहीत.त्यांना आपल्या पत्रकारितेचे द्रोणाचार्य मानणारे काही अर्जुन,कर्ण,एकलव्य,दुर्योधन,अश्वत्थामा आहेत.पण ते यावर काही पितळ उघडे करतील असे वाटत नाही.त्यामुळे हा थत्ते हौद असाच धो धो वाहत राहणार.आपण त्याला फारसे गांभीर्याने घ्यायचे नाही.संसदेत विरंगुळ्यासाठी रामदास आठवले लागतात ना.पत्रकारितेत ती उणीव थत्ते भरून काढीत आहेत.लगे रहो...


-रवींद्र तहकिक

7888030472


Post a Comment

0 Comments