असून अडचण,नसून खोळंबा ...


 भाग-४ 


प्रिंट मीडियाला मुळातच इलेट्रॉनिक आणि इंटरनेट किंवा सोशल मीडियाची अलर्जी म्हणा किंवा तिटकारा म्हणा.आहे.आम्हाला इतिहास आणि भूगोल आहे.परंपरा आहे.इथिक्स म्हणजे भूमिका आहे.आमचे म्हणून काही एक धोरण असते.आम्ही पडताळणी केल्या शिवाय,आणि बातमी खरी असल्याची खात्री पटल्याशिवाय तिला हात लावत नाही.चौथ्या स्तंभाची जी काही प्रतिष्ठा,विश्वासार्हता आहे ती केवळ आमच्यामुळेच टिकून आहे.आमच्या बातमीला घटनात्मक आधार आणि मूल्य असते.वगैरे वगैरे.आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा या क्षेत्रात नव्हतो तेव्हा मला हे सगळे म्हणणे तंतोतंत खरे वाटायचे.म्हणजे वर्तमानपत्र,त्यातील बातम्या,लेख,मुलाखती, त्यात काम करणारे पत्रकार,खास करून संपादक.म्हणजे मला खरेच टिळक,आगरकर,अत्रे,खाडिलकर वगैरेंचे अवतार वाटायचे.म्हणजे माझी या बाबतची मते बरीच आदर्शवादी होती.पण ती सारी भाबडी होती हे या आठवर्षात कळलं.


खरं सांगू काय,मी मुळात या क्षेत्रातला नाही.मी आहे मास्तर.मराठीतून एम ए आणि नंतर बीएड केलेला एक मास्तर.२० वर्षे मास्तरकीच केली.मी काही पत्रकारितेचे अधिकृत शिक्षण घेतलेले नाही.पण वाचता यायला लागल्यापासून पेपर वाचण्याची प्रचंड आवड होती.वाटायचं की आपण संपादक वगैरे व्हावं.सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक.शैक्षणिक,कृषी,सहकार,उद्योग,व्यापार,आर्थिक,क्रीडा,कला,तसेच प्रशाकीय,आंतरराष्ट्रीय विषयावर लेख अग्रलेख बातम्या कराव्यात.शोध पत्रकारिता करावी.जनसंवाद आणि जनप्रबोधन करावे.पण नाही जमले.वयाच्या उमेदीची वीस बावीस वर्षे मास्तरकीत घालवली आणि जवळपास निवृत्तीच्या वयात पत्रकारितेत आलो,आणि पहिल्याच दिवशी कार्यकारी संपादक झालो.पेपर छोटा पण पद मोठे .पुन्हा एकचालानुवर्ती.म्हणजे उगाच लपवायचं कशाला.आमचा खेळ दादा कोंडके सारखा आहे.कथा,पटककथा,संवाद,गाणी,संगीत,प्रमुख भूमिका,एडिटिंग,वितरण सगळं आम्हीच.पुन्हा तुमचे ते पत्रकारीय भाषेचे,किंवा अन्य जे काही यम नियम शिष्टाचार आहेत,ते मी पाळत नाही.मुळात सगळे माहीतच नाहीत मला.मी काही पत्रकारितेचे अधिकृत शिक्षण घेतलेले नाही.अनुभवही नाही.कोणी गुरुही नाही.अगदी एकलव्यासारखाही नाही.सगळं मोघम चाललंय.तुम्हाला सांगतो.दादा कोंडके हिंदी जाऊच द्या मराठी नायकाच्या होईना कुठे चौकटीत बसत होते.त्यांच्या सिनेमाच्या विषयांना,भाषेला,(अति)प्रसंगांना कुठे प्रतिष्ठा किंवा समाजमान्यता होती.पण चालले ना.लोकांनी त्यांना पाहिलं.समीक्षक काहीही म्हणोत.सिनेमा हे माध्यम लोकांचं आहे.लोकांनी स्वीकारलं म्हणजे झालं.तसंच माझं झालं.म्हणजे एकदम डोहात पडलो आणि हातपाय मारत तरंगायला शिकलो.त्यात पोहण्यातली शिस्तबद्धता नसेल पण पोहतायेण्याचा मूळ निकष काय ? माणूस पाण्यावर तरंगला पाहिजे.मी तरंगलो.बात खतम.


तुम्हाला सांगतो कोरोना काळात अनेक वर्तमानपत्रांनी कॉस्ट कटिंग केली.म्हणजे लोक कमी केले.पाने कमी केली.आवृत्या बंद केल्या.लोकांचे कामाचे तास आणि वेतन कपात केली.मी या पैकी काहीही केलं नाही.जेवढ्या आवृत्या कोरोनाच्या आधी होत्या तेवढ्याच आजही कोरोनाच्या दोन वर्षानंतर आहेत.जेवढे लोक आधी होते तेवढेच आजही आहेत.एकालाही कामावरून कमी केले नाही.कोणाचे कामाचे तास कमी केले नाहीत.कोणाचे पगार टक्केवारीत कापले नाहीत.पेपरची पाने किंवा छपाई कमी केली नाही.आता एखादा खवट शेंगदाणा म्हणेल ठीक आहे,पण याची आकडेवारी सांगा.पहा पहा आमचं वाकून पहा.तुमचं झाकून ठेवा.सांगू शकतो आकडेवारीही सांगू शकतो.त्याचे कारणही सांगतो.किती छापतो या पेक्षा काय छापतो याला मी स्वतः आणि माझे व्यवस्थापन सुद्धा महत्व देते.आणि वृत्तपत्र व्यवसाय तोट्यात चालतो आतबट्याचा आहे म्हणतात ना.मला ते मान्य नाही.पेपर छोटा आहे.कमी छापतो.माणसे कमी आहेत.पण पेपर तोट्यात नाही.खूप फायदा नाही.पण तोटा नाही.अजिबात नाही.काय आहे मी स्वतः दिवसाचे दहा बारा तास,आठवड्याची सुटी न घेता,रजा न घेता,गेली आठवर्षे काम करतो.नुसते अग्रलेख वर्षाचे ३०९ पकडा.आठ वर्षाचे २,४७२ झाले.हे रेकॉर्ड आहे का ? मला माहित नाही.अजून संधी आहे.नसेल तर होईल.असो.


तुम्ही म्हणाल हे इतकं पर्सनल कशाला सांगताय ? सांगायला हवं.कारण मला खूप लिहायचंय.या क्षेत्राबद्दल .या क्षेत्रातल्या माणसांबद्दल.मनोवृत्ती आणि विकृती बद्दल.समस्या बद्दल,स्पर्धा आणि अंतर्गत राजकारण, हेवे-दावे,सूड-असूया-आसक्ती बद्दल,गटबाजी आणि कंपूबाजी बद्दल.स्वार्थ आणि निलाजरेपणा बद्दल,निगरगट्ट बनचुकेपणाबद्दल,व्यसनाधीनतेबद्दल,लोकधार्जिणेपणा बद्दल,लाचारी आणि धच्चोटपणा बद्दल,भोंगळ आत्मप्रतिष्ठेबद्दल,असुरक्षितता आणि अस्थिरते बद्दल,असं बरच काही.उदाहरणासह किंवा उदाहरणाशिवाय.लिहायचंय.कारण आपण आपल्या क्षेत्राला दर्पण म्हणतो.समाजाचा आरसा.तो दाखवतोही आपण.पण त्यात आपला चेहरा पाहत नाही.तो खरेच सभ्य,सुसंस्कृत,निष्कलंक,आश्वासक,विश्वासार्ह,तृप्त ,आनंदी.समाधानी आहे का ? कृतकृत्य जाऊद्या किमान ठीकठाक आहे का ? की विस्कटलेला,भांबावलेला,अस्वस्थ,भयांकित,भरकटलेला आहे.अपवाद सोडा.मी सार्वत्रिक बोलतोय.चांगली चांगली माणसे का घसरतात इथे.का होतात अपघात.आपलं नियंत्रण सुटतं की दुसरे अंगावर येतात.प्रसंग घटना व्यक्ती.त्यातून बचावणं हे कौशल्यही असतं आणि नशीब सुद्धा.पण कधी कधी भले भले कुशल दक्ष शिस्तबद्ध सुद्धा अपघातग्रस्त होतात.ना नशीब साथ देतं ना कौशल्य.असून अडचण नसून खोळंबा.खूप काही आहे हो सांगण्यासारखं.अजून कोणी धरला नव्हता आरसा.मी धरणार आहे.पहा आपापले चेहरे पहा.मीही माझा पाहणार आहे.तुमच्या सोबत... 

(क्रमशः )    

-रवींद्र तहकिक

7888030472


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या