युट्युब वरील खंडणीखोर,सुपारीबाज,ब्लॅक मेलर्स, याचक,भांड,भाट,पंडे, खुषमस्करे इत्यादी वगैरे...


( भाग २)

( भाग २)

खरे तर हा उत्तरार्ध नाहीच. उत्तरपूजा आहे.म्हणजे आपण इथे एकेकाचे शेंदूर खरवडून काढणार.आजकाल राजकारणात आणि सामाजिक संघटनाटनांत जसे विवीध सेल आणि जातीय गटांचे बेशरम फोफावले आहे ना तसाच प्रकार इंटरनेट माध्यमात सुरु आहे.फेसबुक पेज,वेब साईट, ब्लॉग आणि युट्युब ही या डेली सोप सलूनचे टुलकिट्स समजा.म्हणजे हजामतीची अवजारे.अर्थात हजामत म्हणजे खरडपट्टी वगैरे नाही बरं का.तर खुषामत.म्हणजे गिऱ्हाईक खुष होऊन वारंवार यायला पाहिजे या साठी केल्या जाणाऱ्या सर्व सेवा.पाहिजे तसा  लुक,मालीश,कानातला मळ, नाकातले   केस, काखा असं सगळं.काळ्याचा गोरा आणि बुढ्ढयाचा तरणाबांड करण्याचा धंदा. म्हणजे युट्युब चॅनल्स.मी अवमानना नाही करत. ही खरच वस्तुस्थिती आहे.


अगदी खेड्यापाड्यातल्या आणि तालुका किंवा जिल्हा पातळीवरील एकट्या दुकट्यांचे टपरी दुकानदारी युट्युब चॅनल्स सोडा.ते बिचारे बोलून चालून पोटभरू पोटार्थी असतात. म्हणजे तसे ते बोलून दाखवतात.उघड उघड.लपवाछपवी नाही.तुम्हाला आश्चर्य वाटेल.वाळू तस्करांचे आणि वाळू तस्करीवर (शोध?) पत्रकारिता करणाऱ्यांचे सुद्धा युट्युब चॅनल्स आहेत.हे गावठी चॅनल्सवाले गावातल्या सगळ्या हालचालीवर,बेकायदेशीर धंद्यावर,अनैतिक लफड्यावर बारीक नजर ठेवून असतात.कुठे काही खटकले समजले की ( ते खोटे अर्धवट का असेना) लगेच मोबाईलवरून शूटिंग एडिटिंग करून स्टोरी तयार.पुढचा टप्पा वसुलीचा.नाही जमली मांडवली तोडीपानी,सौदा फिस्कटला की न्यूज व्हायरल. माहिती अधिकारवाले जसे नव्ह्यान्नव टक्के खंडणीखोर आणि ब्लॅक मेलर्स आहेत ना,अगदी त्याच प्रमाणे युट्युब विश्वात देखील खंडणीखोर,सुपारीबाज,ब्लॅक मेलर्स,याचक,भांड,भाट,पंडे, खुषमस्करे इत्यादी वगैरेची अक्षरशः मांदियाळी माजलेली आहे. 


.मांदियाळी हा शब्द जरा सौम्य झाला.पांजरपोळ.होय पांजरपोळ माजलाय अक्षरशः.गावागावात अधिकृत वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल्सच्या पत्रकारांपेक्षा हे युट्युब चॅनल्सचे चालक मालक वाहक ग्राहक प्रेक्षक असे सगळे स्वतःच असणारे युट्युबधारीच अधिक झालेत.कुठल्याही पत्रकार परिषदेला हे सर्वात आधी आणि शेवटपर्यंत हजर.एकतर जेवूनच नाहीतर काहीतरी घेऊनच जाणार.शेण पोवटा घेऊनच उठते ना,तसला प्रकार.कशाचे वार्तांकन करावे याला धरबंध नाही.कोणाचे वाढदिवस.लग्नसमारंभ,अंत्यविधी,दहावे-तेरावेही यांना वर्ज्य नाहीत.बरे ते कोणी लोकप्रतिनिधी,किंवा सामाजिक,सांस्कृतिक अथवा अन्य कुठल्या क्षेत्रात योगदान असणारे किंवा सेलिब्रेटीच असायला पाहिजेत असे काही नाही.अगदी नगरसेवकाच्या निवडणुकीत चारवेळा तोंडघशी पडलेला.चार पक्ष फिरून अखेर आता अपक्ष असलेला.कोणत्याही निमित्ताने गल्लीच्या तोंडाला स्वतःचे पोस्टर लावून जागा अडवणारा.गणपती-नवरात्रात वर्गणीवर आणि एरवी खंडणीवर जगणारा.कोणत्याही पक्षाच्या सभा रॅल्याना गर्दी पुरवण्याचे किंवा मोर्चे आंदोलनाचे किरकोळ घाऊक ठेके घेणारा. 


प्रसंग परत्वे स्वतःच पाच दहा पोट्टे जमवून घोषणाबाजी करून वरकमाई करणारा असा.कोणीही असो.त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या रक्तदान शिबिराचा इत्यंभूत लाईव्ह वृत्तांत त्या बोकडाच्या बाईट सह प्रसारित करणारे युट्यूब्स आपल्याकडे आहेत.म्हणजे या युट्युब प्रकारचा ज्याने कोणी शोध लावला असेल ना त्याने जर आमच्याकडची ही युट्युब चॅनल्स पहिली तर तो जीव सोडून देईन पटकन.किंवा मेला असेल तर त्याला थडग्यात हुडहुडी भरेल.बरे यांची भाषा,त्यातल्या चुका या बाबत तर न बोललेलेच बरे.मी बोलतोय ते युट्युब चॅनल्सच्या नावाखाली भूरटेगिरी करणाऱ्या बाजारबुणग्यांच्या भाऊगर्दी बद्दल.पण विषय इथेच संपत नाही.किंबहुना खरा विषय येथून सुरु होतो.यातली काही बडी धेंडे आहेत.बडी म्हणजे स्वतःला बडी समजणारी किंवा ज्यांच्या युट्युबला बऱ्यापैकी सबस्क्राईब मिळते असे काही लफंगे,याचक,भांड,भाट,पंडे, खुषमस्करे इत्यादी वगैरे...


अगदी सुरुवातीला त्यांचे खरे चेहरे कळून आले नाहीत.पण आता हळू हळू कळताहेत.अरे हे तर भाटगिरी करताहेत.कोणातरी पक्षाची,एखाद्या व्यक्तीची.म्हणजे हे ऑलरेडी पेड आहेत.पेड म्हणजे मानधनी नव्हे मोबदली.म्हणजे पाळलेले.कोण आहेत असे विशिष्ट पक्ष किंवा व्यक्तीं कडून पोसले जाणारे पाळीव प्राणी ? सांगतो सांगतो.सांगणारच आहे.सांगावेच लागेल.सांगेनच.लवकरच.इथेच...इथेच ...इथेच ...इ थे च !

(क्रमशः)

-रवींद्र तहकिक

7888030472

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या