" ठोकशाही" न्यूज चॅनलची दुरावस्था ...


 "ठोकशाही" न्यूज चॅनलची पुरती दुरावस्था झाली आहे. कशाचा कशाला धरबंध नाही. कोणीही मार्गदर्शक नाही. त्यामुळे अजून निदान वर्षभर तरी चॅनल तग धरेल की नाही ?  अशी  शंका आहे. मॅनेजमेंटच्या मनमानी कारभारामुळे अनेकांचे रोजगार एका रात्रीत हिरावले गेले. आज कामाला येणाऱ्या माणसाला दुसऱ्या दिवसापासून बेदखल केलं जातं. ह्या धरसोड वृत्तीमुळे ठोकशाहीला कामासाठी नवी माणसं मिळणं अवघड झालं आहे. त्यातही ज्यांच्या हातात सत्तेची 'पाटीलकी' आहे, त्यांना त्यांची टीम सुद्धा इज्जत देताना दिसत नाहीए. 


भर ऑफिसमध्ये त्यांच्यावर डाफरलं जातं, त्यांच्यावर नको नको ते आरोप लावले जातात, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तरीही दुसऱ्या दिवशीपासून सगळं आलबेल होतं, असे खेळ सध्या "ठोकशाही"मध्ये सुरू झालेले आहेत. सत्तेची 'पाटीलकी' ज्यांच्या हातात आहे ते मॅनेजमेंटच्या हातातील कळसूत्री बाहुलं आहे हे " ठोकशाही" मधील प्रत्येकाच्या लक्षात आल्याने त्यांचं महत्व कमी झालेलं आहे. एच आर ची दादागिरी हा तर तिथल्या चहाच्या नाक्यांवरचा रोजचा चर्चेचा विषय आहे. त्याबद्दल परिसरातील कुठलाही चहावाला सांगू शकतो. 


"ठोकशाही" च्या वेब टीम इतकं वाईट दुसरं काहीही नाही. ज्यांना साधं मराठी धड बोलता येत नाही, उच्चार स्पष्ट नाही, बातमीचा गंध नाही अशांना फेसबुक लाईव्ह दिलं जातं, आणि प्रेक्षकांनी हे कमेंट्स मधून सांगून सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. असंच जर सुरू राहिलं तर "ठोकशाही"ला आणि विशेषतः वेबला प्रेक्षक पूर्ण नाकारेल. ह्यासगळ्यात तिथला एम्प्लॉयी सुखी असेल तर तीही गोष्ट नाही. मॅनेजमेंट अक्षरशः हडतुड करतं, मॅनेजमेंट ला काडीचीही किंमत नाही असंच दिसून येतं. इथे मिळणाऱ्या वागणुकीपेक्षा वेठबिगार कामगारांना बरी वागणूक मिळते असं मत काही " ठोकशाही" मधील काही एम्प्लॉयी म्हणतात.


 कोरोनाच्या काळात कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही.  कोरोना काळात ट्रेन बंद असताना सुद्धा पिकअप ड्रॉप न देता ट्रेननेच येण्यास भाग पाडलं जातं. आणि समजा एम्प्लॉयी ट्रेनने बेकायदेशीररित्या येत असताना कधी टीसीने पकडलं तर एचआर त्या एम्प्लॉयी चा साधा फोनही उचलत नाही. असे प्रकार वाढू लागल्यावर मॅनेजमेंटनेच रेल्वेप्रवास करण्यासाठी एम्प्लॉयीना खोटी ओळखपत्रे बनवून दिली. तिथे येणाऱ्या 'गेस्ट'ची सुद्धा चॅनलवर नाराजी असलेली दिसून येते. स्वतःला 'सिनिअर' समजणारी मंडळी चॅनल पोखरताना दिसतायत. ह्या सगळ्यावर मॅनेजमेंटला लवकर उपाय शोधता आला नाही, तर चॅनलला कुलूप लावावं लागेल, एवढं नक्की. 


जाता जाता : 

  1. " ठोकशाही" 'च्या तीन वृत्तनिवेदकांनी टाकला राजीनामा
  2. या महिन्यात एकूण 12 जणांपेक्षा जास्त लोकांनी टाकले राजीनामे.
  3. नवीन लोकांचा "ठोकशाही" जॉईन करण्यास नकार. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या