प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता पत्रकार बातम्या तयार करतात. माध्यम संस्थाही दुय्यम स्त्रोतांवर अधारलेल्या पत्रकारितेला प्राधान्य देत आहेत. अलिकडे पत्रकारितेतून जिवंत वार्तांकन गायब होऊन रेडिमेड प्रेस नोटला अच्छे दिन आले आहेत. ‘फिल्ड वर्क’ ला मूठमाती देऊन आपण ‘टेबल वर्क’ वर धन्यता मानत असल्याने ‘जर्नालिझम’ ची जागा ‘चर्नालिझम’ ने घेतली आहे.
नवनव्या साधनांची भर पडत असताना पत्रकारिता अधिकाधिक प्रगल्भ होणे अपेक्षित होते. पत्रकारितेत काम करताना अत्याधुनिक तंत्र आणि नवसाधनांचा उपयोग होत असला तरी त्यातून पत्रकारिता आळशी होते की काय, अशी भीती निर्माण होवू पाहत आहे. मोबाईलसारख्या संपर्क साधनाचा वापर करणार्या पत्रकारांचा प्रत्यक्ष लोकसंपर्कावरचा भर कमी होताना दिसत आहे. रेडिमेड माहितीवर अनेकांची भिस्त असून अलिकडे ही कमी कष्टातली पत्रकारिता चांगलीच स्थिरावली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन, वस्तुस्थिती समजून घेऊन ती जशीच्या तशी वाचक, श्रोते, दर्शक किंवा यूजर्सपर्यंत पोहोचविण्याचा काळ मागे पडताना जाणवत आहे. त्याऐवजी फोनाफोनी करून मिळणार्या जुजबी माहितीवर पत्रकारिता साजरी होत आहे.
पत्रकारांनी माहिती संकलित करण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जायला हवे, तरच जिवंत माहिती मिळू शकते. पण घटनास्थळी न जाता वेगवेगळ्या संपर्क माध्यमातून, ओळखीपाळखीतून, प्रेस नोटच्या अधारावर किंवा इंटरनेटसह अन्य माध्यमांच्या मदतीने पत्रकारिता करण्याकडे सर्वाधिक कल आहे. फिल्डवर न जाता अन्य स्त्रोतांतून माहिती मिळवून केल्या जाणार्या पत्रकारितेला ‘चर्नालिझम’ म्हटले जाते. बीबीसीचे पत्रकार वासिम झाकीर यांनी ही संकल्पना मांडली. चर्न या इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ घुसळणे असा होतो. मूळ माहितीत घुसळण करून वेगळी माहिती बाहेर काढणे, याला त्यांनी चर्नालिझम नाव दिले. दही घुसळून त्याचे लोणी तयार केले जाते, तसेच पत्रकारितेत प्रेस नोटमध्ये काहीसा बदल करून त्याची बातमी केली जाते. पत्रकार प्रत्यक्ष घटनास्थळावर न जाता विविध स्त्रोतांतून आलेल्या माहितीत किरकोळ बदल करून त्याची बातमी तयार करतात. यामध्ये ‘फिल्ड वर्क’ काहीच नसते, जो पत्रकारितेचा गाभा आहे. प्रेसनोटवरून बातमी तयार करण्यात केवळ शब्दचालाखी आहे. अशा प्रकारे शब्दच्छल करून बातम्या तयार होणे पत्रकारितेसाठी धोकादायक आहे.
बातम्यांसाठी पत्रकारांनी घटनेच्या उगमापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माध्यम संस्थांना अशा बातम्या हव्या असतात, पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने आणि खर्चाची तयारी मात्र नसते. शोध पत्रकारिता, सखोल पत्रकारिता, विश्लेषणात्मक पत्रकारिता असे काही शब्द ऐकायला बरे वाटतात परंतु प्रत्यक्षात तसे रिपोर्टिंग करण्यासाठी संबंधित माध्यमे आणि पत्रकारांचीही तयारी लागते. रिस्क घेण्याची तयारी अलिकडे कमी होताना दिसत आहे. यातून प्रेस नोट जर्नालिझमने जोर धरला आहे.
पत्रकारितेतून ‘ग्राऊंड रिपोर्ट’ गायब होण्यासाठी हे चर्नालिझम कारणीभूत आहे. माध्यम संस्था आणि पत्रकार या दोघांचाही त्यासाठी आग्रह असत नाही. पत्रकार परिषदेतसुद्धा समोरच्या व्यक्तीचे ऐकूण घेण्याइतपत पत्रकारांना वेळ असत नाही. प्रेस नोट द्या, असा त्यांचा आग्रह असतो. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी बोलून जमा केलेली माहिती निश्चितपणे पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यास मदत करते. मात्र दुय्यम स्वरूपाची माहिती, वायर सर्व्हिसकडून आलेले इनपूट, अन्य स्त्रोतांतून गोळा केलेला मजकूर मोठ्या प्रमाणात बातमीच्या रूपात सादर होत असल्याने पत्रकारितेचा बाजच बदलून गेला आहे. अशा दुय्यम स्त्रोतांवर विसंबलेली पत्रकारिता करणार्या पत्रकारांना ‘चर्नालिस्ट’ संबोधले जात आहे. अशा पत्रकारितेवर जगभरातील अनेक माध्यम अभ्यासकांनी संशोधन केले आहे. सध्याच्या पत्रकारितेत जर्नालिझमपेक्षा चर्नालिझमची चलती आहे, असेच बहुतेक संशोधकांचे निष्कर्ष आहेत. आपल्या आजूबाजूची पत्रकारिता नीट अभ्यासली तर भारतातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. उलट आपण भारतीय पत्रकारिता लोण्यासारखी गुळगुळीत करण्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.
- शिवाजी जाधव, कोल्हापूर
0 टिप्पण्या