भाग-१३ |
आपण एकाच दिशेने,एकसुरी पद्धतीने नकोत जाऊया.म्हणजे मला इथे पत्रकारितेतली व्यक्तिचित्रणे नाही लिहायचीत.कोणाची टिंगल टवाळी करावी.टोप्या उडवाव्यात.टांगा खेचाव्यात.असाही या लेखमालेचा उद्देश नाही.मुळात खेड्या पाड्यातील,तालुक्यातील आणि शहरातील सुद्धा ब्लॅक-व्हाईट जमान्यातील जुन्या चळवळ किंवा ध्येयवादी पत्रकारिते पासून आजच्या रंगीत डिजिटल इलेट्रॉनिक आणि मुख्यतः कमर्शियल पत्रकारितेच्या प्रवास नव्याने घडत बिघडत असताना या यंत्रणेची चाके किंवा गियर,नट-बोल्ट,मोटर्स असलेल्या लोकांनी नेमके काय केले याचा आढावा घेण्याचा मी यत्न करतोय.अनेकांना हा नसता खटाटोप किंवा उचापती वाटू शकतात.पण कधी कधी वेडेपणाने केलेले काम देखील काही तरी तथ्य देऊन जाते.माझ्या लेखमालेतून काही निष्पन्न होईल.काही सुधारणा बदल होतील अशी मला आजिबात खात्री नाही.जे होणार नाही त्याचा दावा कशाला करायचा.पण लोकांनी डोळे बंद केले किंवा दारे खिडक्या बंद करून कोंडून घेतले म्हणून सूर्याने लोकांना अंधारच हवाय तर प्रकाश कशाला पाडायचा असे म्हणून कसे चालेल ? लोक नाक दाबून घेतील भले,म्हणून वाऱ्याने वाहने बंद करावे की काय ? असो तर आपल्याला अप प्रवृत्तीवर प्रहार करायचेत.व्यक्तीवर नव्हे.म्हणून आपण पॅटर्न बदलत राहू.
तर आज मी सांगतोय ती कहाणी आहे जरा धक्कादायकच.म्हणजे पत्रकारांनी कोणावर प्रेम करू नये असे आमचे म्हणणे नाही.प्रेम करावे.आकंठ बुडून मनमुराद करावे.पण वन टू फोर,फोर टू का वन...किंवा तेजाब सिनेमातल्या प्रमाणे बारा-तेरा पर्यंत गिनती नसावी.काय म्हणता ? कुठे आहेत लफडी ? कोण करतं लफडी ? किती उदाहरणे सांगायची ? आधीच सांगितलंय आम्हाला प्रेमवीराबद्दल आजिबात आक्षेप नाही.प्रेम करा,जमल्यास लग्न करा,ब्रेक अप झालं तर सोडूनही द्या.पुन्हा दुसरं करा.हे चालतं.म्हणजे धकू शकतं.पण निव्वळ लफडी.आम्हाला असे अनेक छुपे रुस्तुम.रंगीले रतन माहिती आहेत.यात अनेक प्रकार आहेत.शोषण,आमिष,दबाव दडपण,लाडीगोडी,फसवणूक,नोकरी टिकवण्यासाठी,संधी बढतीसाठी कॉम्प्रमाइज सुध्दा,किंवा निव्वळ ऐय्याशी सुद्धा.टाईमपास म्हणून देखील.ही सगळीच नाती प्रामाणिक नसतात.यातली बहुतेक फसवी किंवा निव्वळ सैराट असतात.घटकाभर करमणूक म्हणून सुद्धा.किंवा काहीजण अतिप्रसंगही करतात.अशा भानगडीत रस्त्यावर,घरापर्यंत किंवा कार्यालयातही चोप खाल्लेले.नोकऱ्या गमावलेले,हाकलले पिटाळले धेंडे काही कमी नाहीत पत्रकारितेत.आम्ही आधीच सांगितले ना आम्हाला येथे कोणाचीही बदनामी नाही करायची,वैयक्तिक चारित्र्यहनन हा आमचा हेतू नाहीच आहे मुळात.
तर ताजी घटना अशी की महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आपल्या पतीविरोधात नेरुळ पोलिस स्थानकात एक गंभीर तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीतील बाकी मुद्यांचे जाऊद्या.म्हणजे ते त्यांचे खासगी विषय आहेत.पण काळेंच्या पत्नीने असा आरोप केलाय की आपल्या नवऱ्याचे एकाच वेळी दोन दोन वृत्तवाहिन्यांच्या महिला पत्रकारांशी अफेअर आहेत.मी त्यांचे व्हाट्सअप पोस्ट,मेसेज,फेसबुक चॅटिंग पहिले.त्यांना एकत्र फिरताना,हॉटेलात सिनेमागृहात सुद्धा पहिले.त्यांच्यामुळे माझे कुटुंब उध्वस्त होत असल्याचे संजीवनी काळे यांनी म्हटले आहे.बघा म्हणजे आपण कोणातरी सेलिब्रेटी किंवा राजकीय नेत्यांच्या लफड्यांची दिवस दिवस चर्चा करायची.त्याची स्पॉट रिपोर्टींग करायची.त्यावर स्पेशल रिपोर्ट,एक्सलीजिव्ह चालवायचं,ऑडिओ क्लिप,व्हिडीओ क्लिप,त्यांचे संबंध,त्याचे संदर्भ,अगदी त्यांच्या मुळगावापर्यंत,नातेवाईकांपर्यंत मुलाखती लाईव्ह दाखवतो.हे करताना आपण काय करतो हे आपण कसे विसरतो ? मी पुन्हा सांगतो प्रेम करणं पाप किंवा गुन्हा नाही.तो एक सुंदर अविष्कार आहे.पण लफडी म्हणजे विकृतीच.पत्रकार म्हणून रीतीने आणि नीतीने वागायला हवे.पण अनेकांना जाहीर खेटराने पूजा झाल्याशिवाय नैतिकतेचे मर्मच कळत नाही.या 'लाईन' मधले दोन्ही बाजूचे करंट फेल कन्फ्युज किंवा सर्किट असू शकतात.
(क्रमशः)
-रवींद्र तहकिक
7888030472
0 टिप्पण्या