सबका नंबर आयेंगा...

भाग-७

भाऊ तोरसेकरांची आम्ही केलेली जाहीर बिनपाण्याची हजामत वाचून अनेकांना मोठी गंमत वाटली असेल.काहींना धक्काही बसला असेल.पुढचं गिऱ्हाईक कोण ? याचे अंदाजही बांधले जाऊ लागले असतील.पुढचा नंबर आपला तर लागणार नाही ना ? म्हणून अनेकांचे केस ताठ झाले असतील.भाऊच्या काही चाहत्यांनी आम्हाला शिव्याही दिल्या असतील.आमचा लेख भाऊ पर्यंत पोहचला की नाही माहित नाही,पण त्यांची प्रतिक्रिया वाचायला,ऐकायला आम्हाला आवडेल.


आम्हाला त्यांच्याकडून त्यांच्या आंधळ्या मोदी-फडणवीस-भाजप समर्थनाचे आणि काँग्रेस -राष्ट्रवादी -शिवसेच्या आंधळ्या विरोधाचे सकारण स्पष्टीकरण हवे आहे.हे सगळं सुपारी घेऊन,म्हणजे मानधन किंवा मासिक पगारी तत्वावर चालू असेल तर चालुद्यात भाऊ.खुशाल चालुद्यात.आमची काही हरकत-आडकाठी नाही.पापी पेट का सवाल असेल तर बोला-लिहा हवे ते.पण मग राजकीय विश्लेषकाचा आव आणू नका.कळले ना, भाऊंची हजामत अजून पूर्ण झालेली नाही.आताशी कुठे सोयीची झाली आहे.अजून उलटी बाकी आहे.शिवाय लेव्हल,कट,मालिश..आणि बगला,नाकातले छाटायचे आहेत.खुर्चीवर बसवलेलं गिऱ्हाईक असच नाही सोडणार.


असो,तर आपण एक फार्मुला ठरवून घेऊ या.म्हणजे असं बघा की आपल्याला या लेखमालेत बऱ्याच मारोती-म्हसोबाचे शेंदूर खरवडायचे आहेत.फक्त ब्लॉग-युट्युबच  नाही एकूणच प्रसार माध्यमातील खालपासून वरपर्यंतच्या अप-प्रवृत्तींचा पर्दाफाश करायचाय.म्हणजे पार ग्रामीण-तालुका पातळीवर वार्ताहर प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या हात 'गंड्या' पासून विविध शेठ-साहेब -बाबूजींच्या गळ्यातल्या 'कंठ्या' पर्यंत सर्वांचा.त्यात मग टेबलावरचे (टेबलाखालचे),फिरतीवरचे असे सगळे आले.म्हणजे येणार.कोणी सुटणार नाही या धोबीघाटातून.मोठ्या गाद्या-उशा,लोड-तक्के,धुतले जातीलच.पण बाकी चिंध्या-चिरगुटांनी सुटलो बुवा म्हणण्याचे काम नाही.रुमाल सुद्धा सुटणार नाही.खिशातला रुमाल सुद्धा (खरे तर त्यालाच बरेच काही माहित असते) सगळ्यांचा धोबीघाट होणार.सबका नंबर आयेगा.


बारी बारी.म्हणजे सर्वाना कळेल इथे किती 'मळ' साचला आहे ते.आपण सगळ्यांना धुतो.पण आपणाला कोणी धुवायचे ? म्हणून हा लेखन प्रपंच आहे.आम्ही तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकणार.डिटर्जंट टाकून तुमचा फेस काढणार.आपटणार,पिळणार,उलटे करून उन्हात वाळत घालणार.पुन्हा कडक इस्त्री फिरवणार.पण हे सगळं तुमच्या,म्हणजे पत्रकारितेच्या भल्यासाठी.प्रसारमाध्यमाला आलेली मरगळ घालवण्यासाठी.गमावलेली विश्वासार्हता,उडालेले शिंतोडे,साचलेला मळ काढण्यासाठी.चुरगळलेली,विस्कटलेली घडी बसवण्यासाठी.बिनकामाच्या शिप्तरांची अडगळ एकदाची निकाली काढण्यासाठी. कुठेतरी उसवली निसवली म्हणून हकनाक फेकलेली चांगली कापडं पुन्हा वापरात आणण्यासाठी.हा दसरा एकदा काढावाच लागणार आहे.


जे सुधारणार नाहीत त्या चिरगुट चिंध्यांना जाऊद्या.तसेही ते बोहारणीला देऊन त्या बदल्यात भांडी घेण्याच्याच कामाचे असतात.किंवा मग त्यांच्या आपण गोधड्या शिवू.(माझ्याकडे चांगला भक्कम लाकडी कुट्ट्या आणि दाभण-दोरा आहे)पण आता कोरोना नंतर का होईना प्रसार माध्यमात आपण जे जे म्हणून कोणी टिकून उरलेली आहोत,टीव्ही म्हणा किंवा प्रिंट मीडियात.आपण आपली एक आचार संहिता ठरवावी लागेल.की बाबा हे हे करायचे नाही.असे असे करायचे.उदाहरणार्थ एकमेकांचे गळे कापायचे नाहीत.किरकोळ हव्यासापोटी इकडून तिकडे उड्या मारायच्या नाहीत.मुख्य म्हणजे मालकांचे गुलाम किंवा हस्तक बनायचे नाही.कोण्या राजकीय पक्ष किंवा नेत्याचे बटीक बनायचे नाही.असे अजून बरेच काही.पण त्या आधी कुमार केतकारापासून आता आताच्या सुशील कुलकर्णी पर्यंत पत्रकारिता एथिक्सच्या रुळावरून कशी घसरत गेली.इंजिन कुठे गेले,डब्बे कुठे गेले.पटरी का सुटली ? पहावे लागेल ना बाबानो ...म्हणून म्हणतो ,सबका नंबर आयेगा ! 

(क्रमशः ) 

-रवींद्र तहकिक

7888030472

!--Composite Start-->

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या