युट्युबवरचे पिंपळे भगत

भाग-५

युट्युबचे पुराण सांगावे तेवढे कमी आहे.हा मीडिया पत्रकारांनी वापरायला सुरुवात केल्यापासून त्याची रयाच गेली.मी ग्रामीण आणि एकट्या दुकट्याने भूरटेगिरी करणाऱ्या युटूबर्स बद्दल मागील चार भागात काही संदर्भ दिले.त्यांची मजबुरी देखील सांगितली.माध्यमांची प्रतिष्ठा किंवा विश्वासार्हता म्हणून हे एकटे दुकटे फकीर मागते जोगते फारसे धोकेदायक नाहीत.पूर्वीच्या काळी नाही का,पिंगळे,कुडबुडे,वासुदेव,गोंधळी,आराधी,पोपटवाले,चित्तरकथी,माकडवाले,डोंबारी,गारुडी,बम्बई की रंडी वाले,रायरंद,बहुरूपी,भविष्य पाहणारे,गावात येत असत आणि घटकाभर करमणूक करुन पोटापुरता पसा मागत तसा एक समूह किंवा झुंड म्हणा हवी तर.युट्युब मीडियात आहे.एकजण रिकामा करतो,त्याचे पाहून दुसरा रिकामा ते करुन पाहतो.


एक दहा-पंधरा हजारापर्यंतचा मोबाईल आणि मोकळाच मोकळा असणारा वेळ.एवढेच भांडवल.असे हजारो फिरस्ते आहेत.तीन हजार सब्स्क्रायबर आणि चार हजार तासांच्या व्ह्यूजच्या मृगजळामागे धावणारे.त्यांच्या बद्दल आपण केवळ सदिच्छाच व्यक्त करू शकतो.आणखी काही नाही.त्यांच्या बिचाऱ्यांच्या फार अपेक्षाही नसतात.रोजचे भागले,आला दिवस कटला म्हणजे झाले.फारफार स्थानिक राजकीय नेते,कार्यकर्ते किंवा सरकारी आधिकाऱ्याकडून चहापाणी.असो.मला बोलायचे आहे ते युट्युब मीडियातल्या पिंपळ्या भगताबद्दल.राजकीय,धार्मिक,सामाजिक,अगदी उद्योग व्यापार क्षेत्रातील लहानमोठ्या बकऱ्यांना गाठून किंवा गटवून पटवून त्यांना व्यवस्थित शेंडी लावून आपले उखळ पांढरे करुन घेणारे 'अघोरी विद्या-काळी जादू जाणणारे' पिंपळे भगत.


हिंदीवाले सोडा.आपल्या मराठीत असे तीन चार युटूबर्स माझ्या समोर आहेत.जे रोज एकाच पक्षाचे किंबहुना एकाच व्यक्तीचे दळण दळताना दिसतात.लोकांना उबग येऊ नये म्हणून क्वचित विषय आणि हेडिंग वेगळे घेतले तरी या हरदासांची कथा पुन्हा मूळपदावर जाते.मी नावासह आणि उदाहरणासह या बाबत पोलखोल करणार आहे.अर्थात हे म्हणजे कोणी काही पत्रकारितेतील बडी धेंडे,अभ्यासक,विचारवंत वगैरे नाहीत.कधीकाळी पत्रकारितेत असणारे,आणि तेव्हाही दुय्यम तिय्यम दर्जाची पत्रकारिता करणारे.गेल्या काही वर्षात पत्रकारितेतून जवळपास निष्काशीत झालेले आणि तूर्तास कोठेच शिरकाव मिळत नसलेले असे हे पिंपळे भगत आता यूट्यूबच्या माध्यमातून पथारी मांडून बसलेले आहेत.


पूर्वी अशा प्रकारे टोळीतून हाकललेले किंवा वाट चुकलेले म्हाळे स्वतःचे एखादे साप्ताहिक किंवा एखाद्या विषयाला वाहिलेले अनियतकालिक अथवा फाईल पुरते दैनिक वगैरे काढत,किंवा मग स्थानिक पुढाऱ्यांची,त्याच्या मेलेल्या बापाची वगैरे चरित्रे लिहून देत.पण सोशल आणि डिजिटल मीडियाने आता हा धंदा बुडाला.निवडणुकीची पॉमप्लेट्स,मेसेज,जाहिरातीच्या पोस्टरच्या केचिलाईन लिहून देण्याची कामे मिळतात.पण ती सिजनेबल.रोज काय करायचं ? म्हणून युट्युबचा धंदा.दुसरं करणार काय.मी वर्तमानपत्रांच्या युट्यूब्स बद्दलही लिहिणार आहे.पण त्या पूर्वी युट्युब मधल्या या पिंपळ्या भगताबद्दल.मला वाटतं तुम्हाला विषय कळला असावा.चला तर मग उद्या पहिला पिंपळ्या भगत पट्ट्यावर घेऊ.फोक तयार आहे.खिळे आहेत,आणि चिंचेचं झाड सुद्धा.

(क्रमशः) 

-रवींद्र तहकिक

7888030472


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या