भाग- ६ |
होय,मी आदरणीय 'भाऊ' म्हणजेच गणेश तोरसेकरांबद्दल बोलतोय.भाऊ आता म्हातारे झालेत.पण सिंह म्हातारा झाला म्हणून कधी गवत खाईल का हो ? नाही ना.तो आतडी पिळवटून तडफडून मरेल.पण गवत नाही खाणार.पण भाऊ खातोय.गवत,कडबा,भूस,दावणीत पडेल ते खातोय.अगदी पाचोळा-गळाटासुध्दा.गरज नाही.आवश्यकता नसावी.इतक्या वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात आता वृद्धापकाळी निवांत दिवस काढण्या इतकी पुंजी तर असेलच गाठीला.नसली तर मुक्त पत्रकारिता,ब्लॉग,पुस्तके,व्याख्याने,अन्य काही लेखन करायला हरकत नाही.परंतु आपण कधीकाळी आचार्य अत्र्यांच्या 'मराठा'त,नानासाहेब परुळेकरांच्या 'सकाळ' मध्ये,बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मध्ये काम केले याची तरी याद भाऊंनी राखायला हवी.निदान ब्लीट्स,भूपुत्र,आपला वार्ताहर,विवेक,चित्रलेखा,पुण्य नगरीची तरी..,.
राखायची.जरा तिखट बोलतोय का ? एका जेष्ठ पत्रकाराचा अनादर,उपमर्द,पाणउतारा होतोय माझ्याकडून ?नक्कीच.असे व्हायला नको.मी क्षमा मागीन त्या बद्दल.दिलगिरी व्यक्त करील.खासगीत आणि जाहीर सुध्दा.भाऊ आहेतच तेवढे मोठे. अभ्यास ,अनुभव,संपर्क,वाचन,परिश्रम,या सर्वच बाबतीत भाऊंचा व्यासंग 'दांडगा' आहे.आम्ही (म्हणजे मी ) त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही.नक्कीच.पण दांडगा भाऊ लांडगा कधी झाला हे कळलंच नाही आम्हाला.कशाच्या मोहात पडला,की कुठे अडचणीत सापडलाय दैव जाणे.पण 'भाऊ'चा असा 'भगवान दादा' झालेला पाहून खरेच त्यांची दया येते.कीव..होय कीव येते.म्हणून हा फणस तेल घालून सोलावा लागतोय.इलाज नाही.
भगवान दादा माहित आहेत तुम्हाला ? हिंदी सिनेमातील एके काळचे फाईट माष्टर.माष्टर भगवान म्हणूनही ते प्रसिद्ध होते.कधीकाळी नायक म्हणून,मग निर्माता दिग्दर्शक म्हणून काम केलेला.अवलिया कलंदर माणूस.त्यांची नृत्याची एक आगळी वेगळी खास शैली होती.त्याला पब्लिक मधून हमखास आणि हुकमी टाळ्या शिट्या पडायच्या.(त्यांची नृत्य शैली आधी अमिताभ बच्चनने आणि नंतर गोविंदाने ढापली) पण अखेरच्या काळात हा डान्सिंग किंग अक्षरशः कफल्लक झाला.दोन वेळच्या जेवणाला मोताद झाला.व्यसनाधीन तर तो होताच.कर्जबाजारीही झाला. कारण 'हातगुण'..'पायगुण' दोन्हीही.कलेची तर त्याने वाट लावलीच,कलावंतांच्या प्रतिष्ठेची सुद्धा पार वाताहत विटंबना केली.असे म्हणतात की अखेरी अखेरीस भगवान दादा शे-दोनशे रुपयांसाठी एखाद्या सिनेमात सिक्वेन्स सीन्स किंवा समूह नृत्यात बळेच एका कोपऱ्यात त्यांच्या खास शैलीत नाचायचे.कधी कधी तर लग्नाच्या वरातीत सुद्धा.हे सगळं का सांगतोय ?
भाऊ हळू हळू त्या दिशेने जाताना दिसताहेत.म्हणजे आर्थिक विपन्नावस्था नाही.भाऊ सुखी संपन्न समृद्ध असोत.त्यांचे वैभव आणखी वाढो.पण पत्रकार म्हणून पत,प्रतिष्ठा,विश्वासार्हता या बाबतीत भाऊंचा भगवान दादा होणे हा एकूणच पत्रकारितेला 'धक्का' आहे.भाऊंनी स्वतः ठरवून मुख्य प्रवाह पत्रकारितेतून निवृत्ती घेतल्या नंतर (किंवा इतरांनी ठरवून भाऊंना तेथून गचांडल्या नंतर ) त्यांनी 'जागता पहारा' नावाचा ब्लॉग चालवला.इथेच भाऊ भरकटले.मी इथे नाव किंवा पक्ष सांगत नाही,पण सगळ्यांना माहित आहे.भाऊचा अगदी टोकाचा राग कोणावर आहे ते.अगदी त्या राजकीय नेत्याने जीवनातून उठवलेले,बरबाद केलेले लोक देखील जितका पराकोटीचा द्वेष करीत नसतील इतका टोकाचा आणि विक्षिप्तपणाचा भास होईल इतका विखारी द्वेष भाऊ त्या राजकारण्यांचा करतात.सगळे जग(टोकाचे विरोधक सुद्धा) ज्या व्यक्तीचे दोष आणि गुण तोलतात.त्यांच्यात भाऊला एकही बरा गुण दिसू नये हा रातांधळेपणा म्हणायचा की वरभवल्यापणा ?
बरे ते असो,सध्याचे भाऊंचे 'प्रतिपक्ष' नावाचे युट्युब चॅनल जरा पहा.म्हणजे चुकून पाहिलेत तर पुन्हा पाहणार नाहीत.कारण असते काय त्यात मोदी,शहा,फडणवीस,यांची तोंडाला फेस येई पर्यंत आणि बोळक्या तोंडाची बोबडी वेळेपर्यंत भाटगिरी. आणि काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी,उद्धव ठाकरे,शरद पवार,संजय राऊत,आणि गांधी परिवाराला शिव्या.त्यात तारतम्य सोडाच अनेकदा,किंबहुना नेहमीच सत्याचाही अपलाप असतो.मला तर शंका अशीही आहे की युट्युब करण्यासाठी भाजपच किंवा फडणवीसच भाऊंना 'चालना'देत असावेत.नुसती चालना नाही.कपडे सुद्धा.(तरीच भाऊंना अलीकडे कपड्यांचा सेन्स आलाय) कळलं ना मी भाऊंना भगवान दादा का म्हणालो ते.लाज कोळून किती प्यावी माणसाने ? खुषमस्करेगिरी किती करावी.भाऊ 'नमोरुग्ण' वाटावेत इतके भक्ताळलेत.'एकच प्याला'त तळीराम म्हणतो 'मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे' तसेच आहे नाही का हे ?
(क्रमशः)
-रवींद्र तहकिक
7888030472
3 टिप्पण्या
मी सुद्धा पूर्वी प्रतिपक्ष ऐकत असे कारण भाऊंच नांव अप्रत्यक्ष शिवसेनेशी जोडले गेलेले ! परंतु पुढे पुढे त्यांच्या बोलण्यातून मा. संजय राऊतांबाबतचा उल्लेख करताना काहीतरी भाऊंना बोचलेले आहे आणि ते विलक्षण पिडीत होऊन सूड भावनेने बोलत आहेत हे जाणवत गेले. आणि मी प्रतिपक्ष पाहणे सोडले
उत्तर द्याहटवाअरुण खोराटेपाटील
उत्तर द्याहटवामला देखील मा. भाऊंची मा.संजय राऊत यांचे बाबतची मते एककलली वाटू लागली.
भाऊने सर्व लाज सोडली आहे. त्याना पण कळले आहे जोडे मिळणार म्हणून comment बंद करून ठेवल्या आहेत. हेमंत देसाई आणी निखिल वागळे हे अंधभक्ताकडुन नेहमी शिव्या खातात पण म्हणून comment बंद केल्या नाहीत कारण त्याना पटेल तेच लिहितात कोणाचे मिंधे नाहीत.
उत्तर द्याहटवा