वाशीम - भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना वाशिमच्या पत्रकारांनी चांगलाच इंगा दाखविला. सोमय्या हे वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली खरी पण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांचीच बोबडी वळली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल वाशिम मध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली,मुंबईतून येणाऱ्या अनेक नेत्यांना ग्रामीण पत्रकारांबाबत अनेक गैरसमज असतात तेच सोमय्या यांच्यातही दिसले.आपण राज्यस्तरीय पत्रकारांमध्ये उठबस करतो,त्यांना मॅनेज करतो मग हे काय चीज आहेत ? हा अविर्भाव त्यामागे असतो.
त्यातूनच पत्रकारांनी आपल्याला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत हे सुद्धा तेच ठरवत असतात.वाशिम मध्ये पत्रकारांनी सोमय्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली तेव्हा सोमय्या बावचळले, त्यांना वाटले असेल की राजेंद्र सेठ पाटनी यांनी पत्रकार अगोदरच सेट केलेले असतील,निवेदन करून निघून जावे पण झाले उलटे,त्यामुळे तुम्ही हे चिल्लर प्रश्न का विचारता ? असा शहाजोग प्रतिप्रश्न त्यांनी करताच खवळणार नसतील ते वाशिमकर कसले ? आम्ही काय विचारावे हे तुम्ही ठरवणारे कोण ? असा सवाल झाल्यावर बोबडी वळलेले सोमय्या थंडावले,नंतर पत्रकार बहिष्कार टाकून बाहेर पडले.
प्रस्तापित मीडियाची इज्जत रस्त्यावर
खासदार भावना गवळी यांच्यावर भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला तर खासदार गवळी यांनी आमदार पाटणी यांच्या ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे सबंध राज्याचे लक्ष वाशीम जिल्ह्याकडे लागले. यातच भाजप नेते किरिट सोमय्या यांनी वाशीम दौरा करून फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा केवीलवाना प्रयत्न केला. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी सोमय्या यांचे स्वागत सिटी न्यूज या स्थानिक दैनिकात आलेल्या बातम्यांच्या कात्रणांनी तयार करण्यात आलेल्या मोठ-मोठ्या होर्डिंग्जने केले. यामध्ये सोमय्या ज्यांच्या बाजूने बोलण्यास आले त्यांचेही पाय चिखलातच असल्याचा संदेश होता. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करीत असतानाही मोठे दैनिकं, टीव्ही चॅनेल मूक आहेत. त्या उलट लोकल दैनिके, सोशल मीडिया आणि न्यूज पोर्टलमध्ये वस्तुनिष्ठ बातम्या देत आहेत. आता वाशीम शहरात जागोजागी लोकल दैनिकांच्या बातम्यांचे होर्डिंज झळकल्याने मोठी दैनिके, प्रस्तापित मीडियाची इज्जतच जणू वाशीमच्या रस्त्यावर टांगल्याचे चित्र आहे. प्रस्तापित दैनिकांनीही नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या छापल्या असत्या तर त्यांचेही होर्डिंग्ज रस्त्यावर लागले असते. पण, त्यांनी या संधीसह विश्वासहर्ता गमावली.
0 टिप्पण्या