यवतमाळ - गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे वृत्तपत्र सृष्टीला घरघर लागल्याचा बागूलबुवा केला जात असतानाच यवतमाळ जिल्ह्यात नवे दैनिक सुरू होत आहे. ‘लोकसूत्र’असे या नव्या दैनिकाचे नाव असून, १ सप्टेंबरपासून हे वृत्तपत्र सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते माणिकराव ठाकरे यांचे हे वृत्तपत्र असल्याची माहिती आहे. त्यांचे पूत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे या वृत्तपत्राचे मालक आहे. लोकसूत्र सर्व ताकदीनिशी सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी पुण्य नगरीचे जिल्हा प्रतिनिधी केशव सवळकर यांना प्रमुख म्हणून घेण्यात आले आहे. सवळकर यांनी नुकताच पुण्य नगरीच्या जिल्हा प्रतिनिधीपदाचा राजीनामाही दिल्याने नव्या वृत्तपत्राची ‘सूत्र’ त्यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा प्रतिनिधीपदासह दोन उपसंपादक, दोन ऑपरेटर, वितरण प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी असे मनूष्यबळ लोकसूत्रमध्ये भरले जाणार आहे. नागपूर येथून वृत्तपत्राची छपाई होणार असून, यवतमाळ जिल्ह्यासाठी हे वृत्तपत्र सुरुवातीला चालविले जाणार आहे. कोरोनामुळे वृत्तपत्र सृष्टीवर अवकळा आल्याचे सांगून अनेकांच्या नोकऱ्या हिरावून घेण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. अशास्थितीत नवे दैनिक सुरू होत असल्याने अनेकांनी लोकसूत्रमध्ये नोकरी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले असल्याचे ऐकायला मिळत आहे.
0 टिप्पण्या