संपादक नंगा झाला, त्याची गोष्ट....

 

आणि नेहमीप्रमाणेच एक सकाळ उजाडली.नेहमीप्रमाणेच लोक बाजारात जाऊ लागली. नेहमीप्रमाणेच लोक शौचालयांमध्ये जाऊ लागली. नेहमीप्रमाणेच लोक मंदिरांमध्ये जाऊ लागली. काही नदीच्या घाटावर आंघोळ करू लागली. काही कार्यालयांमध्ये जाऊ लागली. काही शेतांमध्ये. काही नाक्या नाक्यांवर उनाडक्या करू लागली.. नेहमीप्रमाणेच. थोडक्यात सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू होते... आणि अचानक एक बातमी आली... आधी थोडीशी उडत उडत.. मग अर्धवट.. मग जरा वेळाने पूर्ण आणि स्पष्ट.. लोकांनी बातमी ऐकली, लोकांनी बातमीमागची बातमी ऐकली. लोकांनी बातमीच्या पुढची बातमी ऐकली.  थोडक्यात काही वेळातच बातमी पसरली. काहींना धक्का बसला. काहींना आश्चर्य वाटले. काहींना विचित्र वाटले. काही विचार करायला लागले. काहींना मनातून छान वाटले. काहींना हायसे वाटले. काहींना सुटल्यासारखे वाटले. काहींना काहीच वाटले नाही, तर काही नक्की काय वाटायला पाहिजे याचा विचार करू लागले...काहींच्या भावना तीव्र झाल्या. काहींना संताप अनावर झाला. काही रडू लागले. काही नुसतेच दु:ख करू लागले. काही नैराश्यात गेले.. या सर्वातून मग सगळ्या शहरात चर्चा सुरू झाली. आधी कुजबूज, नंतर फुसफूस, नंतर धुसफूस, कुठे समूहांमध्ये, कुठे जाहीरपणे..एक दोन ठिकाणी तर सभा वगैरे घेऊन चर्चा सुरू झाल्या. चर्चा रंगू लागल्या. चर्चा झडू लागल्या. एकूणच संध्याकाळ होईपर्यंत चर्चांना ऊत आला...


त्यातले काही म्हणाले, ‘छे काहीतरीच काय? असं काही घडणारच नाही !’ काही म्हणाले, आपला तर बुवा विश्वासच बसत नाही.  काही म्हणाले, असं कधीतरी होणारच होतं. काही म्हणाले ही विरोधकांची चाल असेल. काही म्हणाले याला राजकीय रंग आहे. काही म्हणाले हे आपल्या शहरावरचे संकट आहे. काही म्हणाले, वा! असंच पाहिजे. ही घाण आहे, ती जायलाच पाहिजे. काही देवभोळे होते.. ते म्हणाले प्रभू रामचंद्रांनी पावन केलेलं हे शहर आहे. अशा शहरातला माणूस असं कसं करू शकेल? वाण नाही तर गुण त्याला लागलाच असेल ना. त्यांच्या सोबतच्या आणखी काही भोळसर लोकांनी दुजोरा दिला, ते म्हणाले बुद्धांच्या अनुयायांनी इथे प्रार्थनेसाठी लेणी उभारली, ध्यान धारणा केली. शांततेचा संदेश दिला.. त्या या भूमीत असं कसं शक्य आहे. त्यातीलच आणखी काही म्हणाले इथे गाडगेबाबांनी मानवतेचे काम उभारले, त्यांनी लोकसेवेचा महान संदेश दिला. त्यासाठी या भूमीत प्रत्यक्ष कार्यही सुरू केलं मग तरीही हे असं होईलच कसं? शक्यच नाही. एक दोन आंबेडकरवादी होते. ते म्हणाले बाबासाहेबांनी इथे समानतेचे आंदोलन केले.  त्यांचे अनेक अनुयायांनी मानवतेचे, समानतेचे कार्य पुढे नेले. शहराला दिशा दिली. प्रज्ञा, शील आणि करूणेचा संदेश बाबासाहेबांनी दिला, त्यांच्या अधिवासाने ही भूमी पवित्र झालेली आहे. पावन झालेली आहे. मग असं अनैतिक कृत्य कोण तरी करेल का बरे ! शक्यच नाही.  काही सर्वोदयी होती. ते म्हणाले गांधीजींच्या स्वातंत्र्यचळवळीचा इथे इतिहास आहे. कारुण्याचा एक सुप्त झरा येथील जनतेच्या लोकांमध्ये वाहतो आहे. शिवाय बापूंजींच्या अस्थिही इथल्या पवित्र कुंडात विसर्जन केल्या होत्या. त्यामुळे तर इथे असं काही होणे अशक्यच. काही सावरकरवादी होते. ते म्हणाले की राष्टÑप्रेमाची प्रखर ज्योत स्वातंत्र्यवीरांनी याच भूमीतून चेतवली. प्रखर नैतिकतेचे त्यांना अधिष्ठान लाभलेले होते. त्यांचं वागणं नेहमीच पवित्र आणि आदर्श होतं. त्यांच्या कर्मभूमीत असं काही होणं हे आम्हाला पटतच नाही बुवा. काही प्राध्यापक होते, ते म्हणाले अहो अगदी परवाच तर आम्ही बोललो होतो दूरध्वनीवर. समाजाची ढासळती नैतिकता या विषयावर तात्विक अंगाने मार्मिक लेख लिहावा अशी मला गळ घातली की हो त्यांनी. शिवाय नैतिकता, तत्त्व यांच्यावर आम्ही दीड तास व्यासंग केला.  त्यातून नवनैतिकतेच्या लहरीच्या लहरी आविष्कृत झाल्यात. आता तुम्हीच सांगा अशी व्यक्ती असं वागेल का? काही पत्रकार होते. ते म्हणाले आम्हाला तर ते गुरू समान आहे. त्यांनी आम्हाला पोटापाण्याला लावलं आम्ही कसा काय या बातमीवर विश्वास ठेवायचा. काही राजकारणी होते.. ते म्हणाले, शक्यय का असं काही होणं? अहो राजकारणावर काय भारी लिहितो तो माणूस, राजकीय नैतिकतेचे डोसचे डोस आम्हाला रविवारच्या कॉलममधून तो पाजत असतो, बरेचदा रात्री टेबलवर बसून ओल्या गळ्याने आम्ही या विषयावरच चर्चाही केलीय,  त्यामुळे ही बातमीच आम्हाला कारस्थानी वाटते. हे नक्कीच विरोधकांचे किंवा त्यांच्याच पक्षातील हितचिंतकांचे काम असेल... काही वास्तववादी होते आणि मोजके विवेकी होते. त्यांचं म्हणणं पडलं की आपण सांगोवांगी विश्वास ठेवायला नको. प्रत्यक्षच पोलिस स्टेशनला जाऊ, किंवा सरळ त्यांनाच विचारू. त्यातून कळेलच की सत्य काय ते. काही घाबरट होते, काही भेदरट होते, काही अंगाला लावून न घेणारे होते, ते म्हणाले की आपण या भानगडीच नको पडायला.. तरीही एकूणच चर्चा झडू लागल्या. उभ्या, आडव्या, सरळ, तिरप्या, सरळ आडव्या किंवा सरळ उभ्या किंवा सरळ वाकडया अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत आला. जिकडे तिकडे चर्चाच चर्चा.


 


घडलंच तसं होतं. आक्रीत, धक्कादायक विश्वास बसणार नाही असं. शहराच्या मध्यवर्ती भागात रात्री एक संपादक नंगा झाला होता, सोबत आणखी दुसराही संपादक होता. दोघेही दिगंबर अवस्थेत होते. एरवी आपल्या लेखणीने राजकारण असो अथवा समाजकारण सर्वांना नंगे करणारा, नैतिकतेचे धडे देणारा हा संपादक स्वत:च नंगा झाला होता. म्हणूनच सगळीकडे ही चर्चा सुरू होती. मुळात संपादक असा वागलाच का? त्याची दिगंबर अवस्था झालीच का? काही विवेकी लोक होते, काही बेरकी होते, काही टाईमपास पत्रकार होते, काही कवडीछाप राजकारणी होते. त्यांनी मग शोधायचं ठरवलं. प्रकरणं उचकायचं ठरवलं, गोष्ट चव्हाट्यावर आणायची ठरवली, सत्य शोधायचं ठरवलं. कुणी थेट पोलिस स्टेशन गाठलं. कुणी संपादकांच्या जवळच्या माणसांना गाठलं. कुणी संपादकालाच गाठलं... पोलिस म्हणाले संपादकाला आम्ही नंगं पकडलं हे खरंच आहे... एक नाही दोन संपादक.पकडले...आम्ही गस्तीवर होतो रात्री. तेव्हा आम्हाला टिप मिळाली... म्हणून मग एका मसाज पार्लरमध्ये टाकली धाड.. तर धक्काच बसला, तिथे हे दोघे नको त्या गोष्टी करताना, नको त्या अवस्थेत पकडले... दोन पोरी बी होत्या सोबत... आमचे साहेब म्हणाले बरे तावडीत गावले, एरवी आपल्या डिपार्टमेंटवर लय नैतिकता चोदायचे आयझवाडे... आता सापडले तावडीत भुंडयावर देऊ दोन दोन फटके.... आम्ही दोघांनाबी बनियनवरच चौकीवर आणलं,  बाकडयावर बसवून मग आतमध्ये घेणार, तोच त्यांनी त्यांच्या मालकांना फोन केले, मग मालकांनी मंत्र्यांना केले, मंत्र्यांनी मग सचिवाला आदेश दिले, सचिवाने आमच्या कमिशनर साहेबांना सांगितलं आणि त्यांनी आमच्या सायबांना. म्हणाले, पुढच्या छप्पन्न रविवारपर्यंत मंत्रीसाहेब आणि त्यांच्या पक्षावर एकांगी लिहिण्याचे कबूल केलंय त्यांच्या मालकांनी.. मग आपण कशाला उगाच पंगा घ्यायचा.. जरासाक दम द्या आणि द्या सोडून... आमचा साहेब लय चरफडला, पण काय करता आलं न्हायी बघा, फाटंच्या टायमाला आम्ही त्यांना घरापोत्तर पोचवलं बघा... लय वाईट जमात बघा ही, हिच्या नादाला शहाण्यानं लागू नये....


दुसरीकडे जे  थेट संपादकालाच भेटले... त्यांना वेगळंच सत्य समजलं.... खरं तर संपादक हे काय रविवारी कॉलम लिहीत नव्हते, तर ते चांगले वार्ताहरही होते. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी अनेक वार्तांकने केली होती... आधी ते सायकलवर जायचे.. नंतर स्कूटरवर.. नंतर मोटारीतून.. मग मात्र आपल्या दालनात बसूनच काम करून लागले, लेख लिहू लागले.... पण एक दिवस त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊनच वार्तांकन केले पाहिजे, असे व्याख्यान दिले. पण नुसते व्याख्यान देणे त्यांच्या नैतिकतेत बसेना. कार्यालयात परतल्यावर त्यांना वाटलं की आपला संदेश होतकरू पत्रकारांपर्यंत व्यवस्थित पोहोचवायचा असेल, तर आपण स्वत: बातमी आणायला हवी. तरच आपण नैतिकतेला पात्र होऊ. मग त्यांनी दोन तीन दिवस विचार केला. दुसºया दैनिकांच्या एकदोन संपादकांशी चर्चा केली आणि शोध पत्रकारिता करायचे ठरवले. तसेही शहरातील समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातील अनैतिकता संपविण्याचे धडे ते आपल्या सदरातून देतच असायचे.  अशाच काहीशा प्रकरणाचा छडा लावावा असा विचार त्यांनी दुसºया संपादक मित्राला बोलून दाखवला. या संपादक मित्राची नजर शोधक होती आणि वाचक दांडगे होते. विशेष म्हणजे त्यांचे वाचन स्वत:च्या अग्रलेखांपर्यंत मर्यादित नव्हते. ते आपले वर्तमानपत्र संपूर्ण वाचायचेच, पण या संपादकांचे वर्तमानपत्रही रोज वाचायचे. मनात कुठलाही भेदभाव न करता. त्यांनीच मग या संपादकांना सुचविले की तुमच्याच वर्तमानपत्राच्या जाहिरात सदरात अनेक महिन्यांपासून एक जाहिरात नियमित येते. केरळी पद्धतीने मॉलिश करण्याच्या. पण  ही झाली छापायची जाहिरात, प्रत्यक्षात तिकडे दुसरेच उदयोग चालतात, अगदी अनैतिक. तेव्हा आपण त्या जाहिरातीत सांगितलेल्या  पत्त्यावर जाऊ ग्राहक म्हणून, करू पर्दाफाश.. काय? त्यांचे म्हणणे या संपादकांना पसंत पडले. मग एक दिवस शहराची पाने लावल्यानंतर दोघेही रात्री उशिरा जाहिरातीतल्या ठिकाणी गेले. कुणाला संशय येऊ नये म्हणून संपादकांनी आपल्या सावळ्या चेहºयावर मेकअपची पुटेही चढवली होती. गिºहाईक बनण्याचे सोंग बेमालून व्हायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. मग ते ठरल्याप्रमाणे तिथे गेले. पण ते पत्रकार असल्याचा कुणालाच संशय आला नाही. (तसेही त्यांना किरकोळ राजकारण्यांशिवाय कोणी ओळखत नाही असे मागावून त्यांच्या दुसºया संपादकांनी माहिती पुरविली, ती गोष्ट अलहिदा) मग तिथे दोन मुली आल्या. त्यांना कपडे काढायला सांगून मॉलिश करू लागल्या. खरं तर दोन्ही संपादक सावध होते. कसलेल्या बातमीदाराच्या नजरेने सर्वकाही टिपत होते. त्याचा उपयोग त्यांना बातमीसाठी करायचा होता.  मॉलिशची खोली कोंदट होती. हवेत उकाडाही होता, म्हणून संपादकांच्या परवानगीने त्या मुलींनी आपले काही कपडे काढून टाकले.  खरी तर ही गोष्ट संपादकांच्या नैतिकतेत बसत नव्हती, एकदा तर आपण स्टिंग आॅपरेशन करायच्या नावाखाली आपल्या धर्मपत्नीशी प्रताडना तर करत नाही ना? असाही एक राजकीय प्रश्न त्यांनी स्वत:च्याच मनाला विचारला. पण त्यांच्या मनात नैतिकतावाद धगधगत होता. त्यामुळे ही शक्यता त्यांनी मनातल्या मनात फेटाळून लावली.... त्यांना आता खरंच त्या मुलींचा (उरला सुरला) पर्दाफाश करायची घाईच झाली होती.... आणि दुधात मीठाचा खडा पडावा, तशी नेमकी त्याच वेळेस चांगल्या कामात पोलिसांची धाड पडली. सुरूवातीला पोलिसांचा गैरसमज झाला, पण आम्ही ओळख सांगितल्यावर ते कमालीचे घाबरले, माफी मागू लागले आणि मग त्यांनीच आम्हाला सन्मानाने घरी सोडविले. लोक उगाचच काहीही चर्चा करतात. चांगलं काही करण्याची आणि नैतिकनेते वागण्याची सोयच नाही राहिली या जगात..


 


काही जण संपादकाच्या सहकारी आणि मित्रांना भेटले होते.  ते म्हणाले की साहेबांविषयी काय सांगणार.. संपादक साहेब एकदम जंटलमन माणूस कुठे रात्री बसण्याचा कार्यक्रम असेल, कुठे पैशांचे पाकिट मिळत असेल, तर साहेब आम्हाला न चुकता घेऊन जातात.  संपादक-वार्ताहर असा भेद न करता बळजबरीने आम्हालाही काही पैसे घ्यायला लावतात. साहेबांच्या गावातल्या राजकारण्यांशी ओळखीही खूप आहे. त्यातून दिवाळीचे गिफ्ट, मुंबई- दिल्ली किंवा परदेशवारी अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यात साहेब आम्हालाही सहभागी करतात. फार दयाळू साहेब, आम्हाला अजिबात विसरत नाही.. आज एवढ्या वर्षात रेल्वेस्टेशनच्या परिसरात साहेबांचा मोठा बंगला आणि शहरातील नदीकाठी मध्यवर्ती भागात आलिशान फ्लॅट झाला साहेबांचा, पण ते आम्हाला विसरले नाहीत. कुणाला वनरूम किचन, कुणाला वन बीएचके, कुणाचे रो हाऊस असं झालंच की.. कुठला संपादक करेल असे. पण असं असलं तरी साहेब पत्रकारितेत मात्र फार नैतिकता जपतात. रविवारच्या सदरात तर शहरातील कितीही मोठा नगरसेवक किंवा राजकारणी असो, ते त्याला झोडपतातच. निडर आणि खमक्या संपादक म्हणून त्यांची उगाच ओळख झाली का? आणि लोक काय हो मनाला काय वाटेल ते बोलतात. लोक असेही म्हणतात की प्रत्येक राजकीय पक्षात अंतर्गत असे दोन-तीन विरोधी गट असतातच... त्यापैकी जो गट पॉवरफूल असेल त्यातल्या काही पित्यांना संपादक साहेब बोलावतात. त्यांच्याशी दीर्घ चर्चा करूनच म्हणे मग त्यातल्या त्यात पक्षातीलच कमजोर गटावर साहेब खरपूस लिहितात. त्यामुळेच एखादद्या पक्षावर लिहिले तरी त्यांना राग येत नाही की कुणी जाब विचारायला येत नाही. साहेबांच्या यशस्वी सदराचे हेच वैशिष्ट्य आहे आणि त्यातूनच साहेबांनी रग्गड माया कमावलीही. साहेबांनी अधिकृत बायकोशिवाय अनधिकृत अंगवस्त्रेही बाळगली आहेत, असेही त्यांचे विरोधक म्हणतात. पण हे सर्व खोटे आहे. आमचे साहेब असे नाही. या सर्व अफवा आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांनी नंगं पकडल्याच्या ज्या काही बातम्या आहेत, त्यात साहेबांची पत्रकारितेशी असलेली निष्ठाच दिसून येते. त्यांना समाजातील ही सर्व घाण, अनैतिकता संपवायची आहे, असे मनापासून वाटते, म्हणूनच  तर ते बातमीसाठी गेले होते. तसं नसतं तर ते गेलेच नसते. तसेही अनेक वर्षे त्यांना बातमीसाठी जाण्याची गरजच काय आहे. कधी रात्री बसण्याच्या टेबलावर, तर कधी पक्षांच्या लोकांकडून बातम्या मिळातातच की त्यांना आयत्या. अहो बातमी चालून येते, तो खरा संपादक असतो, हे लक्षात घ्या तुम्ही....


 


एकूणच प्रत्येकाने आपापल्यापरिने वास्तव शोधण्यचा प्रयत्न केला. सत्य शोधण्याच्या प्रयत्न केला. घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येकानेच एक निष्कर्ष समान काढला, तो म्हणजे संपादक नंगा झाला आणि हे खरंय. या गोष्टीच्या पुढे अनेक दिवस चर्चा होत राहिल्या पण त्यावर ना संपादकाने आपल्या वर्तमानपत्रातून खुलासा केला, ना कधी त्याच्या मालकाला निवेदन देण्याची आवश्यकता वाटली. अशातच ही बातमी शहरातल्या काही उद्योजकांपर्यंत पोहोचली. काही व्यापाºयांपर्यंत पोहोचली, काही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचली. यातील जे कोणी राजकीय पक्ष प्रमुख होते, ते खरं तर संपादकाच्या रविवारच्या सदराला वचकूनच असायचे. त्यांना वाटायचे की हा माणूस नैतिकतेचा पुतळा आहे. याच्यापासून चार हात लांब राहिले पाहिजे. उगाचच आपल्या भानगडी चव्हाटट्यावर यायला नको. उद्योजक आणि व्यापाºयांचे तेच म्हणणे होते. त्यापैकी अनेकजण दुसºया राज्यातून पोट भरायला म्हणून या शहरात आलेले होते आणि इथल्या गरीब शेतकरी-मजूरांना पिळून दणकावून श्रीमंत झालेले होते. कामगारांचा हा तळतळात आणि रोष कुठेतरी आपल्यावर निघेल, आपल्या आड येईल असे त्यांना नेहमीच वाटत असे. त्यातून त्यांनी एक सोपा उपाय केला होता. गावात काही शाळा आणि कॉलेजला देणग्या देऊन त्यांना आपल्या पूर्वजांची नावे देववली होती. शेतकरी-मजूर काही झाले तरी देवभोळे असतात, त्यांना देवाच्या आणि धर्माच्या नादी लावले की मग ते काही आपल्या विरोधात जाणार नाहीत, आपल्या काळ्या गोष्टी चव्हाट्यावर येणार नाहीत, अशी त्यांची धारणा होती. त्याच धारणेतून त्यांनी शहरात विविध मंदिरे बांधली होती. अनेक धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या होत्या. अनेक पक्षांनाही देणग्या देतच होते. मात्र तरीही आपण पिढ्यान पिढ्या लोकांची लूट करतो, या वास्तवाची आणि या अनैतिकतेची बोच त्यांच्या मनात खोलवर रूतून बसलेली होती. त्यावर त्यांना उपाय शोधायचा होता. आणि अचानकच त्यांना संपादक नंगा झाला ही बातमी समजली. त्यांच्या सुपिक व्यापारी डोक्यात झटकन विचार आला. त्यांचे उद्योजकीय डोळे लखाखले. आपल्या मातृभाषेतील एक वाक्प्रचार त्यांना आठवू लागला, ‘नंगे को खुदा डरता है’.  या वाक्प्रचाराप्रमाणे नंग्या संपादकाला लोक किती घाबरतील.. असा मिश्किल विचारही त्यांनी  आपल्या लहानशा व्यापारी मेंदूत करून पाहिला आणि स्वत:शीच हसूनही पाहिलं. हाच विचार राजकीय पक्षप्रमुखांच्या मनातही आला. त्यांनाही वाटलं की संपादक नंगा झालाा, त्याचा काहीतरी राजकीय फायदा उठवलाच पाहिजे. त्यांनी राजकीय वजन वापरून थेट संपादकांच्या मालकावरच दबाव आणला. त्याला भरघोस जाहिरातींचे आणि शहरातल्या प्रमुख लोकप्रतिनिधींसोबतच्या परदेशवारीचे आमिष दिले. त्यांचे म्हणणे होते संपादक नंगा झाला, त्या अर्थी तो आता सार्वजनिक झालेला आहे आणि या देशातल्या लोकशाही तत्त्वानुसार प्रत्येक सार्वजनिक गोष्टींवर राजकीय नेत्यांचा पहिला हक्क असतो. म्हणून आता तुमच्यापेक्षाही आमचा संपादकावर जास्त हक्क लागू होतो. त्याचा उपभोग आम्हाला मिळायलाच हवा. एकाने नेत्याने तर स्पष्टच बोलून दाखविले, ‘संपादक कितीही मोठा असला, आणि नैतिक असला तरी मालक त्याची ‘ठासतच’असतात. त्यात हा संपादक स्वत:च नंगा झालेला आहे, अशात आम्ही त्याची ठासली, तर त्याला भोक थोडीच पडणार हाये?


उद्योजक आणि व्यापारी मात्र अशी घाणेरडी भाषा वापरणार नव्हते. त्यांच्या जिभेवर अतिशय गोडवा विराजत असल्याने त्यांनी मात्र सौम्यपणे मालकाला सांगितले, ‘आमी बेपारी लोक, पेपर आन् नैतिकता हे काय आमाले कलत नाय. देवाण घेवाण हेच तत्व आमाला कलते. तुमी संपादकाला आमच्यासाठी लिवायला लावा आणि आमच्याकडनं ब्लॅँकमंदी पैशे घ्या. समदा कसा रोकडा व्यवहार. ते जाहिरात बिहीरात काय आमी देणार नाय. पैसे घ्या आन् संपादक वापरायला द्या, कसं.इकडे नंगा झाल्यावर स्वत: संपादक विचार करायला लागलाच होता. उद्योजक आणि राजकारण्यांची चर्चा त्याच्या कानावरआलीच होती. तो स्वत:लाच नैतिकदृष्ट्या समजावू लागला, साला आपण पण माणूस आहे, माणूस चुकतोच कधीतरी.. अशात  आपल्या नंगेपणाचा फायदा मालक घेणार म्हणजे काय? आपण असेही नंगे आणि तसेही नंगे झालोच आहोत, तर थेट आपणच राजकारणी  आणि उद्योजकांकडे जावे उगाच मालकाची मध्यस्थी कशाला. शिवाय हा मालक थोडीच कायम राहणार आहे. आज ना उद्या आपण नैतिकतेचे आणि घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण देऊन हा पेपर बदलणारच  आहोत आणि नव्या पेपरमध्येही रविवारचा कॉलम कायम लिहिणार आहोत, तर उगाच मालकाची धोंड कशाला गळ्यात घ्यायची....


 या प्रकरणानंतर मध्ये मध्ये संपादकाच्या नंगेपणाच्या चर्चा होत राहिल्या आणि हळूहळू त्याला पूर्णविराम मिळाला. त्यावर खूप वर्षे लोटली. संपादक अजूनही रविवारचे सदर लिहितोच आहे. मध्यंतरी त्याने काही राजकीय नेत्यांना त्या सदरातूनच मोठे केले, काही तर थेट आमदार खासदार आणि मंत्रीही झाले. ते  नियमितपणे संपादकाची विचारपूस करतात. काही महत्त्वाचे दौरे, पुरस्कार यात संपादकाची वर्णी लावतात, त्याला व्याख्यानाला बोलावतात. संपादकही मग समाजातली नैतिकता कशी ढासळतेय यावर मन लावून बोलत असतो. त्यातील जे काही उद्योजक होते, त्यांचे साम्राज्य आता चांगलेच वाढलेले आहे. वेळोवेळी संपादक त्यांच्या कर्तबगारीवरही लिहित असतो. हे उद्योजकीय घराणे पिढ्यानपिढ्या कसे आध्यात्म आणि समाजसेवेत मग्न असून त्यांच्यामुळे समाजाचा आणि एकूणच शहरातील मजूरांचा, कामगारांचा विकास झाला आहे, हे आता त्याने सर्वांना पटवून दिले आहे. शहरातील राजकारणही कसे चांगले झालेय यावरही तो लिहित असतोच. मध्यंतरी संपादकाची ही नैतिक कर्तबगारी ठाऊक नसलेला एक सनदी अधिकारी शहरात आला होता. उद्योगांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांची नैतिकता ढासळली असून त्यांना सरळ करायलाच पाहिजे असे त्याला वाटल्याने सगळीकडे त्याने आपल्या कडक शिस्तीचा बडगा चालवला. त्यामुळे सर्वच घाबरले. संपादकाने मात्र सगळ्या माध्यमांच्या पत्रकारांना हाताशी धरले, प्रत्येकाला व्यवस्थित ‘मॅनेज’ केले, शिवाय आपल्या रविवारच्या सदरातून त्या अधिकाºयाचा खरपूस समाचार घेऊन त्याला शेवटी शहरातून घालवून दिले.. तेवढी एक घटना सोडली, तर शहराचे आणि संपादकाचे आता उत्तम सुरू आहे. संपादक एकेकाळी नंगा झाला हे सर्वजण विसरले आहेत. संपादकही ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करत असतो, पण मधून मधून त्याला आपण नंगे झालो ही गोष्ट अस्वस्थ करतेच, पण तेवढ्यापुरतीच. ही गोष्ट आठवली की संपादकाची नैतिकता एकदम जागृत होते आणि तो स्वत:लाच समजावत राहतो, ‘नंगे को खुदा भी डरता है’, जाने दो.


- पंकज जोशी 


जाता - जाता : ही कथा सत्य घटनेवर आधारीत आहे  ...एका राजकीय पुढाऱ्यांमुळे दोन संपादक वाचले. पण त्यातील एक संपादक अजूनही सुधारलेला नाही, एका मोठ्या दैनिकात काम करतो, त्याच्याविरुद्ध तीन मुलींनी लैंगिक छळाची तक्रार देखील मॅनेजमेंटकडे केली आहे ...

Post a Comment

0 Comments