'लोकमत'च्या मुंबई आवृत्ती संपादकपदी अतुल कुलकर्णी



मुंबई - दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्ती संपादकपदाची धुरा अतुल कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर विनायक पाथुडकर यांना सेंट्रल डेक्सची जबाबदारी देण्यात आली आहे.


मुंबईत 'लोकमत'ची अवस्था अत्यंत  बिकट झाली आहे, कोरोना लॉकडाऊन काळात लोकमतचा खप प्रचंड घसरला आहे, त्यात विनायक पाथुडकर संपादक म्हणून फेल गेल्याने दर्डा बंधुंनी  अतुल कुलकर्णी यांच्यावर संपादक पदाची धुरा सोपवली आहे.


 अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात लातूरमध्ये दैनिक लोकमतमध्ये शहर प्रतिनिधी म्हणून सुरु केली होती. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा असलेले कुलकर्णी हे दर्डा यांचे विश्वासू समजले जातात. 


लातूरचे नंदकिशोर पाटील यांची औरंगाबाद आवृत्तीच्या संपादकपदी काही महिन्यापूर्वी वर्णी लागली होती. आता लातूरचेच अतुल कुलकर्णी यांची मुंबई  आवृत्तीच्या संपादकपदी नेमणूक झाल्याने लातूरमधील अनेक पत्रकारांनी अभिनंदन केले आहे. 


पुण्यासाठी संपादक  मिळेना 


प्रशांत दीक्षित यांनी लोकमतमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही सहा महिन्यापूर्वी लोकमतच्या पुणे आवृत्तीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली  होती, पण अजूनही लोकमतला योग्य व्यक्ती  न मिळाल्याने पुण्याचे संपादकपद रिक्त आहे. मुख्य संपादक असलेले विजय बाविस्कर हेच पुणे संपादक पदाचे काम पाहत आहेत. 


दुसरीकडे सहायक संपादक सुकृत करंदीकर, वृत्त संपादक अविनाश थोरात यांनी  राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे समूह संपादक पुण्यात असताना ही पडझड सुरु आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या