दीपक चौरसिया चुकलाच,पण रोज चुकणारांचे काय ?

८ डिसेंबर,बुधवार रोजी तामिळनाडूतील कुन्नूर जंगलभागात झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताच्या तिन्ही लष्करीदलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण देश हादरला.हळहळला.काहींनी या बाबत हा अपघात नसून घातपात आहे अशा शंका देखील व्यक्त केल्या.पण त्यापेक्षाही चर्चा झाली ती न्यूज नेशन या हिंदी न्यूज चॅनलचे अँकर-संपादक-पत्रकार दीपक चौरसिया यांनी घटनेच्या दिवशीच मद्यधुंद अवस्थेत केलेल्या लाईव्ह बातमीदारीची.देशातल्या मोदीभक्त गोदी मीडियाच्या कंपूतला हा आघाडीचा राष्ट्रभक्त (?) सुसंकृत (?),हिंदुधर्मनिष्ठ (?) पत्रकार ! त्याने दारू पिऊन बातम्या सांगाव्यात.हे अनेकांना पटले नाही.


अर्थातच सगळ्यांनी मग चौरसियाच्या तोंडात येथेच्छ शेण घालून त्याचा पाण'उतारा' केला.आम जनतेला त्याची फार काही पडलेली दिसली नाही.राजकारण्यांनाही नाही.गोदी मीडिया तर गप्पच होता.परंतु काही पत्रकारांनी (खास करून मोदी विरोधी) मात्र या संधीचे अक्षरशः 'सोने' केले.दीपक चौरसिया कसा दारुडा आहे.दारू पिऊन बातम्या सांगण्याची किंवा चर्चेत अँकरिंग करण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती.हे नेहमीचेच होते.न्यूज नेशन चॅनलच्या आणि दीपक चौरसियाच्या दुर्दैवाने त्या दिवशी त्याला जरा जास्तच झाली.आपल्याला आज जमणार नाही हेही त्याच्या लक्षात आलेले असावे.पण सहकाऱ्यांनी ' तुम कर सकते हो..तुम ही कर सकते हो,कुछ नही होता..चलता है ! अपना काम बनता,भाड में जाये जनता...गंदा है पर धंदा है !' असे काहीतरी सांगून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले असावे.त्यानेही शेख चिल्ली प्रमाणे हरभऱ्याच्या झाडावर बसून ज्या फांदीवर बसला तीच फांदी तोडली.त्यात तो पत्रकार म्हणून सगळ्यांच्या नजरेतून पडलाच.शिवाय त्याची 'सोन्याची कुऱ्हाड' (न्यूज नेशन मधली नोकरी) देखील हरपली.


या शिवाय आणखी वेगळं होणार तरी काय होतं ? प्रसंग कोणता,याची अवस्था कोणती.कशाला झक मारायला लाईव्ह कॅमेऱ्यासमोर तो तमाशा केला ? महाशयाला धड बोलताही येत नव्हतं.चेहरा-डोळे-हालचाली,निवेदनातील असंबद्धता,हुकलेला ताळमेळ.हे सगळंच लाजिरवाणं होतं.तो लडखडत,लटपटत,अक्षरशः बरळत होता.'जर्नालिस्ट (!) बिपीन रावत...नही,जनरल व्ही.पी.सिंह...(मध्येच डोकं धरून) मैं सेंटी'मेंटल' हो गया हूँ !' असच काहीतरी तो बडबडत होता.हे त्याचं चुकलंच.त्यानं शेणच खाल्लं.नो डाऊट.त्याची शिक्षाही त्याला मिळाली.त्याला आता टीव्हीवर तोंड दाखवायला जागा उरली नाही.तशी संधीही त्याला आता चुकूनही मिळणार नाही.पत्रकार म्हणून तो संपलाच.३० वर्षांची पत्रकारिता त्याने तीन मिनिटात स्वतःच्या हाताने भुईसपाट केली.त्याच्या बद्दल सहानुभूती बाळगण्याचे किंवा त्याचे समर्थन करण्याचे आजिबात कारण नाही.तो 'इसी लायक होता' ! पण त्याच्यावर तुटून पडलेल्या पत्रकार विश्वातल्या पत्रपंडित पत्रमहर्षीना आम्हाला एक खाजगीताला सवाल विचारायचा आहे.


आम्हाला माहिती आहे की कोणीही पत्रकार आमच्या या प्रश्नाचे निर्भीड सडेतोड परखड उत्तर देणार नाही.पण तरी प्रश्न तर विचारायलाच हवा.मान्य की चौरसिया ढळला,घसरला,पसरला...पण पत्रकार विश्वातल्या किती जणांना चौरसियाच्या तोंडात शेण घालण्याचा नैतिक अधिकार आहे ? त्याने ओले शेण खाल्ले.पण जे महाभाग जवळपास रोज संधी मिळेल तेव्हा,किंवा सर्रास तिन्ही त्रिकाळ फोर्टी,सिक्स्टी,नाईंटी,कॉर्टर,युनिट असा प्रगतीचा प्रवास करतात त्यांचे काय ? शेण ते शेणच ना ! ओले खा की वाळलेले खा.किंवा गोवऱ्या करून खा.भीतीला सारवलेले चाटून किंवा टोकरून खा.कंटेन तोच ना.ब्रँड काहीही असो.तुम्ही 'श्रावणी' म्हणा,'धुळवड' म्हणा,'थर्टी फस्ट' म्हणा,'सेलिब्रेशन' म्हणा,की 'गटारी' ! शेवटी शेण ते शेणच ! मग ते शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या स्वरूपात,घोड्याच्या लीद स्वरूपात असो,म्हशीच्या पोयट्या स्वरूपात असो, गाईच्या 'औषधी' स्वरूपात असो,की श्वानाच्या 'लेंडूक' स्वरूपात.शेण म्हणजे शेण.ते चौरसियाने खाल्ले म्हणून वास मारते आणि आपण खाल्ले म्हणजे त्याचा मृदुगंध थोडाच दरवळतो ?


कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात

सांग तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं

सांग तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं

सांग  तुला शोधू कुठं...

कोठे असशी..कोठे बसशी,कुठल्या 'बारा'त...

कसा येतो कामावरती अन जातो घरात...

सांग तुला शोधू कुठं....

 

-रवींद्र तहकिक

7888030472 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या